Type to search

ब्लॉग

करिअरच्या ‘डिजिटल’ संधी

Share

तळागाळातल्या अर्धसाक्षर नागरिकांची प्रशासकीय यंत्रणेकडून होणारी संभाव्य फसवणूक आणि कामांमधली दिरंगाई टाळण्याच्या उद्देशाने सरकारने अनेक चालू योजनांना डिजिटल स्वरूप दिले आहे. त्यामुळे डिजिटल करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

डिजिटल किंवा कोणत्याही व्यवहारामध्ये देणारा आणि घेणारा या दोघांच्याही मनाप्रमाणे व्यवहार व्हावा यासाठी एक मध्यस्थ हवा असतो. कोणीही आपल्या आयुष्यात प्रथमच व्यवहार करतो तेव्हा त्याला त्याचे पायंडे, नियम, माहीत नसतात. म्हणूनच सारे नियम आणि पायंडे माहीत असणारा डिजिटल मध्यस्थ गरजेचा असतो. असा मध्यस्थ पैसे कमावतो, परंतु त्याच्यामुळे व्यवहारातल्या दोन्ही बाजूंच्या व्यक्तींना समाधान प्राप्त होत असते. विशेष म्हणजे मध्यस्थी करण्याचा असा व्यवसाय हा बिनभांडवली व्यवसाय असतो. त्या व्यवहाराची नेमकी डिजिटल माहिती अवगत असणे हेच त्याचे भांडवल असते. डिजिटल मध्यस्थ ही एक संकल्पना आहे जिला स्मार्टफोन, इंटरनेट या आयुधांचा वापर करणे जमले आहे. सुशिक्षित पदवीधरांबरोबरच घरकामात गढलेल्या गृहिणीलाही हे शक्य आहे.

सध्या नवतंत्रज्ञान हाताशी असल्याने व विभक्त कुटुंबांमुळे आणि बर्‍याचशा सुशिक्षित घरांनी स्वीकारलेल्या सामाजिक बदलांमुळे स्त्रीच्या मागचा घरकामाचा एकंदर रगाडा कमी झाला आहे. त्यामुळे असा नवा विचार स्वीकारून अंमलात आणणे तिला शक्य झाले आहे, असे म्हणता येईल. यासाठी ज्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी प्रथम योजनांची माहिती करून घ्यायला हवी. हीींिीं://श्राी.पशसव.ळप या संकेतस्थळावर डिजिटल साक्षर व्यावसायिक यासंबंधी शिक्षणाच्या दृष्टीने इत्यंभूत माहिती आहे. इ-लर्निंग नको असेल तर एमएस-सीआयटी हाही पूर्णवेळ शिक्षकांकडून शिकायचा पर्याय उपलब्ध आहे. जगात आय.टी. क्षेत्रात भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरणार्‍या ‘परम’ महासंगणकाचे निर्माते तसेच जागतिक दर्जाचे आय.टी. तज्ञ डॉ. विजय भटकर आणि विवेक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेला अभ्यासक्रम असून जगभरात लोकप्रिय असणार्‍या ‘इआर’ या शिक्षणप्रणालीच्या माध्यमातून हे शिक्षण घेता येते. एकदा हे ज्ञान मिळाले की बॅँकेत खाते उघडणे, आधार किंवा पॅन कार्ड मिळवणे, डेबिट किंवा एटीएम कार्ड मिळवणे आणि ते वापरणे, गावाकडे पैसे ट्रान्सफर करणे, कॅशलेस पद्धतीने विविध बिले भरणे, वस्तू मागवणे, महत्त्वाची कागदपत्रे ‘डिजिटल लॉकर’ मध्ये ठेवणे अशी अनेक कामे आपण मध्यस्थ म्हणून करू शकाल. या व्यवसायासाठी लागणारे भांडवल म्हणजे स्मार्टफोन, लॅपटॉप आणि बर्‍यापैकी वेगाचे इंटरनेट कनेक्शन. ग्राहकवृद्धीसाठी सहकारी बँका, पतपेढ्या गाठा आणि मार्केटिंग (व्यवसाय मिळवणे)साठी त्यांची मदत घ्या. अशा प्रकारचे कौशल्य असणारे अनेक व्यावसायिक या क्षेत्राला हवे आहेत. ग्रामीण भागात बॅँका कमी संख्येने असल्या तरी गावोगावी छोटेसे का होईना पोस्ट ऑफिस असतेच.

