Type to search

ब्लॉग

कर्नाटकात सरशी कोणाची?

Share
कर्नाटक हे देशातील दुसर्‍या क्रमांकाचे दुष्काळग्रस्त राज्य आहे. स्वाभाविकच निवडणुकीच्या निमित्ताने सरकारच्या शेती आणि शेतकरीविषयक धोरणाची परीक्षा या राज्यात होणे निश्चित मानले जाते. भाजप येथे प्रखर हिंदुत्वाच्या आधारे निवडणुका लढवत असून विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे तोच प्रभाव कायम राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. कर्नाटक हेच भाजपसाठी दक्षिणेकडील राज्यांचे प्रवेशद्वार ठरले असल्यामुळे येथे भाजपने ताकद पणाला लावली असून काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीही मागे हटण्यास तयार नसल्यामुळे लढती लक्षवेधी होणार आहेत.

भारतीय जनता पक्षाकडून गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिणेकडील राज्यांत प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 2014 मध्ये केंद्रातील सत्ता हस्तगत केल्यानंतर पक्षाने विधानसभा निवडणुका आणि शक्य तेवढे अन्य राजकीय डावपेच वापरून देशाच्या पूर्व भागात बस्तान बसवले. परंतु दक्षिण भारताचे कोडे अद्याप भाजपला सुटलेले नाही. गेल्यावर्षी छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या उत्तरेकडील राज्यांत झालेल्या निवडणुका आणि अनेक ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये पराभव स्वीकारायला लागल्यानंतर भाजपची नजर दक्षिण भारतावर स्थिरावली आहे.

उत्तरेत झालेले नुकसान दक्षिणेत दमदार प्रभाव टाकून भाजप भरून काढेल, असे मानले जाते. परंतु तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता फारच धूसर दिसत आहे. त्यामुळे शबरीमाला मंदिर वादाचा मुद्दा उपस्थित करून केरळमध्ये प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला, परंतु केरळमधील वायनाडमध्ये राहुल गांधींनी स्वतःच मुक्काम ठोकून भाजपसाठी अडचण निर्माण केली.

अशा परिस्थितीत भाजपसाठी दक्षिणेकडील राज्यांचे प्रवेशद्वार ठरलेले कर्नाटक राज्यच भाजपचे अंतिम आशास्थान मानले जाते. कर्नाटकच्या प्रवेशद्वारातून भाजप दक्षिणेत दाखल झाला, एवढेच नव्हे तर बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तेथे सरकारही बनवले. परंतु हे यश फार काळ टिकले नाही आणि अंतर्गत कलह, गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचार आदी कारणांमुळे 2011 मध्ये हे सरकार कोसळले. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांची निवडणुकीनंतर आघाडी झाल्याने सरकार स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न पुन्हा धुळीस मिळाले.

कर्नाटकच्या विधानसभेत आजही भाजप हाच सर्वात मोठा पक्ष आहे आणि सत्ता हस्तगत करण्यासाठी अनेक डावपेच खेळत आहे. परंतु हे डावपेच आतापर्यंत तरी यशस्वी झालेले नाहीत.

त्यामुळेच यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील आपले प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी नव्याने पक्ष कार्यरत झाला आहे. परंतु भाजपच्या धोरणांमध्ये कोणतेही नावीन्य दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवरच पक्ष पूर्णपणे अवलंबून असल्याचे दिसते. दुसरे म्हणजे आपला हिंदुत्वाचा मुद्दाच भाजप पुन्हा वापरात आणत आहे. कर्नाटकातील जाहीर सभांमधून नरेंद्र मोदी राष्ट्रवादाचे नारे देत आहेत आणि त्यांच्या भाषणातील अधिकांश वेळ काँग्रेसविषयी बोलण्यातच जात आहे.

2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने कर्नाटकात 17 जागा जिंकल्या होत्या आणि या निवडणुकीत जागा वाढवण्याचा पक्षाचा प्रयत्न असणे स्वाभाविक आहे. अर्थात, 2014 मध्ये मोदींची लाट होती आणि अशा परिस्थितीतसुद्धा मुख्यमंत्री सिद्धरमय्या पक्षाला राज्यात 9 जागा मिळवून देण्यात यशस्वी झाले होते.

