Type to search

कुटुंबव्यवस्था भक्कम होण्यासाठी!

ब्लॉग

कुटुंबव्यवस्था भक्कम होण्यासाठी!

Share

आपण अनेक बाबतीत पाश्चिमात्य विचारसरणीचा अवलंब करत आहोत. पण कुटुंबव्यवस्थेच्या बाबतीत मात्र त्यांचा विचार आपण लक्षात घेत नाही. आपल्याकडे स्त्रिया आर्थिक आणि वैचारिकदृष्ट्या अधिक स्वतंत्र झाल्या आहेत. तरीही त्यांना आचार-विचारांचे स्वातंत्र्य नसल्याने कुटुंबव्यवस्थेत वादांना सुरुवात होते. ज्येष्ठ निरुपणकार दादा धर्माधिकारी म्हणत, भारतातील पुरुषांमध्ये स्त्रीचे मन निर्माण होणार नाही तोपर्यंत ते स्त्रीला समजून घेऊ शकणार नाहीत. समाजात खर्‍या अर्थाने समानता आणण्यासाठी आणि कुटुंबव्यवस्था भक्कम होण्यासाठी हे वाक्य मूलभूत आधार ठरू शकते.

नातेसंबंधांबाबतीत आपण नेहमीच काळे किंवा पांढरे या दोनच दृष्टीने बघतो. वर्षानुवर्षांपासून जी लग्नसंस्था आणि रुढी आखून दिल्या आहेत त्या तशाच पाळणे म्हणजे चांगले, असे आजही अनेक जण मानतात. पण परंपरागत सर्व रुढी पाळून लग्न करणे महत्त्वाचे आहे की लग्नानंतर सुखी संसार करणे महत्त्वाचे आहे? खरे तर विवाह म्हणजे स्त्रीला खर्‍या अर्थाने सर्व बाबतीत स्वतःच्या आयुष्यात सामावून घेणे आणि दोघांनीही एकमेकांना योग्य पद्धतीने समजावून आयुष्याची वाटचाल करणे हा होय. पण आपल्याकडे फार कमी लोक या अर्थाचे पालन करतात. बाकी केवळ रुढी-परंपरांमध्येच अडकलेले दिसतात.

आपल्या देशाने ज्यावेळी भांडवलशाही व्यवस्थेचा स्वीकार केला तेव्हा विकेेंद्रित अर्थव्यवस्था असावी असे सांगण्यात आले. प्रत्येकाला काम मिळाले पाहिजे हा विचार समोर आला. त्यातून शहरात काम जास्त असते म्हणून खेड्यातली माणसे शहराकडे वळली. शहरातून मोठे शहर आणि नंतर परदेश हा प्रवास पैसा कमावण्याच्या उद्देशाने झाला. यामुळे माणसे कुटुंबांपासून दूर झाली. कुटुंबाचा आधारस्तंभ खिळखिळा होऊ लागला. मुले नोकरीसाठी वेगळ्या ठिकाणी आणि आई-वडील वेगळ्या ठिकाणी असे चित्र दिसू लागले. कालांतराने आई-वडिलांचे असे होणारच हा स्वीकार नकळत होऊ लागला. शेवटी मुले आई-वडिलांकडे दुर्लक्ष करणारच, अशीही मानसिकता समाजात रूढ होऊ लागली. ही परिस्थिती बघता घटनेला कायदा करावा लागला की, मुलांनी आई-वडिलांना सांभाळलेच पाहिजे. पण मला वाटते कायद्याने कुठलाही प्रश्न सुटत नाही.

मूळ समस्या संस्कारात आहे. त्याबद्दल कोणीच बोलत नाही. बदलत्या परिस्थितीबद्दल कोणीच बोलत नाही. ही तफावत लक्षात घेतल्यास अनेक उत्तरे आपोआपच मिळू शकतात.

