कुटुंबाला लिफ्ट देऊन सव्वा दोन लाखांचा ऐवज लुटला

0

लग्नासाठी नगरला येत असताना जातेगाव शिवारात घडली घटना ः एक ताब्यात

 

सुपा (वार्ताहर) – चाकण येथून साडूच्या मुलाच्या लग्नासाठी नगरला येत असलेल्या कुटुंबाला तवेरा वाहनामध्ये लिफ्ट देऊन दोन लाख 20 हजार रुपयांना लुटले. ही घटना नगर-पुणे महामार्गावर जातेगाव शिवारात शनिवार दि. 6 रोजी रात्री 1.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती कळताच सुपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फिर्यादीने सांगितलेल्या माहितीच्या आधारे एका जणाला काही तासांतच ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील तीन जण पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 
चाकण येथे राहणारे सत्यवान विठ्ठल जाधवर (मूळ रा. हिंगणी खुर्द, बीड) हे पुणे येथील आपली पीएमटी ड्युटी संपवून आपल्या कुटुंबासह साडूच्या मुलाच्या लग्नाला जाण्यासाठी पुणे-नगर रोडवर चाकण चौकात रात्री 11 वाजता बसची वाट पाहत उभे होते. यावेळी एका तवेरा वाहनाच्या चालकाने तुम्हाला कुठे जायचे असे विचारले असता त्यांनी नगरला जायचे असे सांगितले. चालकाने नगरला सोडतो म्हणून वाहनात बसवले. त्यावेळी त्या वाहनात अन्य अनोळखी चार इसम होते.

 

बेलवंडी फाटा, वाडेगव्हाण, सुपा येथे उतरायचे असे त्यांनी सांगितले. गाडी शिरूर मार्गे नगरला निघाली असता ते गव्हाणवाडी येथे चहा पिण्यास उतरून कट रचला. पुढे पळवे परिसरातील जातेगाव घाट ओलांडून रात्री 1.30 वाजेच्या सुमारास एका इसमास जातेगावाला सोडायचे असे सांगून गाडी महामार्गापासून एक किलोमीटर अंतरावर कच्च्या रस्त्याने जातेगाव रोडवर नेली. वाहन नांगरलेल्या शेतात वाहन गुंतल्याने त्याचवेळी पाठीमागे बसलेल्या दोघांनी पत्नी चंद्रकला हिचा गळा आवळून दाबून धरले. सत्यवान जाधवर यांच्या हातातील ब्रासलेट व खिशातील 20 हजार रुपये व पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दोन गंठण काढून घेतले. पुढे बसलेल्या इसमाने मुलगी अस्मिता हीस दम देऊन तिच्या गळ्यातील सोन्याची चेन व कानातील सोन्याची फुले बळजबरीने काढून घेतली.

 
यावेळी सत्यवान जाधवर यांनी प्रसंगावधान राखून बळजबरीने वाहनाच्या खाली उतरुन मोठा दगड चालकासमोरील काचेवर घातला व आरडाओरड केल्याने वाहनातील चार झसम तवेरा वाहन चावीसह सोडून मुद्देमालासह पसार झाले.

 
आरडाओरड ऐकून परिसरातील अविनाश ढोरमले, अक्षय पोटघन, अतिश ढोरमले, राहुल ढोरमले, दत्तात्रय ढोरमले हे नागरिक त्यांच्या मदतीला धावून आले. यानंतर सुपा पोलिसांशी संपर्क करून सर्व घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती कळताच अवघ्या काही मिनीटांतच सुपा पोलीस निरिक्षक श्यामकांत सोमवंशी हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. जाधवर कुटुंबाला धीर देत तवेरा (एमएच 14, डीए 2971) सह पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

 

जाधवर यांच्याकडून सर्व हकीकत ऐकल्यानंतर पहाटे 5.30 वाजता पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांनी ठाणे अंमलदार सोमनाथ कांबळे, पो. हे. काँ. अजय नगरे, पो. कॉ. ईश्वर भोसले, चालक राहूल सपाट यांना बरोबर घेऊन सत्यवान जाधवर यांनी सांगितलेल्या रस्त्याने शिरूरच्या दिशेने तपास सुरू केला. चार आरोपींपैकी एकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी सत्यवान जाधवर यांच्या फिर्यादीवरून चार जणांवर रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 म्हसणे फाटा नजीक चौघांपैकी एका संशयितास सत्यवान यांनी ओळखले असता पथकाने त्यास घेराव घालून ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता तो सराईत गुन्हेगार असल्याचे हेरले. आरोंपीकडून सापडलेल्या वाहनावरून अशा प्रकारचे अनेक गुन्हे असल्याचे आढळून आले. दरम्यान नगर येथून गुन्हे अन्वेषण विभागाला पाचारण करण्यात आले असून सुपा पोलीस व गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी पसार असलेल्या तीन आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. 

LEAVE A REPLY

*