कर्जमाफीसाठी शेतकर्‍याचे कोरड्या विहिरीत उपोषण सुरुच

0

कोतूळ (ता. अकोले) – अकोले तालुक्यातील मन्याळे येथे जमिनीच्या जप्तीची कारवाई थांबवण्यासाठी व कर्जमाफीसाठी कोरड्या विहिरीत उपोषणाला बसलेल्या भैरवनाथ शंकर जाधव या शेतकर्‍याने सलग चौथ्या दिवशीही उपोषण सुरुच ठेवले आहे. जोपर्यंत आपला सातबारा कोरा होत नाही व कर्जमाफी होत नाही तोपर्यंत विहिरीच्यावर येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
कर्जमाफीसाठी उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषणार्थी शेतकर्‍याला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील शेतकर्‍यांनी मन्याळे येथे काल(दि.10) गर्दी केली होती. काही शेतकरी जाधव यांच्याबरोबर विहिरीत उपोषणाला बसले होते. चौथ्या दिवशीही कोणताही तोडगा न निघाल्याने आज सर्वपक्षीय रास्तारोको करण्यात येणार असून तालुक्याचे मारुती मेंगाळ, युवा कार्यकर्ते सतीश भांगरे हेही उपोषणाला बसणार आहेत.
मन्याळे येथील शेतकरी भैरवनाथ शंकर जाधव यांनी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी पतसंस्थेने आणलेला जप्ती हुकूम रद्द करावा व कर्जमाफी करावी या मागणी साठी आपल्या कोरड्या विहिरीत उपोषण सुरू केले आहे. तहसिलदार मनोज देशमुख, यांच्यासह आमदार वैभव पिचड यांनीही उपोषण सोडावे म्हणून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय आता माघार नाही या मागणीवर जाधव ठाम असल्याने तेही हतबल झाले.
उपसभापती मारुती मेंगाळ म्हणाले, जाधव यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसणार आहे. आज होणार्‍या अकोले येथील रास्तारोकोनंतर मी येथील आंदोलनात सहभागी होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते राज गवांदे म्हणाले, हे उपोषण म्हणजे एकट्या जाधव यांचा प्रश्न नसून सर्व शेतकर्‍यांचा प्रश्न आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नाबाबत शासनाला गांभीर्य नसून शेतकर्‍यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. भूमिपुत्र संघटनेचे कार्यकर्तेही आज उपोषणाला बसले होते.
भूमिपुत्रचे संतोष वाडेकर, रावसाहेब खतोडे, रोहिदास धुमाळ, संतोष तळेकर, निलेश तळेकर, चेतन साबळे, शिवसेनेचे मछिंद्र धुमाळ, महेश नवले, प्रदीप हासे, उपसभापती मारुती मेंगाळ, युवा नेते सतीश भांगरे, अ‍ॅड. ज्ञानेश्वर काकड, सुनील सहाणे, तुळशिराम कातोरे, गणेश धुमाळ, संजय भुजबळ, रामदास गावंडे, अंजनाबाई जाधव, उपसरपंच अमित कुर्‍हाडे, गोकुळ आरोटे, प्रकाश शिंदे, देवराम गायकर, हरिभाऊ आरोटे, अमोल आरोटे, अनिल गायकर, आशपाक पटेल, मनोज आरोटे, भाऊसाहेब देशमुख, डॉ. जगदीश देशमुख, दत्तात्रय देशमुख, बाळासाहेब देशमुख, अनिल देशमुख, विजय देशमुख यांच्यासह अनेक शेतकर्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.

कर्जमाफीसाठी शिवसेनेच्यावतीने आज रास्तारोको
यशोमंदिर क्रेडिट सोसायटी, शाखा ब्राह्मणवाडा या संस्थेचे संपूर्ण कर्ज माफ करून आपला सातबारा कोरा करून द्यावा, या मागणीसाठी मन्याळे येथे आपल्याच शेतातील कोरड्या विहिरीत उपोषणाला बसलेले शेतकरी बहिरुनाथ शंकर जाधव यांच्या उपोषणाला अकोले तालुका शिवसेनेने पाठिंबा दर्शविला आहे. सरकारने या शेतकर्‍यासह राज्यातील सर्व शेतकरीवर्गाचे संपूर्ण कर्जमाफ करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज सकाळी दहा वाजता अकोले शहरातील बसस्थानक परिसरात कोल्हार – घोटी मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा सेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी दिला आहे. सरकारने या शेतकर्‍याने केलेली मागणी मान्य करावी, अशी मागणी शिवसेनेचे कार्यकर्ते महेश नवले, प्रदीप हासे, नगरसेवक प्रमोद मंडलिक, रामहरी तिकांडे, गणेश कानवडे, संजय साबळे, डॉ. विजय पोपेरे, नामदेव आंबरे, शरद तळपाडे यांनी केली आहे.

  युवानेते सतीश भांगरे यांनी प्रशासनावर सडकून टीका केली. मी शिवसेनेचा जरी असलो तरी मी शेतकरी असून मला शेतकर्‍यांवर होणारा अन्याय सहन होत नाही. म्हणून मी पहिल्या दिवसापासून या स्थळी तळ ठोकून असून उद्या पासून मीही उपोषणाला सुरुवात करणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे विरोधी पक्षनेते जिल्ह्यातील असताना देखील त्यांनी याठिकाणी भेट दिली नाही. याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे यावरून त्यांना शेतकर्‍यांचा किती कळवळा आहे हे कळते. तसेच सध्या राजकारण्यांची शेतकर्‍यांच्या बाबतीत नौटंकी चालू असल्याचा आरोप त्यांनी केला.

 परभणी येथून उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेला  बारावीचा विद्यार्थी दत्ता नारायण रेंगे म्हणाला, शेतकर्‍यांचे दुःख राज्यात आहे. आत्महत्या करण्यापेक्षा उपोषण हा शासनाकडे दाद मागण्याचा चांगला पर्याय आहे. जाधव यांच्या बरोबरच इतर शेतकर्‍यांच्या कर्ज माफीसाठी मी या आंदोलनात सहभागी झालो. जोपर्यंंत या शेतकर्‍याला न्याय मिळत नाही तोपर्यंत मीही उपोषण करणार आहे. 

LEAVE A REPLY

*