कालानुरुप बदलाची आवश्यकता

0
आज धूलिवंदन! राज्याच्या काही भागात धूळवड आणि काही भागात रंगपंचमी साजरी केली जाते. तीव्र दुष्काळामुळे या सणांचा रंग यंदा काहिसा फिका पडण्याचा संभव आहे. काल सर्वत्र होळी साजरी झाली. तथापि ‘यावेळच्या होळीला मागच्यासारखी मजा आली नाही’ अशीच प्रतिक्रिया व्यक्त होत होती.

माणसाच्या मनातील उल्हास आणि आनंदालाही दुष्काळाच्या मर्यादा पडल्या आहेत. हे वास्तव असले तरी आहे त्या परिस्थितीत आनंद मानून घेण्याचा मनुष्य स्वभाव आहे. चालत आलेला पायंडा म्हणून उपलब्ध साधनानिशी छोट्या प्रमाणात का होईना; पण सण व उत्सव साजरे जातात. आजही तशीच धूळवड खेळली जाईल. रंगपंचमीलाही रंगांची उधळण होईल. माणसाच्या साचेबद्ध वेळापत्रकाला सण मनाला हुरुप वाढवणारे वळण देतात. विपरित परिस्थितीही आनंद मानायला शिका, असा संदेश देतात. सण साजरे करण्याच्या निमित्ताने माणसे एकत्र येतात.

सुख-दु:खांची देवाणघेवाण होते. सर्वांच्या जीवनात घटकाभर आनंद निर्माण होतो. क्षणभरासाठी का होईना, पण माणसे आपले दु:ख विसरतात. यानिमित्ताने ऋतुमानानुसार सण साजरे करण्यामागचा विधायक उद्देश लक्षात येतो. त्याच दृष्टिकोनातून आजची धूळवड आणि चार दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाईल. तथापि यंदाची तीव्र दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन या सणांचा अमर्याद उत्साह काहिसा मर्यादित होऊ शकेल का? याचा जनतेने केला पाहिजे. रंगपंचमीला होणारा पाण्याचा वारेमाप वापर टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

दुष्काळाची दाहकता यंदा मोठी आहे. गावेची गावे तहानलेली आहेत. शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच सरकारला काही गावांत दुष्काळ जाहीर करावा लागला. ऑक्टोबरअखेर सरकारने 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला होता. त्यावेळीच 112 तालुके गंभीर दुष्काळी होते. उष्णतेचा पारा वाढत आहे तसतशा दुष्काळाच्या झळा तीव्र होत जातील. त्यामुळे यंदाची धूळवड आणि रंगपंचमी कोरडीच साजरी करणे व पाणी वाचवणे हे राष्ट्रीय कर्तव्य ठरावे. मुद्दा फक्त यंदाचा दुष्काळ आणि कोरड्या रंगांच्या उधळणीपुरता मर्यादित राहू नये.

हवामान लहरी होत आहे. त्याचे चटके माणसाला बसू लागले आहेत. त्यामुळे सगळ्याच सार्वजनिक सणांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. सण साजरे करण्याच्या पद्धतीत पर्यावरण आणि निसर्गपूरक बदल व्हायला हवेत. पर्यावरणपूरकतेचे गांभीर्य भावी पिढीच्या लक्षात आणून त्यांना निसर्गाशी मैत्रीचा वारसा सोपवणे हे आजच्या पिढीचे कर्तव्य ठरते. त्याची सुरुवात धूळवड आणि रंगपंचमीनिमित्ताने करून कालानुरुप पायंडा पाडला जाईल का?

LEAVE A REPLY

*