Type to search

आरोग्यदूत

कॅन्सर कसा होतो?

Share

कॅन्सर झालेल्या रुग्णाला, त्याच्या नातलगांना आणि कॅन्सर न झालेल्या प्रत्येकालाच पडणारा हा प्रश्न. इतक्या वर्षांच्या संशोधनानंतरही या प्रश्नाचे पुरेसे नेमके उत्तर अद्याप सापडू शकलेले नाही. कॅन्सर झाल्यावर करण्यात येणारे उपचार हे त्याच्या गाठींवरचे उपाय असतात. मात्र त्या का आणि कशामुळे होतात? हे प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत. त्यामुळे कॅन्सरच्या मूळ कारणांचा नायनाट केला जात नाही. तोपर्यंत त्याच्याबद्दलची भीती कायम राहणार आहे. आपले शरीर हे पेशींपासून बनलेले असते. कोट्यवधी पेशी आपल्या शरीरात असतात आणि निसर्गाने दिलेले त्यांचे त्यांचे काम करत असतात. त्यांची संख्या, त्यांचे काम एकमेकींसोबत आणि शरीरासोबत संतुलन साधून चालू असते. अचानक या यंत्रणेत काहीतरी बिघाड होतो, आणि काही भागातील पेशी अनिर्बंध प्रमाणात वाढायला लागतात. त्यांच्या फक्त संख्येतच नाही, तर त्यांच्या कामातही बदल होतो. म्हणजे, त्या स्वत:चे काम करत नाहीतच, उलट इतर पेशींच्या कामांमध्येही अडथळे आणतात. सर्व नियंत्रण झुगारून शरीराची यंत्रणा विस्कळीत करतात. या बंडखोर पेशींची ही अनिर्बंध गाठ रुग्णाच्या लक्षात येत नाही. मग या पेशी एवढ्यावरच थांबत नाहीत, तर शरीरातील रक्तवाहिन्या आणि लसिका वाहिन्यांसोबत अन्य भागातही पसरू लागतात. यालाच ढोबळमानाने कॅन्सर म्हणता येईल.

कॅन्सरची नेमकी कारणे काय? हा प्रत्येकाच्याच उत्सुकतेचा विषय असतो. कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी. असा लोकांचा प्रश्न असतो. सामान्यपणे मानवाचे केस आणि नखे वगळून सतर प्रत्येक अवयवाला कॅन्सर होऊ शकतो. तोंड, जीभ, घसा, हिरड्या, अन्ननलिका, स्वरयंत्र, लाळग्रंथी, जठर, स्वादुपिंड, आतडे, फुफ्फुस, गर्भाशय, त्वचा, स्तने, हाडे, मेंदू, डोळे, या प्रत्येक अवयवाला कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सर होण्याची काही प्रमुख कारण आतापर्यंतच्या अनुभवांवरून सांगता येतील.

तंबाखू, सिगारेट, मद्यपान, सुपारी, गुटखा, यासारखी वाढती व्यसने हे कॅन्सर होण्याचे सर्वात मोठे कारण दिसून येते. याबद्दलची सविस्तर चर्चा आपण स्वतंत्र प्रकरणात केली आहे. यासाठी खास वेगळे प्रकरण समाविष्ट करावे लागले. यातच या कारणांमागची तीव्रता स्पष्ट होते. एकट्या तंबाखूवर बंदी आणली तरी जगातील आर्थिक व आरोग्याच्या बर्‍याच समस्या सुटतील. एकीकडे व्यसनांमुळे आणि आधुनिक जीवनशैलीतील पदार्थांमधून विविध रसायनांचा मारा शरीरावर होत असताना दुसरीकडे आवश्यक जीवनसत्वे, मूलद्रव्ये आणि तंतूमय पदार्थयुक्त समतोल आहाराचे प्रमाण कमी होत आहे. सभोवतालचे झपाट्याने वाढणारे प्रदूषणही कॅन्सरसारख्या व्याधींना निमंत्रणच ठरत आहे. सध्याची बदललेली जीवनपद्धती हे देखील याला कारणीभूत ठरत आहे. उशीरा लग्न होणे, कमी अपत्य असणे किंवा अपत्य नसणे यामुळे स्तनांचा कॅन्सर होऊ शकतो, तर अतिशय लहान वयात लग्न होणे, जास्त अपत्य असणे यामुळे गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ शकतो. हेपिटायटिस बी, सी यासारख्या काही विषाणूंच्या संसर्गामुळे यकृताचा कॅन्सर, ह्युमन पॅपिलोमिया व्हायरस यासारख्या विषाणूंमुळे गर्भाशयाच्या मुखाचा, योनीचा, शिश्नाचा कॅन्सर होत असल्याचे आढळून आले आहे. या विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी वेळीच लस घेतली तर या कॅन्सरला प्रतिबंध करता येतो.

साधारणपणे अशा काही कारणांमुळे कॅन्सर होत असल्याचे आतापर्यंतच्या तज्ज्ञांच्या अनुवभांवरून दिसते. मात्र तरीही सर्वसामान्य कॅन्सरचे निश्चित व ठोस कारण अद्याप सापडलेले नाही. त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. यात यश आले तर जग कॅन्सरमुक्त होऊ शकते. काही प्रकारच्या कॅन्सरच्या मूळ कारणाचा शोध संशोधकांना लागला असून त्यावरील उपायही सापडत आहेत. इतर प्रकारांच्या मूळ कारणांचाही लवकरच शोध लागेल. अशी आशा बाळगू या.
डॉ. राज नगरकर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!