Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कुपोषणमुक्तीसाठी ग्राम बालविकास केंद्रांची स्थापना

Share

नाशिक । प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागाच्या वतीने कुपोषणमुक्तीसाठी यावर्षीही जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्याचे निर्देश तालुक्यांना देण्यात आले असून आजपासून अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांच्या उपस्थितीत ग्राम बालविकास केंद्रांचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

ग्रामविकास केंद्रात दाखल करण्यात येणारे प्रत्येक तीव्र कुपोषित बालक सर्वसाधारण पोषण श्रेणीत आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने सर्वंकष प्रयत्न करण्यात येणार असून महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर, आरोग्य व शिक्षण सभापती यतींद्र पगार यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या सहकार्याने जिल्ह्यात कुपोषणमुक्तीसाठी ग्राम बालविकास केंद्राच्या माध्यमातून काम करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सांगितले.

आज बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथे जिल्हा परिषद सदस्या रेखा पवार यांच्या हस्ते ग्राम बालविकास केंद्राचे उद्घाटन झाले. त्याचप्रमाणे नाशिक तालुक्यातील जातेगाव, मातोरी, दुगाव, सावरगाव, धोंडेगाव, गोवर्धन, नांदगाव तालुक्यातील हिसवळ बु. इत्यादी ठिकाणी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले.

या केंद्रामार्फत बालकांना अतिरिक्त आहारपुरवठा, वैद्यकीय देखरेख, पालकांचे पोषणविषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टींवर भर देण्यात येणार आहे. या उपक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी मागील वर्षी जिल्ह्यात तीन स्तरावर प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यामार्फत तालुका व प्राथमिक स्तरावरील आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

यावर्षीही आरोग्य विभागाच्या वतीने बालकांच्या तपासणीचे नियोजन करण्यात येऊन 0 ते 6 वयोगटातील बालकांची वजन, उंची, दंडघेर, पायावरील सूज या निकषांवर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणार्‍या बालकांना ग्राम बालविकास केंद्रात प्रवेश देण्यात येत आहे.

ग्राम बालविकास केंद्रांमार्फत बालकांना अतिरिक्त आहारपुरवठा, वैद्यकीय देखरेख, पालकांचे पोषणविषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टींवर भर देण्यात येणार असून केंद्रात शासनाकडून आखून देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार आहार व औषध देण्यात येणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!