कांदा विकण्याची घाई करू नका- बाफना

0

राहुरी (तालुका प्रतिनिधी) – उन्हाळी कांदा शेतातून तयार होऊन बाहेर बाजारात येत असताना मागील वर्षीच्या अनुभवातून शेतकरी कांदा मातीमोल भावाने उत्पादन खर्च निघत नसतानाही विकत असल्याने मोठे नुकसान होत आहे. परंतु येत्या जूनपासून 700 ते 1 हजार रुपयांपर्यंत बाजारभाव गाठतील. त्यासाठी चांगल्या प्रतीचा कांदा विकण्याची घाई करू नये, असे आवाहन ज्येष्ठ कांदा व्यापारी व राहुरी बाजार समितीचे संचालक सुरेश बाफना यांनी केले आहे.

 
ते म्हणाले, मागील दोन वर्षापूर्वी शेतकरी हजार ते दीड हजार रुपयांनी कांदा विकत असताना कांद्याला अभूतपूर्व तेजी येणार असे सांगीतले होते. मागील वर्षीपेक्षा यंदा 40 टक्के कांदा लागवड कमी आहे. दहा वर्षातील सरासरीपेक्षा जादा लागवड यंदा होणार आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या भाववाढीमुळे गेल्या वर्षी रांगडा कांदा स्टॉकमध्ये गेला होता. रांगडा कांद्याचा स्टॉक यावेळी झालेला नाही. डिसेंबरमध्ये झालेल्या कांद्याचे उत्पादन हवामानाने साथ दिल्याने चांगले मिळाले आहे. पावसामुळे जमिनी तयार न झाल्याने यावेळी जानेवारी महिन्यातही मोठ्या प्रमाणावर लागवडी झाल्या. परंतु त्या कांद्याला चांगली प्रत नसल्याने व मागील वर्षीच्या साठवणुकीच्या अनुभवामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात एकत्रितपणे विक्रीस येत असल्याने बाजारभाव पडले आहेत.

 

हिच परिस्थिती संपूर्ण देशातील बाजारपेठेतील आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना 100 ते 400 रुपये एवढ्या मातीमोल भावाने विक्री करावी लागत आहे.

 
या हंगामात बिहार, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, या राज्यात कांदा लागवड कमी झालेली आहे. मागील वर्षी याच राज्यातील कांद्यामुळे आपल्या राज्यातील कांद्याला दक्षिणेतच बाजारपेठ नसल्याने भाव पडले होेते. परंतु आता देशभरात मालाची मागणी आहे. साधारणपणे 60 टक्के मालाची साठवणूक झाली असून जुलैपासून मागणी राहणार आहे. त्यामुळे जुने कांदे विकणार नाहीत, बाजारभाव पडतील, ही भिती निरर्थक असल्याचे बाफना यांनी सांगीतले आहे.

 
दरवर्षी ऑगस्टमध्ये तामिळनाडू, आंध्र, कर्नाटकातून जो माल बाजारात येतो, तो जुन्या स्टॉकच्या बाजारभावाला दणका देतो. मात्र, या राज्यातील परिस्थिती दुष्काळी आहे, मागील वर्षी उत्पादन खर्चही न निघाल्याने तेथील शेतकरी कांदा लागवडीस अनुकूल नाहीत, त्यामुळे शेतकर्‍यांनी नवा माल येऊन ऑगस्टमध्ये बाजारभाव पडतील, अशी भिती बाळगण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

जूनपासूनच कांदा बाजारभाव 700 ते 1 हजार रुपयापर्यंत जाताना भाव सतत उंचावत जातील. चांगल्या टिकावू मालाचा स्टॉक करून ठेवल्यास शेतकर्‍यांना कांद्याचे नक्कीच चांगले पैसे पदरात पडतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला असून ऑगस्ट-सप्टेंबरमधील पावसाच्या परिस्थितीवर तेजी अवलंबून राहणार असल्याचे बाफना यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

*