पोस्ट खात्याचा वापर डिजिटल युगातही योग्य प्रकारे करता येऊ शकतो. अशीच एक योजना म्हणजे इ-पोस्ट. पोस्ट खात्याचे विलक्षण पारंपरिक स्वरूप आणि कार्यपद्धती बदलून नव्या जमान्याशी सुसंगत झाल्याने खात्याचा आणि नागरिकांचाही फायदा होईल. (उदा. बर्‍याच दशकांच्या मागणीनंतर पोस्टाने आता स्वतःची बॅँक सुरू केली आहे.) इ-पोस्ट ऑफिस हे आपल्या अनेक आर्थिक व्यवहारांचे केंद्र होऊ शकते. त्यासाठी प्रचलित बँकेत जायची गरज नाही. डिजिटल कामकाजामध्ये डिजिटल आर्थिक व्यवहारांचा मोठा वाटा असणार आहे. नोटबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर अनेक ‘पेमेंट अ‍ॅप्स’चे पेव फुटले. परंतु खासगी कंपन्या किंवा प्रवर्तकांपेक्षा सरकारी बॅँकांनी जारी केलेली अशी अ‍ॅप्स वापरणे केव्हाही श्रेयस्कर आहे. अर्थात, खासगी अ‍ॅप्स आघाडीवर असण्याला सरकारी कामकाजाची ‘गती’ आणि तुलनेने कमी जाहिरातबाजीदेखील कारणीभूत आहे. आता मात्र आधीच्या युपीआय (युनायटेड पेमेंट इंटरफेस) प्रणालीपेक्षाही सर्वसमावेशक असे ‘भीम’ अ‍ॅप डाऊनलोड केले जाण्याचे प्रमाण वाढेल असे दिसते. खासगी आणि सरकारी मिळून सध्या जवळजवळ चाळीस बँका भीम अ‍ॅपशी संलग्न आहेत. ‘भीम’ वापरणार्‍या व्यापारीवर्गासाठी काही प्रोत्साहनपर योजनाही चालवल्या जात आहेत. याखेरीज भारत क्यूआर कोड, आधार-एनेबल्ड पेमेंट सिस्टिम अशाही योजना येत आहेत. भारत क्यूआरद्वारे क्रेडिट कार्ड, स्वॅप मशीन न वापरता डिजिटल पेमेंट करता येतात. रुपे, अमेरिकन एक्स्प्रेस, मास्टर कार्ड आणि व्हिसासाठीचा हा सामायिक संवाद मंच आहे. याखेरीज विशिष्ट अ‍ॅपच्या माध्यमातून, फक्त पेमेंट करू इच्छिणार्‍याचा आधारकार्ड क्रमांक आणि बोटाचा ठसा याद्वारेही आर्थिक व्यवहार करणे लवकरच शक्य होणार आहे. सतत नवनवीन अ‍ॅप्स किंवा तत्सम सुविधा निर्माण करणे आणि व्यावहारिक पातळीवर दीर्घकाळ चालवणे हेदेखील मोठे कौशल्याचे काम आहे. नव्या सरकारी धोरणांनुसार या कौशल्यालाही प्रोत्साहन दिले जात आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी पीआयबी.जीओवी इन या संकेतस्थळावर जा. एकंदरीत डिजिटल इंडिया आणि इ-अर्थकारणामार्फत अनेकांना एक शाश्वत कमी भांडवली लघुउद्योजकतेची संधी प्राप्त झाली आहे.
– डॉ. दीपक शिकारपूर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!