कर्जमाफीचा मुद्दा अन् जिल्हा बँकेची केवळ ९१ कोटींची वसुली

0

जळगाव |  प्रतिनिधी :  कर्जमाफीच्या मुद्यामुळे जिल्हा बँकेची वसुली अत्यल्प झाल्याची माहिती समोर आली आहे. १९६१ कोटी पैकी केवळ ९१ कोटी ३१ लाख म्हणजेच ४.६५ टक्के कर्जवसुली बँकेकडून झाली आहे. दरम्यान सात दिवसात वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हा बँके प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

jdcc-logo

मागील दोन आठवडे विधानसभेत कर्जमाफीचा मुद्दा जोरदार गाजला. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहच बंद पाडले. विरोधकांचा आक्रमक पावित्रा लक्षात घेता कर्ज माफी होईल, अशी भाबडी अपेक्षा शेतकर्‍यांना लागली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीला स्पष्टपणे नकार दिल्याने शेतकर्‍यांच्या आशेवर पाणी फिरले.

कर्जमाफीच्या या मुद्द्यामुळे जिल्हा बँकेची वसुली देखील थांबून राहिली. जिल्हा बँकेने १९६१ कोटी ४४ लाख ६० हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. या कर्ज वाटपापैकी केवळ ९१ कोटी ३१ लाख १५ हजार रुपयांची कर्ज वसुली झाली आहे.

साधारणतः मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण होणे क्रमप्राप्त आहे. मात्र कर्जमाफीच्या या मुद्द्यामुळे जिल्हा बँकेची वसुली पूर्ण होते की नाही? याविषयी आता प्रश्‍न निर्माण होत आहे.

वसुलीसाठी भरारी पथके

जिल्हा बँकेच्या शेतकरी सभासदांकडे थकीत असलेली कर्जवसुली करण्याकरीता १०० कर्मचार्‍यांचे भरारी पथक जिल्हाभरात नेमण्यात आले आहे. या पथकाकडून कर्ज भरण्यासंदर्भात आवाहन केले जात आहे.

मुदत वाढवून मिळावी

जिल्हा बँकेची कर्ज वसुली पूर्ण करण्यासाठी जूनपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली जात आहे. याबाबत बँक प्रशासनाकडून शासनाशी पत्रव्यवहार देखील केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

*