करजगाव-सोनईसह 17 गावांची पाणी योजना आज होणार सुरु!

0

जीवन प्राधिकरण अधिकार्‍यांना घेरावप्रसंगी
कार्यकारी अभियंत्यांचे लेखी आश्‍वासन

 

सोनई (वार्ताहर)- करजगाव, सोनई, खेडलेपरमानंद, शिरेगावसह मुळा थडीचे नेवासा तालुक्यातील 17 गावांची प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना 24 तासात 13 मे रोजी सुरु करण्यात येइरल असे लेखी आश्‍वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आर. एस. जैन यांनी 17 गावचे कार्यकर्त्यांना दिले.

 
सदर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना 2 महिन्यापूर्वीच ग्रामस्थांच्या मागणीनुसार शंकरराव गडाख यांनी मुळा धरणावर जावून स्वतः बटन दाबून चालू केलेली होती. बर्‍याच ठिकाणी पाईप व टाक्यांमध्ये मुळा धरणाचे पाणी आलेही होते. परंतु विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी त्यात राजकारण आणून 17 एप्रिल रोजी जीवन प्राधिकरणचे या योजनेत विलंब लावण्याचा दुर्दैवी प्रकार केल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.

 

त्यामुळेच या 17 गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आर. एस. जैन यांचेसह उपविभागीय अधिकारी श्री. मुळे, दहिफळे, प्रोजेक्ट मॅनेजर एस. व्ही. म्हस्के, अभियंता जी. ए. गांगर्डे यांना सोनईत घेराव घातलेला होता. वास्तविक ही योजना गेल्यावर्षीच सुरु होणे गरजेचे होते. परंतु आता उन्हाळा संपत आला तरी पाणी योजना सुरु होईना म्हणून ग्रामस्थांचा संताप अनावर झाला होता.

 
जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख यावेळी म्हणाले, शासकीय पातळीवर अथक परिश्रम घेऊन शंकरराव गडाख यांनी कोट्यावधी रुपयांची ही मोठी योजना मंजूर करुन आणलेली होती. 2 वर्षापूर्वीच या योजनेचे पाणी गावोगावी मिळणे गरजेचे होते. परंतु आमदार मुरकुटेंनी या गंभीर प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले. दोन वर्षापासून पाण्याची मोठी अडचण आहे. प्रत्येक गावातील पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी पोहचण्याचे काम होऊनही फुकटचे श्रेय घेण्यासाठी आमदारांनी पत्रव्यवहार करुन योजना बंद पाडली. 24 तासात पाणी आले नाही तर मोठे आंदोलन होईल. मुरकुटेंना चांगले काम करता येत नसेल तर त्यांनी झालेल्या कामात खोडा घालू नये अशी टीका केली.

 
यावेळी संतोष कोलते, अजित फाटके, भारत फाटके, भिकाभाऊ जगताप, नानासाहेब जाधव, बाबासाहेब पवार, अच्युत घावटे, सुभाष टेमक, कर्णासाहेब जाधव, विजय वैरागर, नाना केदारील किरण जाधव, सारंगधर फोफसे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

आमदार मुरकुटेंच्या पत्राचा विचारला जाब
मुळा थडीच्या 17 गावाच्या पिण्याचे पाणी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेबाबत आमदार मुरकुटेंनी 17 एप्रिलला कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण यांना या पाणी योजनेबाबत जे पत्र लिहीले त्या पत्राचा सारंगधर फोफसे (तामसवाडी), सुभाष टेमक (करजगाव), किरण जाधव (शिरेगाव) यांच्यासह अनेकांनी निषेध केला.

LEAVE A REPLY

*