Type to search

ब्लॉग

काँग्रेसची धूर्त व्यूहरचना

Share

कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमधल्या काँग्रेसजनांनी राहुल यांना आपल्या राज्यातून निवडणूक लढवण्याचे निमंत्रण दिले. राहुल यांनी मात्र वायनाडची निवड केली. वायनाड केरळमध्ये असले तरी त्याच्या सीमा कर्नाटक आणि तामिळनाडूला चिकटलेल्या आहेत.

त्यामुळे इथे निवडणूक लढल्यावर संपूर्ण दक्षिण भारतात प्रभाव टाकता येऊ शकतो. दक्षिणेत राहुल यांची लोकप्रियता वाढली आहे. त्याचा फायदा घ्यायचे धोरण काँग्रेसने राबवले. अलीकडे देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेला वायनाडचा परिसर घनदाट जंगले आणि हिरव्यागार भातशेतीने सजला आहे. अर्थात, अद्याप इथे विकास पोहोचलेला नाही. 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत वायनाड लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. त्यात वायनाड आणि मलपुर्रम या जिल्ह्यातले प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघ आणि काझिकोडे जिल्ह्यातला एक असे सात मतदारसंघ आहेत. मुस्लीमबहुल असणार्‍या या मतदारसंघात मुस्लीम लीग काँगे्रससोबत आहे.

हा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो. 23 एप्रिलला पार पडलेल्या या मतदारसंघातल्या निवडणुकीपूर्वी कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या तीनही राज्यांमधल्या काँग्रेस नेत्यांनी राहुल यांना आपल्या राज्यातून निवडणूक लढवण्याचे निमंत्रण दिले होते. राहुल यांनी मात्र वायनाडची निवड केली. वायनाड केरळमध्ये असले तरी त्याच्या सीमा कर्नाटक आणि तामिळनाडूला चिकटलेल्या आहेत. त्यामुळे इथे निवडणूक लढल्यावर संपूर्ण दक्षिण भारतात प्रभाव टाकता येऊ शकतो. दक्षिणेत राहुल यांची लोकप्रियता वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये त्यांचे फॅन फॉलोईंग वाढले आहेत. काँग्रेसला या लोकप्रियतेचा फायदा उठवायचा होता. 35 टक्क्यांपेक्षा अधिक मुसलमान, 10 टक्के ख्रिश्चन, तितकेच आदिवासी अशा सामाजिक गणितामुळे वायनाड राहुल यांच्यासाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ बनला.

युवा नेतृत्व म्हणून राहुल गांधींकडे आशेने बघणार्‍यांची संख्या वाढत आहे. व्यक्तिमत्त्वातला बदल आणि वृत्तीत नेत्याला शोभेल अशी आक्रमकता आणत त्यांनी विरोधकांच्या ‘अप्रगल्भ नेता’ या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. देशभर दौरे करत त्यांनी मरगळलेल्या काँग्रेसच्या बदलत्या रूपाची चुणूक दाखवून दिली. अद्याप त्यांच्या ठायी काही मर्यादा दिसत असल्या तरी त्यांच्या या पवित्र्याने या पक्षात नवा उत्साह सळसळत आहे. प्रचाराच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी राफेल करारात आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा महत्त्वपूर्ण बनवला होता. इतकेच नव्हे तर त्याबाबत पंतप्रधानांना दोषी धरले होते. याचाच एक भाग म्हणून ‘चौकीदार चोर है’ या शीर्षकाखाली देशव्यापी मोहीम राबवून भाजपच्या नाकी नऊ आणले होते. पण न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानंतर तातडीने माफी मागून नरेंद्र मोदी यांना पुन्हा चोर म्हणणार नाही असे स्पष्ट आश्वासन दिले आणि चूक मान्य केली. त्यांची ही कृतीदेखील विचारी नेतृत्वाची झलक दाखवून गेली.

