कापडणीस, ऍड.ढाकेंसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याचा महासभेत ठराव

0

जळगाव | प्रतिनिधी :   बेकायदेशीर टीडीआर देण्यासाठी कट रचून जमिन मालक विलास खडके यांना १८ कोटी रुपयांचा फायदा करुन दिल्याचा आरोप नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केला. दरम्यान महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान व दिशाभूल केल्याप्रकरणी तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस, विधी सल्लागार ऍड.केतन ढाके, तत्कालीन नगररचना सहाय्यक संचालक चंद्रकांत निकम, ऍड.व्ही.डी. गुणाले व जमिन मालक विलास खडके यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आला.

मनपाची महासभा महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर ललीत कोल्हे, आयुक्त जीवन सोनवणे, प्रभारी नगरसचिव डी.आर. पाटील उपस्थित होते.

मेहरुण सर्व्हे नं. ५०९ मधील २ लाख ५० हजार स्क्वेअर फूट या जागेचा जमिन मालक विलास खडके यांना टीडीआर देण्यासाठी कट रचण्यात आल्याचा आरोप कैलास सोनवणे यांनी केला. विलास खडके यांच्या आरक्षित जमीनीचे भूसंपादन केल्यानंतर ४ कोटी ८५ लाख महापालिकेचे वाचविण्याचा देखावा करीत १८ कोटींचा फादा केला. मोबदल्यापोटी जमिन मालक खडके यांच्याकडून ७२ लाख ६० हजार एवढी रक्कम घेणे अपेक्षित होते.

मात्र त्याऐवजी केवळ २५ लाख ९१ एवढी रक्कम घेवून टीडीआर दिला असल्याचा आरोप कैलास सोनवणे यांनी केला. महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी आणि दिशाभूल केल्याप्रकरणी तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस, विधी सल्लागार ऍड.केतन ढाके, तत्कालीन नगररचना सहाय्यक संचालक चंद्रकांत निकम, ऍड.व्ही.डी. गुणाले व जमिन मालक विलास खडके यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत कैलास सोनवणे यांनी मांडला. दरम्यान हा ठराव मंजूर करण्यात आला.

असा मंजूर केला ठराव

बेकायदेशीररित्या टीडीआर दिल्याप्रकरणी महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी. आयुक्तांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा, आयुक्तांनी सर्व कागदपत्रे ताब्यात घ्यावे, न्यायालयात अपिल दाखल करुन कायदेशीर कारवाई करावी.

याप्रकरणात संबंधित असलेल्या सर्व अधिकार्‍यांची विभागीय चौकशी करुन सेवापुस्तकात नोंद करण्यात यावी, दिलेला टीडीआर रद्द करण्यात यावा आणि महानगरपालिकेचे झालेले नुकसान संबंधितांकडून वसुल करण्याबाबतचा ठराव कैलास सोनवणे यांनी महासभेत मांडला. दरम्यान हा ठराव बहुमताने मंजुर करण्यात आला.

अश्‍विनी देशमुख – कैलास सोनवणे यांच्यात तु-तू.. मै-मै

कैलास सोनवणे यांनी टीडीआर प्रकरणातील संबंधित असलेल्या तत्कालीन आयुक्तांसह विधी सल्लागार ऍड.केतन ढाके यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावर अश्‍विनी देशमुख यांनी या प्रकरणात ऍड.केतन ढाके यांचे नाव वगळण्यात यावे, अशी सूचना केली.

यावर कैलास सोनवणे यांनी अश्‍विनी देशमुख यांचे विचार न पटण्यासारखे आहे, असे म्हणताच अश्‍विनी देशमुख यांनी का असा प्रश्‍न विचारल्यानंतर चांगलीच सभागृहात तू-तू.. मै-मै रंगली.

वर्षा खडके – अश्‍विनी देशमुख यांच्यात खडाजंगी

मनपा विधीसल्लागार ऍड.केतन ढाके यांचे नाव वगळण्याबाबत अश्‍विनी देशमुख आणि कैलास सोनवणे यांच्यात तू-तू मै-मै रंगली असतांनाच वर्षा खडके यांनी ऍड.ढाके यांचे तुम्ही वकीलपत्र घेतले आहे का? असा टोला अश्‍विनी देशमुख यांना लगावला.

त्यावर देशमुख संतप्त होत वर्षा खडके यांना वैयक्तीकरित्या तुम्ही बोलू शकत नाही, टीका करु शकत नाही, असे म्हणताच वर्षा खडके आणि अश्‍विनी देशमुख यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

अधिकारी दरोडेखोर

टीडीआर देण्याची प्रक्रिया संशयास्पद आहे. तत्कालीन अधिकार्‍यांनी सेटेलमेंट केली. चोरावर मोर अशी म्हण आहे, परंतु तत्कालीन आयुक्त चोरावर चोर महाचोर अशी नवीन म्हण सार्थ ठरविल्याची टिका करत या संबंधित असलेले अधिकारी दरोडेखोर असल्याचा आरोप करत कैलास सोनवणे यांनी खरपूस समाचार घेतला. तसेच रक्षकच झाले भक्षक असा आरोपही सोनवणे यांनी केला.

LEAVE A REPLY

*