कुठे नेऊन ठेवला शैक्षणिक दर्जा! ; परीक्षा केंद्रांवर कॉपी प्रकार वाढीस

0

नाशिक (सोमनाथ ताकवाले) : सध्या दहावीच्या परीक्षा सुरु असून बारावी परीक्षेचेही काही पेपर बाकी आहे. त्यामूळे विद्यार्थी वर्ग मानमोडून अभ्यास करीत आहे. मात्र प्रत्यक्षात परीक्षा केंद्रावर या प्रामाणिक विद्यार्थ्यांचा हिरमोड होईल, असे सर्रास कॉपी प्रकार प्रत्येक पेपर गणिक घडताना दिसत आहे. त्यामूळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीकडे कटाक्ष टाकला तर, कुठे नेऊन ठेवला शैक्षणिक दर्जा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दहावी आणि बारावीच्या इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांच्या पेपरला ग्रामीण भागात एखाद्या परीक्षा केंद्राला मधमाशा पोळांप्रमाणे विळखा घालून कॉपी पुरवणार्‍यांचा गर्दी दिसत असल्यामूळे तेथे पोलिस, शिक्षक आणि खासगी सुरक्षा व्यवस्था नावालाच असल्याचे चित्र आहे. शैक्षणिक विभागाचे भरारीपथके या भागात जावून जुजबी कारवाई करीत असल्याने, ठराविक केंद्रांवरच परीक्षेच्या दरम्यान पेपर काही क्षणात लिक करणे, त्याचबरोबर कॉपी पुरवणार्‍यांची रिघ लागणे आणि परिसरातील झेरॉक्स दूकानदारांची त्याच दिवसांची कमाई काही हजारात जाणे, असे प्रकार परीक्षा केंद्रांच्या दरम्यान सूरू झालेले आहे.

दहावी आणि बारावीचे पेपर फुटला, हा शब्द यंदा मार्च महिन्यात सुरु झालेल्या बारावीच्या पहिल्या पेपरपासून सर्वांच्या कानी पडलेला होता. तो शब्द दहावी परीक्षेच्या दरम्यान ऐकू येत असल्याने, पेपर फुटणे ही बाब आता सर्वसामान्य झाली की काय, असे एकापाठोपाठ एक पेपर फुटत असल्याच्या घटनेने घडत आहे.

परीक्षा केंद्रावर पेपर वाटप झाले की, पहिल्या एकदोन मिनीटातच त्या पेपरची कॉपी खिडकीवाटे बाहेर फेकणारे विद्यार्थी वर्गात असतात. त्या पेपरचे मोबाईलवर पानापानाचे छायाचित्र काढून व्हॉटसअपवर ते बाहेर लागलीच लिक करणारे महाभाग परीक्षा केंद्राच्या दरम्यान असतात. त्याच दरम्यान बाहेर उभ्या टोळक्यापैकी काही जण, गाईड, इतर उत्तरसंच यांची सांगड घालून लागलीच त्या पेपरची उत्तर कॉपी अमुक याचे तमुक उत्तर या हे असून ते नमुद पानावर आहे, असे संक्षिप्त स्वरुपात तयार करून त्याबरोबर विस्तीर्ण उतारांच्या झेरॉक्स कॉपी पुरवणार्‍यांची संख्या परीक्षा केंद्रांभोवती गराडा घालून असते.

वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आपल्या खासगी वाहनाने घेऊन जाणार्‍या पालकांचा ठिय्या परीक्षा केंद्रांलगत असतो. त्यामुळे कॉपी पुरवणार्‍यांमध्ये त्यांचाही सहभाग वाढत असल्याचे दुर्दैवी चित्र दहावी-बारावीच्या परीक्षांदरम्यान केंद्रांवर पाहायला मिळत आहे.

ग्रामीण भागातील दुर्गम आणि खेड्यात असणार्‍या परीक्षा केंद्रांवर कॉपी करणार्‍यांचे प्रमाण अधिक असल्याने या परीक्षा केंद्रांवर सुरक्षा यंत्रणा तोकडी देऊन परीक्षा नियंत्रण बोर्डही ही कॉपी प्रकाराला एकप्रकारे प्रोत्साहन देत आहे. कारण एक-दोन पोलिस, एखादा होमगार्ड आणि फारतर त्या शाळेतील शिपाई एवढ्यांच्या दिमतीवर संपूर्ण परीक्षा केंद्राची सुरक्षितता सोपवण्यात येते.

त्यामुळे एकाबाजुला कॉपी पुरवणार्‍यांना आडकाठी आणणार्‍या पोलिसांना दुसरीबाजुला चकवा देऊन थेट खिडक्या गाठणार्‍या आणि कॉपी पुरवणार्‍या बहाद्दरांची संख्या मोठी आहे. त्यामूळे पोलिसांनी कोण-कोणाला आडवावे, अशी परिस्थिती केंद्रांवर आहे. तर काही बाजुला चिरीमिरी देऊन पोलिस, होमगार्ड यांना शांत करण्याची करामत कॉपी पुरवणार्‍यांकडून केली जात आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवरची सुरक्षितता आता मॅनेजही करण्यात येत असल्याचे आश्चर्यजनक चित्र पहायला मिळत आहे.

पालकांनी विद्यार्थ्यांना कॉपी पुरवावी, हा ओंगळवाणा प्रकार परीक्षा कालावधीत पहायला मिळत आहे. पाल्य काही करून उत्तीर्ण व्हावा, अशी त्या मागची भावना जरी असली तरी, पालकांनी वर्षभर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी केलेले प्रयत्न, खर्च आणि दाखवलेली संवेदनशीलता. पाल्य का वाया घालवत आहे, असे विचारण्याचे सोडून पालक कॉपी पुरवून आपली मुक संमती या प्रकाराला असल्याचे दर्शवत आहेत. त्यामुळे विद्यार्थी उत्तीर्ण झाला तरी त्याची बौद्धीक कुवत किती वाढलेली असेल, याचा विचार पालक करणार नाहीत, असे चित्र आहे.

परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवणारे आणि कॉपी करणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असताना परीक्षा मंडळ, केंद्र निरीक्षक, शिक्षक आणि सुरक्षा यंत्रणा ही एकाएकी एवढी हातबल का ठरत आहे, हे परीक्षेच्या दरम्यान न उलगडणारे कोडे आहे. त्याचबरोबर जे परीक्षा केंद्रे या प्रकारामुळे बदनाम आहे, अशा परीक्षा केंद्रांच्या शैक्षणिक संस्थांवर कारवाई किंवा ते केंद्र बरखास्त करण्याची कारवाई परीक्षा नियंत्रण मंडळ का करीत नाही, असा सवाल सुज्ञ पालकांना पडलेला आहे.

LEAVE A REPLY

*