कुकडी पाण्यासाठी आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरूच

0

आमदार जगताप यांच्या भूमिकेचा निषेध; पाणी मिळेपर्यंत लढा

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – कुकडी कालव्यावरील मायनर चारी 132 चे पाणी बंद करून विसापूर मध्ये सोडल्यानंतर ते पाणी पुन्हा मायनर चारीला सोडावे या मागणीसाठी शेतकर्‍यांनी सुरू केलेले धरणे आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरूच होते. यावेळी आमदार राहुल जगताप हे फक्त सात गावाचे आमदार आहेत की, पूर्ण तालुक्याचे असा प्रश्‍न भगवंत वाळके यांनी उपस्थित केला. मायनर चारी 132 ला पाणी जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकर्‍यांनी घेतल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
कुकडी डाव्या कालव्यातून 25 एप्रिल रोजी पाणी सोडण्यात आले. मात्र हे पाणी शेतीलाही मिळावे यासाठी आमदार राहुल जगताप व कार्यकर्त्यांनी कालव्यातच ठिय्या आंदोलन केले होते. यामुळे कालव्याचे पाणी विसापूर मध्ये सोडण्यात आले. ठिय्या आंदोलन मागे घेतल्यानंतर जामखेड व कर्जतला पाणी गेले. त्यानंतर टेल टू हेड करत पाणी मायनर चारी 132 ला सोडण्यात आले. मात्र हे सोडलेले पाणी आमदार राहुल जगताप यांनी दबाव आणून बंद केले व पुन्हा विसापूर मध्ये सोडण्यात आले. आमदार राहुल जगताप यांनी आणलेला दबावाचा निषेध करण्यासाठी शेतकर्‍यांनी त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला व तहसील कार्यालयाला टाळे ठोकले. यामध्ये काही शेतकर्‍यांना अटकही करण्यात आली.
मात्र मायनर चारी 132 चे बंद केलेले पाणी पुन्हा सोडावे या मागणीसाठी चारी खालील शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन सुरू केले. पाण्यासाठी सुरू केलेले धरणे आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरूच ठेवले. यावेळी शेतकर्‍यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी भगवंत वाळके म्हणाले, आ. राहुल जगताप यांच्या दबावामुळे 13 मे रोजी 132 मायनर चारीला सोडलेले पाणी बंद करुन विसापुर आणि मोहोरवाडी तलावात घेण्यात आले.
मग आ.राहुल जगताप हे केवळ विसापूरच्या सात गावांचा विचार करत असतील आणि विसापूर पासून खालचे पाणी बंद करत असतील तर आ. जगताप हे काय केवळ या सात गावापुरते मर्यादित आहेत का. आम्ही जरी त्यांना मतदान केले नसले तरी त्याच मतदारसंघात असल्याने आमची शेतीपिके जळत असताना त्यांनी थोडा तरी विचार करायचा होता.
धरणे आंदोलनामध्ये भगवंत वाळके, शिवाजी राऊत, भाऊसाहेब खेतमाळीस, बाळासाहेब खेतमाळीस, साहेबराव मोटे, भानुदास मखरे, मारुती वाळके, लालासाहेब मखरे, माउली मोटे, बाळासाहेब शेडगे, अ‍ॅड. सुमित बोरुडे, समीर पांढरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
तर पाणी ‘विसापूर’मधून द्या
132 मायनर चारीला पाणी पूर्वी विसापूर धरणातून सोडता येत होते. आताही 132 मायनरचे पाणी बंद करून हे पाणी विसापूर मध्ये वळवले. आमच्या फळबागा जळत आहेत. कायमच या भागावर अन्याय होत असताना आम्ही केवळ बघत बसायचे का? असा सवाल करत आता 132 मध्ये विसापूर तलावातून पाणी सोडून पाटबंधारे विभागाने फळबागांना पाणी देण्याची मागणी शेतकरी शिवाजी राऊत यांनी केली.

LEAVE A REPLY

*