कर्जमाफीचे अवघे 14 हजार अर्ज दाखल

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीला तांत्रिक अडचणीमुळे खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दीड लाखांच्या आतील कर्जमाफीसाठी पात्र असणार्‍या 1 लाख 52 हजार शेतकर्‍यांपैकी आतापर्यंत केवळ 14 हजार 403 शेतकर्‍यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करता आले आहेत. कर्जमाफीचा अर्ज सादर करतांना शेतकर्‍यांना आठ प्रकाराच्या तांत्रिक अडचणींना समोर जावे लागत असून याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सरकारला कळवले आहे.

 

 

राज्य सरकारने राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने कर्जमाफीचा अर्ज करण्यास सांगितले. यासाठी आपले सरकार-संग्राम केंद्र, महा ई-सेवा केंद्र व कॉमन सर्व्हिस सेंटर या तीन स्तरावरून ऑनलाइन कर्जमाफी अर्ज भरून देण्याची व्यवस्था केली. जिल्ह्यात या तिन्हीची 1 हजार 412 केंद्र आहेत. मात्र, त्याचबरोबर जिल्हा सहकारी बँक शाखा व अन्य राष्ट्रीय बँकांतून लेखी अर्ज भरून घेऊन त्यांची नोंदही स्वतंत्रपणे ऑनलाइन केली जात आहे. जिल्हा बँकेच्या वतीने जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी शेतकर्‍यांसाठी मदत केंद्र सुरू केली आहेत. यासह शेतकर्‍यांसाठी 2 लाख अर्ज दिलेले आहेत.

 

 

सोसायटी पातळीवरून शेतकर्‍यांनी कर्जाची माहिती घेऊन ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ठरवून दिलेल्या संस्थेत गेल्यानंतर एक अर्ज भरण्यास 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागत आहे. याच दरम्यान इंटरनेट सर्व्हर डाऊन असणे, गती नसणे, वीजपुरवठा बंद असल्यास इंटरनेटही बंद असण्यासारखे प्रकार होत असल्याने अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांना अडथळ्यांच्या शर्यतीला समोरे जावे लागत आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 1 हजार 128 पीओएस मशिन घेण्यात येणार असून, यापैकी एक हजार मशिन्सद्वारे कामाला सुरूवात झाली आहे.

 

 

जिल्ह्यात 10 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायटीतून 1 लाख 27 हजार, जिल्हाधिकरी कार्यालयातून 100, तहसील कार्यालयातून 1 हजार 500, सहाय्यक निबंधक कार्यालयातून 3 हजार बँकांच्या शाखामधून 51 हजार 300 कर्जमाफीच्या अर्ज देण्यात आलेले आहेत. यातून ऑनलाईन पध्दतीने 7 हजार 62 आणि ऑफलाईन पध्दतीने 7 हजार 341 पध्दतीने कर्जमाफीचे अर्ज दाखल झाले आहेत. कर्जमाफीसाठी 1 लाख 52 हजार शेतकरी पात्र असतांना केवळ 14 हजार 403 अर्ज दाखल झाल्याने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे.

 

 

जिल्ह्यात दीड लाखांवर थकबाकी असलेले शेतकर्‍यांची संख्या 43 हजार 316 शेतकरी असून, त्यांच्याकडे 1130 कोटी 54 लाखांची थकबाकी आहे. या सर्वांच्या राहिलेल्या थकबाकीचे चार हप्ते पाडले जाणार असून, त्यापैकी तीन हप्ते त्यांनी भरल्यावर चौथा हप्ता माफ होणार आहे. कमीत कमी 15 हजार व जास्तीत जास्त 25 हजारांचा लाभ त्यांना मिळणार आहे.

 

 

या आहेत तांत्रिक अडचणी या आहेत तांत्रिक अडचणी

आधार दुरूस्तीसाठी व मोबाईल लिंक करण्यासाठी किमान एक महिन्यांचा कालावधीत लागत आहे. काही बँकामध्ये कर्जदारांचे सेव्हींग खाते उघडले नाही तेव्हा फॉर्ममध्ये कोणता खातेनंबर टाकावा असा प्रश्‍न आहे. आधार कार्डमधील डेटा चुकीचा असेल तर अर्ज दाखल होत नाही. पती किंवा पत्नी मयत असेल तरी फॉर्ममध्ये त्याबाबत सुचना नाहीत. कर्जदार व्यक्ती मयत असेल तर फॉर्म कोणी भरावा याबाबत सुचना नाहीत. कर्जमाफीचा अर्ज ऑनलाईन भरतांना अर्जदाराला पती व पत्नी दोघांनाही सोबत यावे लागते. फॉर्म भरतांना पती व पत्नीची माहिती बंधनकारक आहे. दोघांपैकी एक नसेल तर फॉर्म दाखल होत नाही. शेतकर्‍यांना दि. 30 जून 2016 ची नियमित कर्जपरतफेड केली आहे. पण त्यांच्याकडे 30 जून 2017 ची वसूलास पात्र कर्ज नाही, अशा वेळी काय करावे याबाबत सुचना नाहीत. 30 जून शेतकरी थकबाकीत आहे. पण शेतकर्‍यांनी पुढे दि. 30 जून 2016 नंतर कर्ज बाकी भरणा केला आहे. तो शेतकरी कर्जमाफीस पात्र आहे की नाही याबाबत सरकारकडून सुचना आलेल्या नाही. या तांत्रिक अडचणीच्या फेर्‍यात कर्जमाफीचा अर्ज अडकले आहेत.

LEAVE A REPLY

*