अमेठी हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ. गेल्या निवडणुकीत मोदी लाट असूनही राहुल गांधी यांनी तिथून विजय मिळवला. स्मृती इराणी यांनी राहुल यांच्याविरोधात जोरदार लढत दिली. मात्र पराभूत झाल्यानंतरही त्यांचा मागील पाच वर्षांमध्ये या मतदारसंघात चांगला संपर्क आहे. साड्या वाटणे अथवा वेगवेगळ्या योजनांच्या अंमलबजावणीतही त्यांचा महत्त्वाचा वाटा बघायला मिळतो. आताही त्या पुन्हा एकदा राहुल गांधींच्या विरोधात उभ्या आहेत. राहुल तिथून निवडणूक लढवत असतानाच केरळमधल्या वायनाडमधूनही निवडणूक लढवत होते. यावरून पराभवाला घाबरून त्यांनी पळ काढला, अशी टीका भाजप करत राहिला तरी राहुल यांच्या वायनाडमधील उमेदवारीमागे जाणून घेण्यासारखी अनेक कारणे होती. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे राहुल यांच्या वायनाडमधल्या उमेदवारीने डाव्यांपेक्षाही भाजपमध्येच जास्त अस्वस्थता पाहायला मिळाली.

उत्तर भारतात भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप दक्षिण दिग्विजयाला निघाला होता. मात्र राहुल यांची दक्षिणेतली उमेदवारी या दिग्विजयातला गतिरोधक ठरण्याची शक्यता होती. ही भीती असल्यामुळेच भाजपने राहुल यांच्यावर टीका केली. राहुल वायनाडमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले असताना झालेली गर्दी आश्चर्यचकित करणारी होती. आजवर कधीच चर्चेत नसणारा हा मतदारसंघ आपण का निवडला, याचे उत्तर स्वतः राहुल यांनीच दिले. ‘उत्तर भारत असो, ईशान्य भारत असो वा दक्षिण भारत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप इथली संस्कृती आणि इतिहास उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात होते. मोदी देशातल्या संवैधानिक संस्थांना इजा पोहोचवत आहेत. त्यांना आव्हान देण्यासाठी मी उत्तर भारताबरोबरच दक्षिण भारतातूनही लढलो. भारत एक आहे, हा संदेश देण्यासाठी मी केरळमध्ये गेलो,’ असे त्यांनी सांगितले. पण राहुल सांगताहेत त्यावर भाजपवाल्यांचा अजिबात विश्वास नाही. वर्ध्यात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल यांचे नाव न घेता टीका केली होती. शेवटी ते हिंदूंची संख्या कमी असणार्‍या मतदारसंघातच निवडणूक लढायला गेले, अशी मोदींची टीका होती. दक्षिण विजयासाठी महत्त्वपूर्ण अशा केरळमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी सुरू असलेली भाजपची जद्दोजहद अनेकार्थाने विचारात घेण्याजोगी आहे. या भागातले प्रश्न, राजकीय संस्कृती आणि सामाजिक रचना या सगळ्याचाच या निमित्ताने मागोवा घेता येईल. केरळमधले राजकीय अवकाश व्यापले आहे ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत डावी आघाडी (एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडी (युडीएफ) यांनी. याच आघाड्या राज्यात आलटून-पालटून सत्तेवर येतात. तिथे स्थान मिळवण्यासाठी भाजप काही वर्षांपासून प्रयत्नरत आहे, परंतु त्याला फारसे यश मिळालेले नाही. अर्थात, असे असले तरी 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत पक्षाला मिळालेल्या मतांची टक्केवारी 7 टक्क्यावरून साडेदहा टक्क्यांवर पोहोचली होती. या पक्षासाठी हे शुभसंकेत होते आणि या निवडणुकीत टक्केवारीचे हे आकडे आणखी पुढे नेणे हे त्यांचे उद्दिष्ट असणार आहे. मध्यंतरी उद्भवलेल्या शबरीमाला मंदिराच्या वादानेही या भागातली राजकीय, सामाजिक आणि धार्मिक परिस्थिती प्रभावित केली. भगवान अयप्पा मंदिरात महिलांना प्रवेश दिला पाहिजे या मागणीसाठीच्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा आणि हक्काचा विचार उचलून धरत मंदिराची दारे खुली करण्याचा आदेश दिला. या प्रश्नाच्या निमित्ताने केरळमधले सार्वजनिक जीवन ढवळून निघाले. त्या लाटेवर स्वार होण्याचा आटापिटा काँग्रेस आणि भाजप अशा दोघांनीही सुरू ठेवला. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे यात्रा आयोजित करून या प्रश्नावर रान उठवले.

