कायदा सुव्यवस्थेसाठी हवे सर्वांचे योगदान ; ‘एनसीएफ’तर्फे आयोजित संवाद सत्रात पोलीस आयुक्तांचे प्रतिपादन

0

नाशिक : शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आपली नाही असे म्हणण्याची मानसिकता बदलण्याची तयारी सर्वच समाजघटकांनी ठेवली पाहिजे. हक्कांबरोबरच प्रत्येकाने कर्तव्य पार पाडले पाहिजे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी केले. नाशिक सिटीझन्स फोरमतर्फे आयोजित संवाद सत्रात ते बोलत होते.

सदर संवाद सत्रासाठी निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मंगेश पाटणकर, ‘आयमा’चे राजेंद्र अहिरे, ‘नाईस’चे अध्यक्ष विक्रम सारडा, क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष सुनील कोतवाल, राजन दर्यानी, उमेश वानखेडे, अनिल आहेर, श्रेणिक सुराणा, चारुदत्त नेरकर, निखिल पांचाळ, बार असोसिएशनचे अ‍ॅड. नितीन ठाकरे, अ‍ॅड. जयंत जायभावे, अ‍ॅड. जालिंदर ताडगे, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हील इंजिनिअर्सचे विजय सानप, आर्किटेक्ट अ‍ॅण्ड इंजिनिअर असोसिएशनचे सचिन गुळवे, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचे नरेंद्र बिरार, द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्सचे प्रदीप काळे, लघुउद्योग भारतीचे एम. जी. कुलकर्णी, नाशिक स्कूल्स असोसिएशनचे सचिन जोशी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी पोलीस आयुक्तांसमोर शहराशी संबंधित प्रश्नांवर आपापली मते मांडली. संबंधित प्रश्नांवर बोलताना डॉ. सिंघल म्हणाले, शहरातील समस्या सोडवणासाठी पोलीस, महापालिका, हायवे अ‍ॅथोरिटी, आऱटीओ या विभागांमध्ये समन्वयाची गरज आहे. समस्यांमधील जे विषय पोलिसांशी संबंधित आहेत त्यावर निश्चितच काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यासाठी लोकसहभाग, लोकशिक्षण आणि जागरुकता निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याबाबतचा आराखडा तयार असून तो वरिष्ठ पातळीवर पाठवला आहे. शहरात थ्रीडी झेब्रा क्रॉसिंग तयार करण्याबाबतही त्यांनी अनुकूलता दाखवली. नाशिक सिटीझन्स फोरमच्या माध्यमातून एकत्र आलेल्या संघटनांनी शहरातील समस्या सोडवण्यासाठी दबाव गट तयार करून यंत्रणेकडून काम करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यापूर्वी नाशिक सिटीझन्स फोरमचे सचिव नरेंद्र बिरार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर फोरमचे अध्यक्ष सुनील भायभंग यांच्या हस्ते डॉ. सिंघल यांचा सत्कार करण्यात आला. फोरमचे माजी अध्यक्ष जितेंद्र ठक्कर यांनी फोरमच्या कामाचा आढावा सादर केला. डॉ. नारायण विंचूरकर यांनी शहरातील वाहतुकीबाबत विवेचन केले.

या समस्यांवर झाली चर्चा : यावेळी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी शहरातील वाहतूकविषयी समस्या मांडल्या. यामध्ये रिक्षांमध्ये रिक्षाचा नंबर, परमीट नंबर व इतर माहिती असावी. मोठ्या चौकांमध्ये, सिग्नल्सवर सीसीटीव्हीद्वारे वाहतुकीचे नियमन करावे. नियमभंग करणार्‍यांना घरपोच दंडाची पावती दिली जावी.

टूरिस्ट बसेसला शहरात प्रवेश न देता त्यांच्या पार्किंगसाठी महामार्गालगतच जागा निश्चित करून दिली जावी. शाळांबाहेरील हॉकर्सच्या गर्दीमुळे होत असलेल्या वाहतूककोंडीवर नियंत्रण आणावे. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर गार्ड स्टोन लावून पायी जाणारे आणि सायकलिस्ट यांच्यासाठी एक स्वतंत्र मार्गिका तयार केली जावी. परराज्यातील भाविकांच्या वाहनांची अडवणूक होऊ नये.

महापालिकेने ट्रॅफिक इंजिनिअरची जागा निर्माण करून सक्षम अधिकारी नियुक्त करावा. औद्योगिक वसाहतींमध्ये रस्त्यावर होणार्‍या पार्किंगमुळे निर्माण होणार्‍या समस्यांकडे लक्ष दिले जावे. शाळांजवळ चाईल्ड फ्रेंडली थ्रीडी स्पीडब्रेकर्स निर्माण करावेत.

LEAVE A REPLY

*