Type to search

आरोग्यदूत

काचबिंदू

Share

डोळ्याच्या आतील गोल भागात एक पातळ पदार्थ असतो. त्याच्याद्वारे डोळ्यातील सर्व भागात पोषक पदार्थ पोचवले जातात. (या पातळ पदार्थाला ‘ऍक्विअस ह्युमर’ असे नाव आहे.) ही नीटपणे वाहण्याची क्रिया (ड्रेनेज सिस्टिम) बिघडली की, त्याचा दाब वाढतो. या पातळ पदार्थाच्या वाढलेल्या दाबामुळे जो रोग होतो, त्याला काचबिंदू असे नाव आहे. जवळचे पाहण्यास त्रास असणारे लोक किंवा ६० वर्षांवरील व्यक्ती यांच्यात हा पातळ पदार्थ बाहेर जाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हा पदार्थ आतल्या आत साठत राहतो. त्याचा दाब वाढल्यामुळे डोळ्यातील नाजूक भागांचा नाश होतो. या पातळ पदार्थांचा वाढलेला दाब व त्यामुळे नष्ट झालेले नाजूक भाग यामुळे दृष्टी मंद होऊ शकते. एका डॉक्टरांनी त्याला फार छान उपमा देऊन त्याचे वर्णन केले आहे. हिरवळीवर जर बरेच दिवस एखादा जड दगड ठेवून दिला. तर त्याच्याखालील हिरवळ अशी नष्ट होईल. तसेच डोळ्यातील वाढीव दाब दृष्टी नष्ट करेल.

मोतीबिंदू व काचबिंदू
मोतीबिंदू हा काचबिंदूपेक्षा अधिक प्रमाणात आढळतो. मोतीबिंदूत भिंगामध्ये भुरेपणा येतो तर काचबिंदूमध्ये डोळ्याच्या सर्वात पुढे असलेल्या नेत्रपटलाला (काचेला) भुरेपणा येत असल्याने त्याला काचबिंदू म्हणत असावेत. काचबिंदूचे अनेक प्रकार आहेत. हळूहळू वाढणारा व ऍटॅकमध्ये येणारा हे दोन प्रकार महत्त्वाचे आहेत. एवढेच काय दुर्लक्षित मोतीबिंदूही काही वेळा काचबिंदू निर्माण करू शकतो. त्यामुळे उतार वयात दृष्टी मंद होण्याचे कारण केवळ मोतीबिंदूच नव्हे, तर दोन्हीही कारणे असू शकतात.
संध्याकाळच्या मंद प्रकाशात कमी दिसणे, डोळा दुखणे, लाल होणे, डोके दुखणे, मळमळ, उलट्या होणे अशी लक्षणे होतात. काही वेळाने बरे वाटते. असे ऍटॅक वरचेवर येणे. दुसर्‍या डोळ्यातही त्रास होणे असे होऊ शकते. अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरी तपासणी करून घ्यावी. डोळ्यातील वाढलेला दाब केवळ दोन बोटांनीही तपासून डॉक्टरांना कळू शकतो. शिवाय टोनोमेट्री या यंत्रानेही दाब तपासता येतो.

जीवनपद्धती म्हणून स्वीकारा
ज्याप्रमाणे रक्तदाब एकदा वाढला की, सहसा तो आयुष्यभराचाच सोबती होतो. तसेच काचबिंदूचे आहे. त्याच्यावरील उपचारात दाब कमी करण्याच्या गोळ्या व डोळ्यात टाकायच्या थेंबांचा उपयोग करावा लागतो. डोळ्याच्या दाबाची तपासणी व उपचार नेहमीची जीवनपद्धती म्हणून स्वीकारावे लागतात. डोळ्यातील द्रव सतत २४ तास बनत असल्यामुळे त्याला वाहून नेणारे आयड्रॉप्सही नियमित वेळाने टाकावे लागतात. दिवसातून २ वेळा टाकायचे थेंब शक्यतो १२ तासांच्या अंतराने ३ वेळा सांगितलेले ८ तासांच्या अंतराने टाकावेत. थेंब टाकल्यानंतर २ मिनिटे डोळे मिटून पडून राहावे. डोळ्याच्या नाकाकडील भागाच्या कोपर्‍यावर बोटाने हलकासा दाब दिल्याने थेंब लगेच नाकात वाहून न जाता डोळ्यात चांगले शोषले जातात.

चकाकणारे सर्वच सोने नसते.
या म्हणीप्रमाणे लाल दिसणारा प्रत्येक डोळा ‘आलेला’च असतो असे नाही. काचबिंदूनेही डोळा लाल होणे हे लक्षण असू शकते. डोळ्याचा कुठलाही ड्रॉप केवळ उपलब्ध आहे म्हणून स्वत:हून वापरू नये. विशेषत: स्टिरॉइडयुक्त थेंबांनी तर काचबिंदू आणखी बळावू शकतो. पोटदुखीवरील ऍट्रोपीनयुक्त औषधांनीही काचबिंदू वाढू शकतो. गोळ्या व थेंबांनी बरे न वाटल्यास डॉक्टर कृष्ण पटलाला छेद करून ड्रेनेज सुधरवणार्‍या शस्त्रक्रियेचा सल्ला देतील.
डॉ. विकास गोगटे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!