राहुल गांधी यांनी इथल्या मंदिरांमध्ये केलेल्या पूजा, त्या पद्धतीची वस्त्रे नेसून केलेली अर्चना हा काँग्रेसच्या व्यूहरचनेचाच एक भाग म्हणता येईल. राहुल स्वत:च वायनाडमध्ये उभे राहिल्यामुळे केरळमध्ये निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आणि सर्व जिल्ह्यांमधले पक्षाचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांना प्रचार कार्यक्रम ठरवून दिला गेला. पक्षाचे सचिव मुकुल वासनिक यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बैठक घेत निवडणुकीसाठीचा कार्यक्रम ठरवून दिला आणि त्याबरहुकूम कृती कार्यक्रम राबवला जाऊ लागला. काँग्रेसने केरळमध्ये ‘होम टू होम’ मोहीम राबवली. दुसरीकडे अलीकडे उत्तर भारतात राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भाजपची हार झाल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांना धक्का बसला होता. हा पराभव भरून काढण्यासाठी तेही इतर काही राज्यांप्रमाणे केरळमध्ये शिरकाव करण्याच्या प्रयत्नात होते. शबरीमाला मंदिर प्रवेशावरून सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात भूमिका घेण्यापर्यंत भाजपची मजल गेली. हिंदूंचे संघटन करून मतांचे ध्रुवीकरण करण्यावर भाजपचा भर राहिला. इथे राहुल गांधी यांची लढत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवाराशी होती, तर भारतधर्म जनसेना म्हणजेच बीडीजेएस या मित्रपक्षाचे प्रमुख तुषार वेलापल्ली यांना भाजपने इथून मैदानात उतरवले. त्यांनीच हा पक्ष उभारला आहे. त्यांनी शबरीमाला प्रकरणात महिलांच्या मंदिर प्रवेशाला प्रखर विरोध केला होता.

राहुल गांधी यांनी वायनाडमधून उमेदवारी जाहीर केल्याबरोबर माकपचे नेते प्रकाश करात यांनी नाराजी व्यक्त केली. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दंड थोपटले. आमच्याविरोधात लढून तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता? असा राहुल यांना डाव्यांचा प्रश्न होता. डाव्या आघाडीत वायनाडची जागा सीपीआयला सुटली. तिथे त्यांचे चांगले प्रभाव क्षेत्र आहे. पण मागील काही वर्षांमध्ये सत्ताधारी डाव्यांबद्दल नाराजीचे प्रमाण वाढले होते. या कारणामुळे तसेच राहुल यांचा एकूण प्रभाव पाहता सीपीआय त्यांना मागच्या निवडणुकीसारखी लढत देऊ शकणार नाही, हे गणित पुढे आले होते. या मतदारसंघात काँग्रेसची संघटना उत्तम आहे. तसेच गेल्या दशकभरात या मतदारसंघाची लोकसंख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. ही वाढ शेजारच्या कर्नाटकमधून आलेल्या मजुरांची आहे. हे सगळे काँग्रेस तसेच देवेगौडा यांना मानणारे मतदार होते. त्यामुळे राहुल गांधींना त्याचाही फायदा होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. एकंदरीत वायनाडच्या निमित्ताने काँग्रेस एक धूर्त खेळी खेळण्यात यशस्वी झाला, असे म्हणता येईल.
– अजय तिवारी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!