अन्य दोन जागा धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या वाट्याला आल्या होत्या. त्यावेळी भाजपने राज्याच्या उत्तर भागात चांगलीच बाजी मारली होती आणि बंगळुरूच्या तीनही जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्येही 2014 च्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. परंतु नोव्हेंबर 2018 मध्ये कर्नाटकातील पक्षाचे ज्येष्ठ नेते अनंतकुमार यांचे कर्करोगाने निधन झाले आणि पक्षाला मोठा धक्का बसला. त्यांच्या पत्नी तेजस्विनी यांना पक्षाकडून तिकिटाची अपेक्षा होती, परंतु पक्षाने त्यांच्याऐवजी तडफदार युवा नेते तेजस्वी सूर्या यांना तिकीट दिले. समाजसेविका म्हणून विख्यात असणार्‍या तेजस्विनी यांच्याऐवजी प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ज्ञात असलेले तेजस्वी सूर्या यांना संधी दिल्यामुळे भाजप आक्रमक हिंदुत्वाच्या आधारेच निवडणुका लढवू इच्छित असल्याचे स्पष्ट झाले. पक्षाच्या या निर्णयामुळे खुद्द तेजस्वी यांनाही धक्का बसला होता, असे सांगितले जाते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) प्रभाव राज्यात नेहमीच जाणवला आहे. आरएसएसचे अनेक नेते मूळचे कर्नाटकातील आहेत. राज्यात संघाच्या अनेक शाखा आहेत आणि नेहमीच्या शाखांव्यतिरिक्त माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांसाठी आरएसएसकडून विशेष शाखाही चालवल्या जातात. बंगळुरूच्या आसपासच अशा प्रकारच्या 150 शाखा भरवल्या जातात. प्रखर हिंदुत्ववादी विचारधारेबरोबरच भाजप या राज्यातील जातीय समीकरणांबाबतही अत्यंत सतर्क आहे. लिंगायत आणि वोक्कालिगा या राज्यातील दोन प्रभावी जाती असून त्यापैकी लिंगायत समाज भाजपच्या अधिक जवळचा मानला जातो. येडियुरप्पा हे याच समाजातील सर्वात मोठे नेते आहेत.

कर्नाटकात यावेळी दोन टप्प्यात लोकसभा निवडणुका होत आहेत. दोन्ही टप्प्यांमध्ये प्रत्येकी 14 मतदारसंघांसाठी मतदान होईल. राज्यात प्रथमच दोन टप्प्यांत निवडणुका होत असून त्याचे आश्चर्य राजकीय विश्लेषकांनाही वाटले आहे. पहिल्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी प्रामुख्याने राज्याच्या दक्षिण आणि मध्य भागातील मतदारसंघांत मतदान होईल. दुसर्‍या टप्प्यातील मतदान 23 एप्रिलला होणार आहे. दक्षिण कर्नाटकात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांची आघाडी अधिक प्रबळ आहे तर उत्तरेकडील भागात भाजपचा प्रभाव आहे.

कर्नाटक हे देशातील दुसर्‍या क्रमांकाचे दुष्काळी राज्य असून पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. त्यामुळे अनेक लोकसभा मतदारसंघांमधील शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. कोणत्या पक्षाकडून आपल्याला सर्वाधिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे, याचा हे शेतकरी सूक्ष्मपणे अभ्यास करताना दिसत आहेत. गेल्या 15 वर्षांतील 12 वर्षे कर्नाटकला दुष्काळाचा

सामना करावा लागला आहे आणि यावर्षीही पाऊस कमी झाला आहे. पीककर्ज योजनेची कमकुवत कार्यवाही, शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करण्यात आलेले अपयश याखेरीज नोटबंदीमुळे झालेल्या त्रासाबद्दलही केंद्र सरकारविरुद्ध संतापाची भावना येथे पाहायला मिळते. अनेक छोट्या शेतकर्‍यांनी आणि भूमिहीन शेतमजुरांनी आपल्या समस्या सौम्य व्हाव्यात यासाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) नावनोंदणी केली आहे.
अर्थात, आकडेवारी पाहिल्यास काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडी कागदावर मजबूत असल्याचे दिसून येते, मात्र भाजपही प्रभाव वाढवण्यासाठीच्या प्रयत्नात कोणतीही कमतरता ठेवत नाही, असे चित्र आहे. याव्यतिरिक्त शेजारच्याच तामिळनाडू आणि केरळ या राज्यांत लोकभावना लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंग्रजीतून भाषण करावे लागत आहे. कर्नाटकात मात्र त्यांना तसे करावे लागत नाही. दुसर्‍या टप्प्याच्या मतदानासाठी उत्तर भारतात मोदी जितके सक्रिय आहेत तितकेच कर्नाटकातही ते प्रयत्न करीत आहेत. कर्नाटकात काँग्रेस आणि भाजप यापैकी कोणताही पक्ष तसूभर बॅकफूटवर जाण्यास तयार नाही. त्यामुळे येथील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत.
– सुहास साळुंके

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!