Type to search

ब्लॉग

कानाला कुलूप लावले आहे का?

Share

आपले काय चालले आहे? रस्त्याने अकारण वाजणारे कर्णकर्कश हॉर्न आपल्याला खरेच त्रासदायक वाटत नाहीत की आपण बहिरेच व्हायचे ठरवले आहे? कारणे असोत किंवा नसोत, आपल्यासहित सगळी माणसे सतत हॉर्न वाजवतच असतात. हॉर्न एकदा वाजवून कोणाचे समाधानच होत नाही. काही हॉर्नबहाद्दर एकदा हॉर्नवर बोट ठेवले की काही सेकंद काढतच नाहीच. सबळ कारण असेल तर हॉर्न वाजवणे एकवेळ समजण्यासारखे आहे. तथापि आपण अकारण हॉर्न कुठे कुठे वाजवतो हे पाहायचे का?

लाल सिग्नलवर गाड्या थांबलेल्या असतात. तरीही अनेकांना थांबलेल्या गाड्यांच्या थेट पुढे जाऊन थांबायचे असते. खरे तर सिग्नल मोडूनच पुढे जायचे असते. पण समोर एखादा प्रामाणिकपणे नियम पाळणारा चालक थांबलेला असतो. मग त्याला बाजूला सरकवण्यासाठी अनेक बहाद्दर हॉर्न वाजवतात. वाजवतच राहतात. काही चौकांमध्ये वाहतूक जाम होते. तेव्हा तर हॉर्नचा गजरच सुरू होतो. आपल्या पुढे उभ्या असलेल्या वाहनचालकाला रस्त्यात मुक्काम करायचा असतो का? वाहतूक सुरळीत झाल्यावर तो पुढे सरकणारच नसतो का? आपल्यासारखीच त्यालाही पुढे जायची, घरी जायची घाई नसते का? पण तेवढाही दमधीर आपल्याला का निघत नाही? आजकाल रिक्षाचालकांना नवीनच सवय लागली आहे. बसथांब्यांवरच्या, थांब्याच्या दिशेने चालत जाणार्‍या प्रवाशांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हॉर्न वाजवतात. प्रवाशाने मागे वळून त्यांना हो किंवा नाही म्हणेपर्यंत कित्येक रिक्षाचालक हॉर्न वाजवतच राहतात.

नाशिकच्या चौकाचौकांत पोरासोरांची हॉर्न वाजवत दुचाक्या वेगात चालवायची फॅशनच आली आहे. आपण कुठे कुठे अकारण हॉर्न वाजवतो याची यादी मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाईल. आपल्याच हॉर्नबाजीमुळे आपल्या कानांचे भजे होत आहे आणि सतत वाजणारे हॉर्न हेदेखील ध्वनिप्रदूषणाचे महत्त्वाचे कारण आहे, हे आपल्या का लक्षात येत नाही?

रात्री झोपताना आपल्या कानात शिट्टी वाजते का? कर्णकर्कश आवाज ऐकताना कानावर हात ठेवावेसे वाटतात का? फक्त मोठ्याने बोललेलेच आपल्याला ऐकू येते का? फोन कानाला लावून बोलताना कानात दुखते का? कानात तासन् तास हेडफोन घालून बसतो का? याचे उत्तर हो असेल तर मग आपण काळजी घेतली नाही तर काही काळाने आपले कान कायमचे बंद होणार आहेत, अजून तरी कान बदलून मिळत नाही. त्यामुळे तेव्हा आपण कायमचे बहिरे होणार आहोत हे समजून चाला. डॉक्टरांनी ध्वनिप्रदूषण आणि कानाच्या बहिरेपणाचा कितीही संबंध समजावून सांगितला असला, आपल्या कानात खरेचच शिट्टी वाजायला लागली असली आणि कानठळ्या बसल्या की कानाचा लोचा होतो हे आपल्याला माहिती असून काय उपयोग आहे? कारण आपण बहिरेच व्हायचे ठरवले आहे त्याला कोण काय करणार? आपण आपल्या कानाला कुलूप लावले आहे का? आपणच वाजवलेला कर्णकर्कश हॉर्न आपल्याच कानाला त्रास देत नाही का? की आपण बहिरेच व्हायचे ठरवले आहे?
वैशाली सोनार (शहाणे)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!