कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

0

तळेगाव दिघे (वार्ताहर)ः-संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगुरव येथील एका शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. त्यांनी कॉर्पोरेशन बँकेचे शेतीसाठी कर्ज घेतलेले होते. रमेश बळीराम गोडगे (वय 56) असे या दुर्दैवी शेतकर्‍याचे नाव आहे. कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या करीत जीवनयात्रा संपविली. रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली.

 
चिंचोलीगुरव शिवारात रमेश बळीराम गोडगे यांची शेती आहे. त्यांनी शेतीसाठी कॉर्पोरेशन बँकेकडून चार लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र ते नियमित कर्ज फेडू न शकल्याने कर्जाची रक्कम वाढत जावून पाच लाख 17 हजार 959 रुपये व थकबाकी दोन लाख 94 हजार 811 रुपये इतकी रक्कम झाली होती.

 

थकबाकी व व्याजाची रक्कम भरली नाही, तर कर्जाची रक्कम पाच लाख 17 हजार 959 रुपये वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस कॉर्पोरेशन बँकेने वकीलामार्फत रमेश गोडगे यांना पाठविली होती. तेव्हापासून रमेश गोडगे तणावाखाली होते. कर्ज कसे भरायचे या विवंचनेला कंटाळून रमेश गोडगे यांनी अखेर चिंचोलीगुरव शिवारातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली व आपली जीवनयात्रा संपविली. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास परिसरात राहणार्‍या एका महिलेला त्यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आला.

 

त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस नाईक किशोर पालवे यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढत पंचनामा केला. त्यानंतर संगमनेर येथील नगरपालिका रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.

 
मनोज रमेश गोडगे यांनी पोलिसांत खबर दिली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 25/17 नुसार नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक पालवे करत आहे. मयत रमेश गोडगे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक सून व दोन नातवंडे असा परिवार आहे. मयत रमेश गोडगे यांच्या कुटुंबियांना सरकारने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या दुर्दैवी घटनेने चिंचोलीगुरव गावावर शोककळा पसरली आहे.

 

 

LEAVE A REPLY

*