कर्मचार्‍याने लाच घेतल्यास पोेलीस निरीक्षक नियंत्रण कक्षेत

0

     पोलीस अधिक्षकांचे आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- लाचलुचपतमध्ये पुणे व मुंबईनंतर नगर जिल्हा आघाडीवर आहे. त्यातही जिल्ह्यात पोलीस खाते अव्वल स्थानावर आहे. हा डाग पुसण्यासाठी नव्याने हजर झालेले पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी अधिकार्‍यांना तंबी दिली आहे. जर पोलीस ठाण्यात एखाद्या कर्मचार्‍याने लाच घेतली. तर, त्याला भ्रष्टाचारास जबाबदार धरून नियंत्रण कक्षेत बदली करण्यात येईल असे आदेश जारी केल्याची माहिती गोपनिय सुत्रांनी दिली. त्यामुळे पोलीस निरीक्षकांनी आपले अर्थपूर्ण व्यवहार तात्पुरते बंद केले आहेत. त्यामुळे पोलीस खात्याला सध्या तरी शिस्तीचे वातावरण पहावयास मिळत आहे.
जिल्ह्यातील कोतवाली, तोफखाना, पारनेर, श्रीगोंदा, अकोले, संगमनेर, नेवासा, भिंगार, नगर तालुका, श्रीरामपूर अशा काही पोलीस ठाण्यांत लाचलुचपतचे सर्वाधिक छापे पडलेले आहेत. गेल्या तीन वर्षात 25 पोलीस अधिकारी व कर्मचारी छाप्यात पडले आहेत. 2015 मध्ये 15 पोलीस, 16 मध्ये सात तर 2017 मध्ये तीन अशा 25 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होत असल्याचे चित्र रंजनकुमार शर्मा यांना यांना पहावयास मिळाले आहे.
तीन वर्षात लाचलुचपत विभागाने 80 ठिकाणी सापळे लावून 97 जणांना अटक केली आहे. त्यात सर्वाधिक पोलिसांची संख्या आहे. त्यामुळे खाकीवर पडलेला हा डाग पुसण्यासाठी शर्मा यांनी सर्व पोलीस अधिकार्‍यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. जर एखाद्या पोलीस ठाण्यात कोणत्याही कर्मचार्‍याने किंवा दुय्यम अधिकार्‍याने नागरिकांकडून लाच मागितली, किंवा स्वीकारली तर त्याच्यावर लाचलुचपत प्रनिबंधक विभाग कारवाई करेलच. मात्र, या भ्रष्ट प्रकारास जबाबदार धरून संंबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किंवा सहायक पोलीस निरीक्षक यांचे कोणतेही कारण न एकात त्यांची नियंत्रण कक्षेत बदली करण्यात येईल. असे आदेश शर्मा यांनी काढले आहे.
या प्रकारामुळे पोलीस खात्यात खुलेआम चालणारा भ्रष्टाचार रोखण्यास मोठा हातभार लागणार आहे. वाहतूक शाखा, पोलीस ठाणे, गोपनिय शाखा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोतवाली, तोफखाना, राहुरी, राहाता, कोपरगाव तालुका, अकोले, भिंगार, नगर तालुका, श्रीरामपूर तालुका, अशी काही पोलीस ठाण्यांमधील अटीतटीच्या अर्थपूर्ण तडजोडींना पूर्णपणे स्थगिती देण्यात आली आहे. पोलीस अधिक्षकांच्या या निर्णयामुळे सोकावलेले अधिकारी नक्कीच सुतासारखे सरळ होणार आहे.
पोलीस अधिक्षकाचा पदभार घेतल्यानंतर आलेला प्रत्येक अधीक्षक आपापले फंडे वापरून अधिकार्‍यांची चाचपणी करीत असतो.स्वत:च्या अनुभवाचा वापर करून नवे नियमांची अंमलबजावणी करीत असतो. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पदभार हाती घेतल्यानंतर त्यांनी अधिकार्‍यांची पहिली बैठक घेतली. कोण अधिकारी कसा आहे याचा अभ्यास देखील त्यांनी केला आहे. 30 पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना त्यांनी हद्दीतील सराईत गुन्हेगारांची यादी करण्यास सांगितली आहे.
जिल्ह्याच्या हद्दीच्याजवळ घडणारे दरोडे, रस्तालुटी, टोळ्या यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हॉटेल, लॉज यांच्या याद्या करणे, ते वेळेत बंद करणे, पोलीस ठाण्याचा बीटचा व अन्य आवश्यकता असलेला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करणे, जास्तीत जास्त आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, गुन्हेगारांचे रेकॉर्ड भरून अधिकार्‍यांकडे पाठविणे, विस्कळीत असलेली सीसीटीएनएस प्रणालीची योग्य ती अंमलबजावणी करणे, पोलीस ठाणे, स्थानिक अर्ज, वरिष्ठांचे अर्ज हे मोठ्या प्रमाणात जैसे थे पडलेले आहेत. ते वेळीच निकाली काढण्याचे आदेश शर्मा यांनी दिले आहेत.

