कलाकारात विचारपरिवर्तन घडवण्याची ताकद : अंकूश शिंदे

मराठा हायस्कूल, ललित कला महाविद्यालय, जयहिंद आर्ट स्टुडिओ विजेयी ; मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण

0

नाशिक : कोणताही कलाकार विलक्षण प्रतिभेचा मालक असतो. ‘देशदूत’ आयोजित उपक्रमांतर्गत चित्रकारांनी आपल्या भावना आणि प्रतिभेचा संगम घालत महिला सक्षमीकरण व इतर विषयांवर आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या चित्रांमुळे महिला सक्षमीकरणास निश्चित मदत होणार आहे.

कलाकारांनी साकारलेल्या चित्रांतून महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. कलाकारांमध्ये मानवी मन आणि विचार बदलण्याची शक्ती असते. ‘देशदूत’च्या माध्यमातून खर्‍या अर्थाने सामाजिक विचार परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी केले.

‘देशदूत’ आयोजित ‘चला जमुनि रंगवूया नाशिक’ उपक्रमाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर मिसेस इंटरनॅशनल मुकुट विजेत्या नमिता कोहोक, मविप्रचे संचालक डॉ. विश्राम निकम, नाशिक सायलिस्ट असोसिएशनच्या डॉ. मनीषा रौंदळ, मविप्रचे शिक्षणाधिकारी एस. के. शिंदे, डॉ. डी. डी. काजळे, गुंज फाऊंडेशनचे संचालक शैलेश वैश्य, परीक्षक बाळ नगरकर व मुक्ता बालिगा, ‘देशदूत’चे संचालक संपादक विश्वास देवकर, कार्यकारी संपादक मिलिंद सजगुरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक गटांतून प्रत्येकी तीन संघांना रोख स्वरुपात बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

शिंदे म्हणाले, ‘देशदूत’चा हा उपक्रम खरोखर स्तुत्य असून त्यामुळे कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. कलाकारांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेली चित्रे लक्षवेधी असून त्यामुळे नवी ऊर्जा मिळून नाशिककरांचे जीवन समृद्ध होण्यास मदत होईल. सामाजिक जीवन समृद्ध करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विवाहपूर्व समुपदेशन, वाहतूक नियमांचे पालन, शेतीच्या प्रश्नांतून निर्माण होणारे वाद आणि जातीय सलोखा राखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मिसेस इंटरनॅशनल नमिता कोहोक यांनी कलाकारांनी साकारलेल्या कलेला दाद देत ही चित्रे खर्‍या अर्थाने नाशिकची शान असल्याचे सांगितले. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणार्‍या नाशिक शहर रंगवण्याची ‘देशदूत’ची ही संकल्पना आगळीवेगळी असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. चित्रकारांनी चित्राच्या माध्यमातून मांडलेल्या भावना, त्यातून निर्माण होणारे आशय मनाला भिडणारे असल्याचे त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकात ‘देशदूत’चे संचालक संपादक विश्वास देवकर यांनी हा उपक्रम नाशिक शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. दैनंदिन घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्याबरोबर सामाजिक बांधिलकी जपत आणि समाज ऋणातून मुक्त होण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम आयोजित केला आहे.

त्याबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन मुलांना कलेचा संस्कार देत रंगरेषांची ही दुनिया जगासमोर मांडण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन रवींद्र केडिया यांनी केले तर आभार ‘देशदूत’चे कार्यकारी संपादक मिलिंद सजगुरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*