कुकडी पाटबंधारे कार्यालयासमोरील चंदन झाडे गायब

0

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा शहरातील कुकडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या आवारात असलेल्या शासकीय विश्रामगृहासमोरील बागेतील लाखो रुपये किमतीची चंदनाची चार ते पाच झाडे चोरांनी कापून नेली. याबाबत पोलिसांत अगर वनखात्याकडे कोणतीही तक्रार नोंदविण्यात आलेली नसल्याने याबाबत उलटसुलट चर्चा आहे.

 
श्रीगोंदा शहरात पेडगाव रस्त्यावर कुकडी पाटबंधारे विभाग क्र.2 चे मुख्यालय असून याच आवारात शासकीय विश्रामगृह आहे. या विश्रामगृहासमोरील बागेमध्ये विविध प्रकारची मोठी झाडे आहेत. यामध्ये चंदनाची देखील बरीचशी झाडे आहेत. यातील चार-पाच मोठी झाडे करवतीच्या सहाय्याने जमिनीपासून कापून त्यातील लाखो रुपये किंमतीची चंदनाचा गाभा असलेली मोठी लाकडे चंदनचोरांनी मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास गायब केली आहेत. तर उर्वरित निकामी लाकडे पाल्यासाहित विश्रामगृहाच्या मागे पडलेली आढळून आली.

 
कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी याचे निवासस्थान आणि कार्यालयाच्या मध्यभागी हे विश्रामगृह असून त्यांच्या शेजारी उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयासह तीन-चार शाखा कार्यालये आणि पाटबंधारे विभागाची पतसंस्था आहे. तरीही चंदनचोरांनी विश्रामगृहासमोरील लाखो रुपयांचे चंदन गायब केल्याने याबाबत कर्मचार्‍यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

 

चोरी झालीच कशी?
सध्या कुकडी कालव्याचे आवर्तन सुरू असल्याने दिवस रात्र अधिकारी कुकडी कालव्यावर आणि काम संपल्यावर या विश्रामगृहावर उपस्थित असतात. कुकडी पाटबंधारे विभाग क्र. 2 या कार्यालयात तसेच विश्रामगृहात अनेक कर्मचार्‍यांचा राबता असूनही चंदनचोरी झालीच कशी? असा प्रश्‍न वृक्षमित्रांनी उपस्थित केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

*