‘कर-नाटकी’ मुर्खपणा!

0
मराठी माणसांवर अन्याय होतो, अशी ओरड सीमा भागातील मराठी जनतेकडून सतत होत असते. स्वतंत्र भारतातील कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर इंग्रजांपेक्षा जास्त जुलूम करते, असे म्हणण्यात थोडाफार प्रचारकी भाग असेल. तथापि त्या म्हणण्याला पुष्टी देणारे नसते उद्योग कानडी सरकारसुद्धा करत असते.
कानडी राज्यकर्त्यांचा मराठी द्वेष कमी का होत नसावा? राज्य पुनर्रचना झाली त्यावर दोन पिढ्या उलटल्या. तरीही परस्पर द्वेषाची भावना कानडी राज्यकर्ते का मिटवू शकले नाहीत? ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेली महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाची बस परवा बेळगावात पोहोचली.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी त्या बससह चालक-वाहकांचे जल्लोषात स्वागत केले. ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दिल्या. त्यात असा कोणता गुन्हा संबंधितांकडून घडला? कानडी पोलिसांनी मात्र त्या निखार्‍यावर तेल ओतण्याचा उद्योग केला.

‘जय महाराष्ट्र’ लिहिलेली बस आणल्याबद्दल चालक-वाहक व त्यांचे स्वागत करणार्‍या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवला. महाराष्ट्रात राहणार्‍या कानडी माणसांवर ‘कानडी बोलू नका’ अशी सक्ती कधी झाली आहे का? मग कर्नाटकात मराठीचा इतका तीव्र द्वेष का असावा? कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास अशा लोकप्रतिनिधींचे पद रद्द करण्यात येईल, तसेच असा कायदा लवकरच करण्याचा इशारा कर्नाटकचा माथेफिरू नगरविकासमंत्री रोशन बेगने नुकताच दिला होता.

महाराष्ट्राचे परिवहन खाते शिवसेनेचे दिवाकर रावते यांच्याकडे आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक एस.टी. बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून बेगच्या कुरापतीला विधायक उत्तर दिले. तशी एक बस बेळगावात दाखल झाली. बेळगावच्या मराठी मंडळींनी तिचे स्वागत केले.

त्याबद्दल तेथील सरकारी यंत्रणेने इतकी अतिरेकी भूमिका का घ्यावी? भाषावार प्रांतरचना झाली म्हणजे देशविभाजन झाले का? कानडी भाषिक नागरिक मराठी द्वेषाचे इतके उघडे प्रदर्शन करून भारतीयत्वाचा कोणता सन्मान करत आहेत? अशा माथेफिरूपणामुळे देशाच्या एकसंघतेला नकळत सुरुंग लावला जात आहे, याची जाणीव कानडी भाषिकांना करून देण्याची जबाबदारी कर्नाटक सरकारची आहे की नाही?

अकारण क्षुल्लक बाबीचे भांडवल करून कानडी मंडळी दक्षिण भारतातसुद्धा काश्मीरची धग पोहोचवत आहेत, याची जाणीव त्यांना कोण करून देणार? या कानडी मुर्खपणाला वेळीच मुरड घालण्याची जबाबदारी वेळीच पार पाडून सूज्ञ कानडी नेते आपल्या शहाणपणाचा परिचय देतील का?

LEAVE A REPLY

*