आज स्त्रिया कमावत्या झाल्या आहेत. वाढत्या महागाईमुळे ती गरज बनली आहे. भारतातील चित्र बघितले तर 93 टक्के स्त्रिया नोकरी आणि घर दोन्ही पातळ्या सक्षमपणे सांभाळताना दिसत आहेत. यादृष्टीने आपण 21 व्या शतकात जगण्याचा प्रयत्न करत आहोत. पण घरातल्या स्त्रीने कोणते कपडे घालावेत, कुठे जावे हे मात्र घरातील पुरुषच ठरवत आहेत. एकीकडे स्त्रीने उचललेला कौटुंबिक आणि आर्थिक भार तुम्हाला मान्य आहे. पण तिला वैचारिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्य तुम्हाला द्यायचे नाही, यातून संघर्ष होणारच. माझे व्यक्ती म्हणून घरातील महत्त्वाचे अस्तित्व मानले जात नाही, याची जाणीव तीव्रतेने होऊ लागल्यावर घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसते. दीर्घकाळ सहन केल्यानंतर कधीतरी भावनेचा स्फोट होणारच. असह्य झाल्यावर स्त्री घरातले दुःख बाहेर मांडते. ते वाईट समजले जाते. जी सहन करते ती चांगली आणि जिने बाहेर मांडले, कायद्याचा आधार घेतला तिला वाईट ठरवले जाते. हा दृष्टिकोन चुकीचा नाही का?

काळाच्या प्रवाहात आपण आता एका वेगळ्या वळणावर आलो आहोत. त्यामुळे आपला दृष्टिकोन विस्तारणे खूप गरजेचे बनले आहे. खरे तर स्त्रीलाही स्वतःचा संसार मोडायचा नसतो. कारण स्त्रीचा मूळ स्वभाव हा क्षमा करणारा असतो. पण एका मर्यादेनंतर तिची सहनशक्ती संपते. लग्न हा जर विश्वासावर टिकणारा परिणाम असेल तर हा विश्वास दोन्ही बाजूंनी दाखवायला नको का? कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव फक्त स्त्रियांनीच ठेवायची असते का? ही सगळी विषमता आज घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणाला कारणीभूत ठरत आहे. ज्येष्ठ निरुपणकार दादा धर्माधिकारी यांचे एक खूप चांगले वाक्य आहे. ते म्हणत, ‘जोपर्यंत भारतातल्या पुरुषांमध्ये स्त्रीचे मन निर्माण होत नाही तोपर्यंत ते स्त्रीला समजून घेऊ शकणार नाहीत.’ समाजात खर्‍या अर्थाने समानता आणण्यासाठी आणि कुटुंबव्यवस्था भक्कम होण्यासाठी हे वाक्य मूलभूत आधार ठरू शकते, असे मला वाटते.

