कांदाप्रश्‍नी शेतकर्‍यांचा रास्ता रोको

रेल्वेच्या रॅकबाबत निफाड, सायखेडा व्यापार्‍यांना सापत्नभावाची वागणूक

0

निफाड| दि.४ प्रतिनिधी- कांदा पाठवण्यासाठी वॅगन मिळत नसल्याच्या निषेधार्थ व्यापारी वर्गाने लिलावात सहभाग न घेण्याचा निर्णय घेत कांदा लिलाव बंद पडल्याने संतप्त शेतकर्‍यांनी काल शनिवारी दुपारी १२ वाजता निफाड बाजार समिती प्रवेशद्वारासमोरील चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले.

अचानक झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी शेतकर्‍यांच्या वतीने बाजार समितीच्या प्रशासन मंडळाने निफाडचे तहसीलदार विनोद भामरे यांना निवेदन देवून कांदा पाठविण्यासाठी रॅक उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

शनिवारी खेरवाडी (ता. निफाड) रेल्वे स्थानकावर ५८ डब्यांची रेल्वे वॅगन उभी करण्यात आली होती. मात्र या वॅगनमध्ये सायखेडा व निफाडच्या कांदा व्यापार्‍यांसाठी जागा नसल्याचे कारण देत त्यांना कुठलाही डबा उपलब्ध करून न दिल्यामुळे संतप्त झालेल्या व्यापार्‍यांनी कांदा लिलावात सहभाग न घेण्याचा निर्णय घेत अचानक लिलाव बंद केले.

परिणामी कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत निफाड बाजार समिती समोरील चौफुलीवरच ठिय्या मांडला. यावेळी निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक गिर्‍हे यांनी शेतकरी व व्यापारी वर्गाच्या भावना समजावून घेत हा मार्ग सामोपचाराने सोडविण्याचा सल्ला बाजार समिती प्रशासन व शेतकरी, व्यापारी यांना दिला.

काल या आंदोलनाप्रसंगी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती सुभाष कराड, संचालक तथा जि.प. सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, निफाडचे उपनगराध्यक्ष जावेद शेख, शिवसेना शहरप्रमुख संजय कुंदे, नगरसेवक दिलीप कापसे यांचेसह विलास पोटे, बाळासाहेब होन, प्रकाश रायते, संजय कुटे, केदारनाथ रोटे, शंकर सानप, भाऊसाहेब चव्हाण, बाळासाहेब चव्हाण,

ज्ञानेश्‍वर सानप, निवृत्ती सुपेकर, कैलास सोनवणे, सुभाष गुजर, गणेश सानप, बाळासाहेब कणसे, सागर कोल्हे, किरण ढावले, संदीप खापरे, सुनील डावरे आदी शेतकर्‍यांसह व्यापारी वर्गाचे वतीने दीपक भुतडा, अजय सोनी, पुष्पक रुणवाळ, विजय रुणवाळ, हरिभाऊ सानप, राजेंद्र दायमा, रवी परदेशी, आनंद भुतडा, महेश कमानकर, परेश ठक्कर, योगेश बुब, शैलेश बुब आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान बाजार समिती प्रशासन,

शेतकरी तसेच व्यापारी यांनी बाजार समितीच्या हॉलमध्ये सविस्तर चर्चा करुन त्यावर उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिल्याने दुपारनंतर लिलाव प्रक्रिया सुरळीत झाली. आंदोलनाप्रसंगी निफाड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

वॅगनसाठी व्यापारी खेरवाडी रेल्वे स्थानकावर
रेल्वे प्रशासनाकडून नियोजनाची गरज
शेतकर्‍यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन
आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प

कांदा पाठवण्यासाठी रॅक मिळत नाही
विशेषत: सायखेडा व निफाडच्या व्यापार्‍यांना कांदा पाठविण्यासाठी रॅक मिळत नाही. आमचा कांदा खळ्यावर पडून आहे. रॅक मिळवण्याबाबत दुजाभाव केला जातो. रेल्वे विभागाने रॅक वाढविणे गरजेचे आहे.

तसेच निफाडसाठी किमान १० तर सायखेड्यास १८ रॅक मिळावयास पाहिजे. मात्र रॅकच मिळणार नसेल तर आम्ही कांदा कसा पाठवायचा. त्यामुळे याबाबत लवकर निर्णय घेवून आम्हाला रॅक मिळावी. शेतकरीहित डोळ्यासमोर ठेवून आम्ही लगेच लिलाव सुरू करीत आहोत.
अजय सोनी, दीपक भुतडा, कांदा व्यापारी (निफाड)

शेतकर्‍यांना वालीच नाही
आम्ही सकाळपासून आलो. आता अचानक लिलाव बंद झाले. एकतर शेतीमालाला भाव नाही. त्यात बाजारात माल ने-आण करण्याचा खर्च परवडत नाही आणि पुन्हा लिलाव बंद पडून असे हाल होतात. शेतकर्‍यांचा खरच कोणी वाली नाही. निदान शेतीमालाला भाव देवून लिलाव कायमचे चालू राहिले पाहिजे.
संतोष गुजर, कांदा उत्पादक शेतकरी

रॅकचे नियोजन करणे गरजेचे
कांदा पाठवण्यासाठी जर येथील व्यापार्‍यांना रॅकमध्ये जागा मिळत नसेल तर त्यांनी माल टाकायचा कोठे. त्यामुळे रेल्वे विभागाने रॅक वाढवून त्याचे नियोजन केले पाहिजे. तसेच लोकल व्यापार्‍यांना जागा दिली पाहिजे. जो व्यापारी ऑनलाईन अगोदर पेमेंट भरेल त्याला प्रथम प्राधान्य या न्यायाने सर्वांसाठी कांदा रॅक उपलब्ध करून द्यावी जेणेकरून मालाचा उठाव होवून लिलाव प्रक्रिया सुरळीत होईल.
जयदत्त होळकर, सभापती लासलगाव कृउबा

LEAVE A REPLY

*