कर न भरणार्‍यांवर आता थेट जप्ती

नाशिक तहसीलदारांनी बजावल्या नोटिसा

0

नाशिक | दि. ९ प्रतिनिधी- ३१ मार्चपूर्वी थकित कर न भरल्यास थेट मालमत्तेवर जप्तीचा बोजा चढवण्याचा इशारा तहसीलदारांनी दिला आहे. शहरातील तब्बल ३०० बड्या थकबाकीदारांना तहसीलदारांनी नोटीस काढली आहे.  सध्या ३१ मार्चच्या पार्श्‍वभूमीवर वसुली मोहीम जोरात सुरू आहे. महापालिका, बीएसएनएल, म्हाडा, एमएसईबी, परिवहन महामंडळ, इंडिया सिक्युरिटी प्रेस, मोबाईल टॉवर, लॉन्स, गँरेज, कार मॉल तसेच हॉटेल व्यावसायिकांसह अनेक मोठ्या आस्थापनांकडे थकबाकी आहे.

विशेष म्हणजे कराची वसुली करणार्‍या आणि सर्वसामान्यांना घरपट्टी, पाणीपट्टी भरण्याचा तकादा लावणार्‍या नाशिक महापालिकेनेही महसुली कर भरलाच नाही. या सर्वच थकबाकीदारांना नाशिक तहसीलदारांनी कर भरण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. शहरातील व्यावसायिकांनाही नोटिसा पोहोचल्या आहेत. वर्षभर पाठपुरावा करूनही अनेक खातेदार त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे.

वर्षाअखेरीस त्याची सर्व जुळवाजुळव केली जाते. त्यात नाशिक शहरातील बहुतांशी खातेदारांकडे थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या सर्वांनी ३१ मार्चपूर्वीच कराचा भरणा करावा. अन्यथा या थकबाकीदारांवर १ एप्रिलपासून कारवाई केली जाईल. त्यात मालमत्तेवर जप्तीचा बोजा चढवण्यासह इतरही कारवाई होईल.

ती टाळण्यासाठी आता संबंधित खातेदारांनी त्वरित कर भरावा, असे आवाहन वजा आदेशच नाशिक तहसीलदारांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील तलाठी कार्यालयात त्याचा भरणा करण्याची व्यवस्था केली आहे. कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता गुरुवारी काही शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींनी तहसील कार्यालयात हजेरी लावत लागलीच कर भरण्याबाबत कार्यवाही सुरूही केली. कर भरण्याच्या पद्धतीबाबत त्यांनी विचारणा केली.

LEAVE A REPLY

*