Type to search

ब्लॉग

काय करू शकतो?

Share

पर्यावरण प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. तो सरकारने सोडवायला हवा, हेही खरेच. पण आपण काय करू शकतो याचाही विचार प्रत्येकाने करायलाच हवा.

यापूर्वी 2005 हे वर्ष अतिशय दाहक होते. पण आता 2019 हे अतिदाहक वर्ष म्हणावे लागेल. मे संपता संपताच महाराष्ट्रातील चंद्रपूरला जगातील कमाल तापमानाचे वर्ष घोषित करावे लागले, तर जून सुरू होताच राजस्थानातील चुरू शहराने 51 अंश सेंटीग्रेडपेक्षाही अधिक तापमान गाठले. सगळीकडेच जनता हैराण झाली. पाण्याच्या दुष्काळाच्या बातम्याही खूप आल्या. पाण्याची चोरी झाल्याचेही वाचण्यात, पाहण्यात, ऐकण्यात आले. इंडोनेशियात त्सुनामीने कहर केला, तर अलीकडेच ओरिसाला नेहमीप्रमाणेच वादळाने तडाखा दिला. 2018 व 2019 मध्येही इतर नैसर्गिक आपत्तींमुळे वित्तहानी व मनुष्यहानी झाल्याचे दिसले. ही प्रगती की अधोगती? आज जागतिक स्तरावर अतिशय महत्त्वाचा प्रश्न पर्यावरणाचाच आहे. चराचर सृष्टीतील सार्‍याच घटकांवर त्याचा परिणाम होऊन मानवी जीवनाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतालचे वातावरण. आपापल्या वाट्याला आलेले आयुष्य सुखात जाण्यासाठी प्रत्येक जण धडपड करतो. एक सुख मिळाले की दुसरे मिळावे या हव्यासाने जो तो धावत असतो. मानवाने स्वसुखाच्या लालसेपोटीच निसर्गात ढवळाढवळ करून पर्यावरणाच्या प्रश्नाला आमंत्रण दिले आहे. जीवनावश्यक गोष्टींचे जे स्त्रोत आहेत ते सारे पर्यारणाचे घटक आहेत. त्यात हवा, पाणी, वृक्षवेली, वनस्पती वने, वन्यप्राणी, पक्षी, कीटक, जमीन, नद्या, समुद्र या सार्‍यांचा अंतर्भाव होतो. त्या सर्वांचे एक चक्र आहे. यातील एका घटकावर आघात झाला तर दुसर्‍यावरही होतो आणि मनुष्यप्राण्यासाठी हाच आत्मघात ठरतो. मानवी प्रवृत्तीत जोवर हाव, लालसा, भोगवाद, चंगळवाद आहे तोवर पर्यावरणाचा प्रश्न सुटूच शकत नाही. त्यासाठी दैनंदिन जीवनशैली बदलण्याची गरज आहे.

सृष्टीतच पुन्हा पुन्हा निर्माण करण्याची शक्ती आहे. म्हणून तिचे संगोपन, संवर्धन, संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य, जबाबदारी असायला हवी. एकदा एका प्रसिद्ध कवीला लोकलमधून प्रवास करताना एका प्रवाशाने विचारले की, तुमच्या कवितेतला निसर्ग दिसला तर तो आम्हालाही दाखवा. हा भाग गंमतीचा असला तरी ही वस्तुस्थिती आहे. जो निसर्ग आपल्याला जिवंत ठेवतो त्याच्याविषयी इतकी उदासीनता का? आपल्या घराची खिडकी, दरवाजा, गच्ची, परसदार, शाळेचे मैदान, शेते कुठेही उभे राहिले तरी निसर्ग दृष्टिक्षेपात येतो. निळे आकाश, ढग, चंद्र, सूर्य, चांदण्या, झाडेझुडपे, वेली, पशुपक्षी, माती, कीटक, फूलपाखरे, ऊन, वारा, पाऊस, नद्या, तळी, समुद्र, धबधबे, फुले, इंद्रधनुष्य असा निसर्ग आपल्या वाट्याला आला आहे. पण याची जपणूक कशी करतो? कुठेही भटकंतीला गेलो की प्लॅस्टिकच्या वस्तू तिथेच टाकतो. देशातील, राज्यातील घनदाट जंगले आता विरळ झालीत. डोंगर उघडेबोडके दिसतात. एकीकडे वृक्षतोड झाली तरी वृक्षरोपण झाले पाहिजे. उद्याने, वाटिका झाल्या पाहिजे. सार्वजनिक संस्था, कार्यालये, शाळा, मंदिर यांचे परिसर वृक्षारोपणाने सुशोभित झाले पाहिजे. यासाठी नातेवाईकांत कपड्यांची देवाणघेवाण करण्याऐवजी उपयुक्त झाडाची रोपटी देऊ शकतो. वाढदिवस, स्मृतिदिन साजरा करतानाही याचा अवलंब करू शकतो. वृक्षाचे संगोपन, संवर्धन, संरक्षणाविषयीची जागरुकता ठेऊ शकतो.

