काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षाची निवडणूक लांबणीवर

0

सभासद नोंदणी सुरूच : 15 मेपर्यंत अंतिम यादी

अहमदनगर (प्रतिनिधी) – काँग्रेस पक्षांतर्गत 15 मे रोजी होणार्‍या शहर जिल्हाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व ब्लॉक कमिटी अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. सभासद नोंदणीला प्रदेश समितीने मुदतवाढ दिल्याने पक्षांतर्गत पदाधिकारी निवडणूक लांबणीवर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रदेश समितीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी 15 मे पर्यंत शहर जिल्हाध्यक्ष, बॉल्क अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष ग्रामीण यांच्या निवडणुका घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार नगर शहरात व जिल्ह्यात इच्छुकांची लगबग सुरू झाली. मात्र सभासदांची नोंदणी नगण्य असल्याने नोंदणीला प्रदेश समितीने मुदतवाढ दिली.
नगर शहर विधानसभा मतदारसंघात 253 बुथ आहेत. प्रत्येक बुथवर किमान 60 टक्के (240) सभासद नोंदणी आवश्यक आहे. मात्र हा आकडाही शहर काँग्रेसला गाठता आलेला नाही. आता नव्याने नोंदणी सुरू असून 14 तारखेला नोंदणीची गोळाबेरीज  केली जाईल. त्यानंतर मतदारांची यादी प्रदेश समितीला सादर केली जाणार आहे. प्रदेश समिती नगर शहर जिल्हा व ग्रामीण मतदारांची (सभासदांची) प्राथमिक यादी जाहीर करतील. त्यानंतर पक्षाकडून निवडणूक निरीक्षक नियुक्त केला जाईल. तेथून पुढे निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

  जिल्ह्यात तसेच नगर शहरातही काँग्रेस माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व माजी मंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटात विभागली गेली आहे. संघटनेवर आपली पकड असावी यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. थोरात गटाचे समजले जाणारे नगरसेवक दीप चव्हाण यांच्याकडे नगर शहर जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे आहेत. ही सूत्रे आपल्या ताब्यात घेण्यासाठी आता विखे समर्थकांनीही कंबर कसली आहे.

LEAVE A REPLY

*