प्रशासनाला पारदर्शी करण्याचा प्रयत्न
जिल्हा क्षेत्रफळाच्यादृष्टीने मोठा आहे. त्यामुळे सध्या त्याचा अभ्यास करून योग्य ती भूमिका घेतली जाईल. पोलीस खात्यात पारदर्शीपणा आणण्याचा पहिला प्रयत्न असेल. त्यासाठी अधिकार्‍यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. संघटीत गुन्हेगारी, शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे, सण, उत्सव शांततेत पार पाडणे, ग्रामीण भागात एकात्मता व गुन्हेगारीच्या विरोधात संघटन तयार करणे, शिर्डी, शनिशिंगणापूरसह धार्मिक स्थळांची जोपासना अशा असे अनेक प्रश्‍न मार्गा लावण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज करणार आहे.
– रंजनकुमार शर्मा (जिल्हा पोलीस अधीक्षक)

भ्रष्टाचार संपविण्यासाठी पुढे या
सामान्य नागरिकांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी कोणी लाच मागत असेल तर अशा नागरिकांनी नगरच्या 0241-2423677 किंवा 1064 या मोफत क्रमांकावर लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गोपनिय ठेवले जाईल. पोलीस, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण, सहकार, न्याय, आदिवासी विभाग अशा सरकारच्या कोणत्याही शाखेत लाचेची मागणी होत असेल तर संपर्क साधावा. भ्रष्टाचार संपविण्यासाठी नगररिकांनी पुढे आले पाहिजे.
– विष्णू ताम्हणे (पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत विभाग)

  जिल्हा समजून घेण्यासाठी शर्मा यांना महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे संवेदनशील घटना कळविण्यात विलंब करू नये. असे झाल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल अशी तंबी शर्मा यांनी दिली आहे. नगरमध्ये ग्रामीण भागात पोलीस तत्काळ पोलीस पोहचणे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक गावातील गुन्हेगारीत नसलेले पाच लोक खात्याच्या विश्‍वासात ठेवावेत असा नवा फंडा शर्मा यांनी वापरला आहे. जिल्ह्यात दारू, मटका, जुगार, अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत.

आत्तापासूनच कामाला लागा..  जिल्ह्यात संगमनेर, कर्जत, शेवगाव, नगर शहर, श्रीरामपूर, नेवासा अशा काही ठिकाणी अनेकदा जातीय दंगली, धार्मिक वाद, दोन गटात भांडण, गँगवॉर अशा घटना घडतात. तहान लागली की विहीर खोदायची ही नगर पोलिसांची सवय आहे. ती लक्षात घेता शर्मा यांनी येणारे सण उत्सव शांततेत पार पडावेत, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी आत्तापासूनच कामाला लागा. ऐनवेळी तयारी करू नये असे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात नियोजनाला सुरूवात झाली आहे.

LEAVE A REPLY

*