आपण अमेरिका आणि तत्सम प्रगत देशांचे अनेक गोष्टींचे अनुकरण करतो आणि तुलना करतो. पण त्या लोकांनी स्त्री आणि पुरुषांना एकाच पातळीवर आणण्याचा जो प्रयत्न केला आहे तो स्वीकारत नाही. केवळ स्वतंत्र राहणे, वेगळे राहणे, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे यांसारख्याच गोष्टी आपण स्वीकारलेल्या दिसतात. शेवटी कसे राहायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण लग्न या संस्काराकडे व्यापक दृष्टिकोनातून बघितले तर ती खिळखिळी नाही तर विस्तारली आहे, असे चित्र दिसू शकते. उदाहरणच द्यायचे झाले तर इंग्लिश डिक्शनरीत आज अनेक इतर भाषांतील शब्दांचा समावेश होऊन त्याचे अर्थ दिलेले दिसतात. जंगल हा शब्द भारतीय आहे पण तो इंग्रजी डिक्शनरीत दिसतो. त्यांनी हा शब्द जसा सहजपणे स्वीकारला तशाच पद्धतीने आपण नव्या गोष्टी सहजपणे स्वीकारायला हव्यात. तशा त्या स्वीकारल्या तर आपण वसुधैव कुटुंबकम् जगत असल्याचे दिसेल. लोक वैश्विक नागरिक होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण कुटुंबाला वैश्विक पातळीवर नेणार नाही का? वैचारिक बुरसटलेपण आता आपण सोडले पाहिजे. कर्मकांडातून बाहेर पडले पाहिजे. विवाहाच्या वेळी म्हटल्या जाणार्‍या मंत्रांचे अर्थ वधू-वरांना माहीतही नसतात. अशा परंपरा पाळण्याबरोबर एकमेकांचे अस्तित्व पती-पत्नीने स्वीकारणे गरजेचे आहे. वर्तमान परिस्थितीत आपल्या वैचारिक कक्षा उच्च पातळीवर नेल्या तर कुटुंबव्यवस्था विस्तारली असल्याचे दिसेल. अन्यथा ती धोक्यात असल्याचे दिसेल. माझ्या दैनंदिन कामामध्ये मी अनेक उच्चविद्याभूषित मुला-मुलींना भेटत असतो. ते एकत्र राहत असतात. त्यातील बरेचसे समलिंगीही असतात. त्यांना आपली गरज नसते. पण दैनंदिन कामात मात्र कामाची देवाण-घेवाण होत असते. मग अशांना आपण कुटुंब समजणार नाही का? हेच नाही तर असे अनेक बदल आपण जितके लवकर स्वीकारू तेवढे आपले कुटुंब वैश्विक होईल.

बदलत्या कुटुंबव्यवस्थेवर केवळ चर्चा करून प्रश्न सुटणारे नाहीत किंवा वाढत्या घटस्फोटांवर चर्चा करूनही ते कमी होणार नाहीत. कारण कोर्टात कधीही समस्या सुटत नाहीत. उलट त्या चिघळत राहतात. प्रत्येकाला एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायचे असतात. म्हणून आम्ही सेटलमेंट कॉन्फरन्सचा पर्याय शोधून काढला आहे. जो कायद्यातच बसतो आणि यामुळे घटस्फोट खरेच गरजेचा असेल तर तो चटकन दिला-घेतला जातो. आपण एखाद्या समस्येला खूप कवटाळून बसतो. त्यावर उपाय शोधत नाही.

त्यामुळे आपली वेगाने प्रगती होत नाही. मी जपानमध्ये गेलो असताना मला दिसले की तेथे घटस्फोटाचीही पार्टी दिली जाते. यामध्ये घटस्फोटीत पती-पत्नी एकमेकांबद्दल काहीही वाईट बोलत नाहीत. उलट जो काळ एकमेकांबरोबर चांगल्या पद्धतीने घालवला आहे त्याचा उल्लेख करतात आणि ज्या गोष्टींमुळे मतभेद आहेत त्या स्वीकारतात. हे स्वीकारल्यामुळे त्यांच्यात कटुताही राहत नाही. कुठे ही वैचारिक व्यापकता आणि कोठे बुरसटलेले विचार?

नातेसंबंधांसाठी कायद्याचा वापर नाही तर विवेकाचा वापर आवश्यक असतो. कायदा विवेक शिकवत नाही. जोपर्यंत आपण लग्नाकडे रुढी-विचारांना सोडून बघणार नाही, प्रेमविवाहांना मंजुरी देणार नाही, मुले-मुली स्वतःच्या मर्जीने विवाह ठरवणार नाहीत आणि त्याला आई-वडील पाठिंबा देणार नाहीत, विवाहामध्ये जाती-धर्माच्या भिंती उभ्या राहणार नाहीत तोपर्यंत कुटुंबव्यवस्था धोक्यात असल्याचेच दिसेल. पण दृष्टिकोन विस्तारून, व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार करून लग्नाकडे बघितले तर कुटुंबव्यवस्था धोक्यात आल्याचे जाणवणार नाही.
– अ‍ॅड.असीम सरोदे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!