Type to search

कट्टरतावाद न्यायालयालाही जाणवला?

अग्रलेख संपादकीय

कट्टरतावाद न्यायालयालाही जाणवला?

Share
‘विरोधी विचार मांडणार्‍यांची हत्या करून विरोधी विचारांचे तोंड बंद करता येत नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यात नेमके तेच घडत आहे हे गंभीर आहेच; पण त्याची कोणालाही खंत वाटू नये ही त्याहूनही अधिक चिंतेची बाब आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्या हत्या होऊन सहा वर्षे उलटली.

तरीही खरे खुनी सापडत नाहीत. त्यामुळे प्रशासकीय अथवा राजकीय हस्तक्षेपामुळे आरोपींना पद्धतशीरपणे वाचवले जात आहे, असा समज दाभोळकर कुटुंबिय, त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी करून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजाचा असा समज होऊ न देणे ही तपास यंत्रणांची जबाबदारी आहे; पण तपास यंत्रणेने ते काम केले नाही तर दाभोळकर आणि पानसरे कुटुंबियांकडून तपासाच्या विरुद्ध जाणारी जी माहिती दिली जाईल त्याची आम्हाला गंभीर दखल घ्यावी लागेल’ इतक्या कडक शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने सरकार व तपास यंत्रणांवर आसूड ओढले आहेत.

न्यायालयाच्या स्पष्टोक्तीचा सरकार व तपास यंत्रणांवर किती परिणाम होतो हा भाग अलाहिदा; पण मराठी जनतेला थोडासा तरी दिलासा वाटला असेल. दाभोळकर आणि पानसरे यांच्या दिवसाढवळ्या हत्या झाल्या तेव्हा समाजात निर्माण झालेली अस्वस्थता आजही कायम आहे. विचारवंतांच्या हत्या सरकार गंभीरपणे घेईल, तपास यंत्रणांना गांभीर्याने तपासाचे आदेश देईल व आरोपींना शोधून काढून कडक शासन होईल अशी मराठी माणसाची अपेक्षा होती; पण तसे घडले नाही. सामान्य माणूस फक्त विचारवंतांच्या हत्येनेच अस्वस्थ आहे का? समाजात विद्वेषाचे वातावरण वेगात वाढत आहे का? देशप्रेम व देशभक्तीच्या नावाखाली कट्टरतावाद्यांनी सामान्य माणसांनाच वेठीला धरले आहे असे सध्याचे चित्र आहे. देशभक्ती व देशद्रोह या शब्दांचे अर्थ व व्याख्याच बदलून टाकल्या आहेत.

माणसांनी एकमेकांच्या हाकेला ओ देणे, मदतीसाठी उभे राहणे व इतरांची सुखदु:खे आपलीशी मानणे हा स्वाभाविक समाजधर्म आहे; पण विखारी दृष्टिकोन आणि कट्टरतावाद्यांमुळे समाज विघटनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली माणसांना एकमेकांविरोधात कोण चिथावत आहे? कोणाशीही मैत्री करण्याबद्दल माणसाचे मन सतत संशयव्याप्त असावे ही स्थिती एकाएकी निर्माण झाली का? ‘तपास यंत्रणांनी त्यांचे काम केले नाही तर समाजात काही मोजक्याच व्यक्ती मोकळेपणाने बोलू शकतात व त्याच इतरांच्या विचारांवर नियंत्रण ठेवतात असे चित्र पाहायला मिळेल’ अशी भीतीही न्यायालयाने व्यक्त केली आहे.

ती निराधार म्हणता येईल का? समाजातील अनेक घटक कट्टरतावादाच्या विरोधात आहेत; पण बोलायला धजावत नाहीत. विरोधात बोलणार्‍यांची काय गत होते हे सर्वश्रुत असल्याने कट्टरतावादाच्या विरोधात कोण ब्र काढणार? मराठी माणसाच्या मनातील सध्याच्या खळबळीवर नेमके बोट ठेवण्याचे काम न्यायालयाने केले आहे; पण सध्याच्या एकूण परिस्थितीत त्याची दखल घेतली जाईल का? परिस्थितीच्या गांभीर्याची दखल न्यायालयालाही घ्यावीशी वाटली ही गोष्ट तरी सरकारला दखलपात्र वाटेल का?

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!