कामचुकार लोकसेवकांच्या निषेधार्थ तळतळाट आंदोलन

0
महिलांनी बोट मोडून मारल्या बोंबा; घरकूल वंचितांचे अर्ज गहाळ प्रकरण
अहमदनगर (प्रतिनिधी) – पंतप्रधान आवास योजनेसाठी घरकूल वंचितांचे जमा केलेले अर्ज गहाळ झाल्याने कामचुकार लोकसेवकांच्या निषेधार्थ मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तळतळाट शाप तांडव आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी महिलांनी बोट मोडून लोकसेवकांच्या निषेधार्थ बोंबा मारल्या.
आंदोलनात अ‍ॅड.कारभारी गवळी, प्रकाश थोरात, बाबा शेख, अंबिका नागुल, अर्चना आढाव, निर्मला पेंढारे, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, हिराबाई ग्यानप्पा आदींसह शहर व उपनगरातील घरकूल वंचित सहभागी झाले होते.
केंद्र शासनाने घोषित केलेल्या पंतप्रधान आवास योजनेसाठी शहर व उपनगरातील 17 हजार घरकूल वंचितांनी महापालिकेत अर्ज जमा केले होते. हुतात्मा स्मारक येथे त्या अर्जांची छाननी चालू असून सदर काम एका खाजगी एजन्सीला देण्यात आले आहे.
एजन्सीकडे अपूर्ण मनुष्यबळ, अद्यावत यंत्रणा व मनपाचा सक्षम अधिकारी नसल्याची तक्रार संघटनेच्यावतीने करण्यात आली होती. मात्र घरकूल वचितांचे अर्ज सापडत नसल्याने मनपा प्रशासन व एजन्सीच्या गोंधळी कारभाराने पुन्हा घरकूल वंचितांना प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
घरकूल वंचितांना हक्काची घरे मिळण्यासाठी तीन वर्षांपासून संघटनेच्यावतीने शासन दरबारी पाठपुरावा चालू असून अद्याप 72 आंदोलने करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी व शासकीय नोकर यांनी आत्मकेंद्रीत राहून सार्वजनिक पैशावर डल्ला मारण्याशिवाय दुसरे काम केलेले नाही. कामचुकारपणा व टोलवाटोलवीने सामान्य जनता त्रस्त आहे. एकही घरकूल वंचितांचा प्रकल्प जिल्ह्यासह राज्यात उभा राहू शकलेला नाही. अर्ज गहाळ झाल्याने घरकूल वंचितांमध्ये असंतोषाचे वातावरण असून कामचुकार व भ्रष्ट लोकसेवकांच्या निषेधार्थ तळतळाट व्यक्त करण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी सांगितले.
अर्ज छाननी प्रक्रियेत उडालेल्या गोंधळाला मनपा प्रशासन व नेमलेली एजन्सी कारणीभूत असल्याचा आरोप करत अर्ज गहाळ झालेल्या लाभार्थींना न्याय मिळवून देण्याची मागणी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्याकडे करण्यात आली असून त्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्‍वासन घरकूल वंचितांना दिले.

 

LEAVE A REPLY

*