रंगीबेरंगी देखणे पक्षी हा तर निसर्गाचा अनमोल खजिनाच. पर्यावरणाचा समतोल राखण्यात पक्षी मोलाची कामगिरी बजावतात. ते पर्यावरणबदलाचे सूचक आहेत. डिसेंबर 2004 मधील त्सुनामीच्या वेळी ही प्रचिती आल्याचे अनेक तज्ञांनी कबूल केले.

वड, उंबर, पिंपळ, कडुलिंब आदी वृक्ष लावण्याचे कार्यही पक्ष्यांकडूनच केले जाते. ते त्यांच्या विष्ठेमार्फत. शेतातून फिरणारे पक्षी किडे वेचून खातात. म्हणून पक्षी हेच नैसर्गिक कीटकनाशक ठरतात. काही पक्षी हवेतील जंतू खाऊन हवा प्रदूषण कमी करतात. पाण्यात राहणारे पाणपक्षी पाण्यातील किडे खाऊन जलप्रदूषण कमी करतात. पर्यावरण साखळीत पक्षी महत्त्वाची भूमिका ठेवतात. मानवी हस्तक्षेपामुळे काही पक्ष्यांच्या जाती लोप पावल्या. काही त्या मार्गावर आहेत. या पक्ष्यांना जीव लावायला हवा. ज्यांची घरे, परिसर मोठा आहे त्यांनी पक्ष्यांच्या आवडीची वड, उंबर, पिंपळ, चिंच ही झाडे लावावीत. म्हणजे पक्ष्यांना निवारा होईल. त्यांच्या पिण्याच्या पाण्याचीही सोय करावी.

प्रचंड लोकसंख्येमुळे निसर्ग सगळीकडून ओरबाडला जात आहे. पुरेसा पाऊस नाही. रोजच्या गरजांसाठीही पुरेसे पाणी नाही. जमिनीतील पाण्याची पातळी खालावलेली दिसते. जिथे पाऊस पडून पाणी वाहून जाते त्यांनी पाणी अडवा, पाणी जिरवा कार्यक्रम राबवावा. वेगवेगळ्या पद्धतीचे उपयुक्त बंधारे बांधावेत. घरासमोर जमिनीखाली टाक्या बांधाव्या. छपरावरून गळणारे पाणी त्यात साठवावे. पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी हे पाणी वापरावे. पावसाळाभर हे उपक्रम राबवण्यास गावातील विहिरी, तळी, जलाशय भरलेले राहतील व हे पाणी उन्हाळा संपेतोवर वापरता येईल. अर्थात, यात शासकीय मदत अपेक्षित आहे. प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाच्या सरकारला दोष न देता प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे. त्या-त्या परिसरातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे. औद्योगिक कारखान्यातील विषारी रासायनिक पदार्थ, निर्माल्य चांगल्या पाण्यात न सोडणे यात वैयक्तिक तसेच शासन जागरुक हवे. जीवनावश्यक पर्यावरण वाचवण्यासाठी वेगळा विचार वेगळ्या जीवनपद्धतीचा अवलंब हाच उपाय ठरेल.
जपूया पर्यावरण ।
करून वसुंधरेचे संरक्षण ।
सृष्टी माता निसर्ग पिता ॥
तेच आपले जीवनदाता ॥
– डॉ. अर्पणा पाटील

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!