कालिदास कलामंदिर नूतनीकरण दृष्टिपथात मार्च २०१८ पर्यंत मिळणार नवे रूपडे

0

नाशिक | दि. ६ प्रतिनिधी
नाशिक नगरीतील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र आणि शहराचे वैभव म्हणून पाहिले गेलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरण कामाची निविदा महापालिकेने काढली आहे. यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन येत्या जुलै महिन्यात कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरण कामास सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासनाने कालिदास कलामंदिराच्या कामाची निविदा काढली आहे. यामुळे ही निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास तीन महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुलैपासून कालिदासच्या नूतनीकरणास प्रत्यक्ष प्रारंभ होणार असल्याचे दृष्टिपथात आहे. जुलै महिन्यात कामास प्रारंभ झाल्यानंतर पुढील आठ महिन्यांत काम पूर्ण करून मार्च २०१८ पर्यंत कालिदासला नवीन रूप येऊन तेे सुरू होणार आहे.

काही महिन्यांपूर्वी कालिदास कलामंदिरात नाट्य प्रयोगानिमित्त आलेले प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी महाकवी कालिदास कलामंदिराची दुरवस्था थेट फेसबुकवर शेअर करीत मोठी खळबळ उडवून दिली होती. यावरून अभिनेते, नाट्य कलावंत व नाट्य रसिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याने महापालिका प्रशासनाचे वाभाडे निघाले होतेे. या प्रकारामुळे महापालिकेतील सत्ताधारी मनसेनेच्या कामावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते.

या एकूणच घडामोडीनंतर मुंबईत मनसेना विरुद्ध मराठी अभिनेते असे रामायण घडले. त्यानंतर नाशिक महापालिकेतदेखील महाभारत घडून कालिदास नूतनीकरणास निधी मंजूर केला असताना यासंदर्भात कामाच्या निविदा न काढल्याबद्दल व कालिदासकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आयुक्तांनी थेट अतिरिक्त आयुक्त, अधीक्षक अभियंता, आरोग्य अधिकारी व विभागीय अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटिसा काढल्या होत्या.

यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तातडीने कालिदास नूतनीकरण कामाची प्रक्रिया सुरू केली. मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने हे काम थांबवण्यात आले होते. आता निवडणूक आचारसंहिता संपल्याने लगेच प्रशासनाने नूतनीकरण कामाची निविदा काढली आहे.

महापालिकेकडून कालिदास नूतनीकरण करण्यासाठी संकल्पचित्र काढण्यात आले असून हे साकारताना शहरातील नामवंत कलावंतांच्या सूचना व मते नोंदवून घेण्यात आली आहेत. यानुसारच एका नामवंत आर्किटेक्ट कंपनीने आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे कालिदास कलामंदिराचे संकल्पचित्र तयार केले आहे. त्यामुळे जुलै महिन्यात काम सुरू झाल्यानंतर मार्च २०१८ पर्यंत नाशिकचे वैभव असलेले कालिदासचे आगळेवेगळे रूप नाशिककरांना बघायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*