Type to search

औषधाची एक्सपायरी डेट

आरोग्यदूत

औषधाची एक्सपायरी डेट

Share

औषध वापरण्याची कमाल कालमर्यादा म्हणजे त्याची अंतिम मुदत वा एक्सपायरी. या मुदतीनंतर औषधाची उपयुक्तता संपुष्टात येते. उत्पादनाच्या तारखेपासून साधारणत: एक ते पाच वर्षांच्या कालावधीमध्ये बहुतेक औषधांची एक्सपायरी असते. पूर्वीपासून अ‍ॅलोपॅथिक आणि आता आयुर्वेदिक औषधांवरही अशी मुदत नमूद करणे कायद्याने बंधनकारक आहे. लेबलवर एक्सपायरी लिहिण्याची पद्धत थोडी वेगवेगळी असू शकते.

अंतिम तारीख झाली की लगोलग दुसर्‍या दिवशी औषध खरेच टाकाऊ होते का? मुळात अशी अंतिम तारीख का असते? असे प्रश्न ग्राहकांच्या मनात कायम असतात.

प्रत्येक औषध हे एक रसायन आहे. त्याची गुणकारकता ही त्याच्या रासायनिक संरचनेवर अवलंबून असते. जर औषधाचे विघटन वा इतर काही रासायनिक फेरफार झाले तर औषधाची गुणकारकता कमी होऊ शकते. काहीवेळा तर तयार झालेल्या वेगळ्या रसायनांमुळे दुष्परिणाम होऊ शकतात. प्रत्येक मूळ औषधी घटकात इतर अनेक सहाय्यक घटक मिसळून त्याला वेगवेगळ्या डोसेज फॉर्मचे अंतिम स्वरूप दिलेले असते.

हवा, तापमान, आर्द्रता अशा अनेक गोष्टींचा औषधांवर व या सहाय्यक घटकांवरही सतत परिणाम होत असतो. त्यामुळे अंतर्गत विघटन, रंग-रूप चवीत बदल, जंतूंची लागण असे काही दृश्य वा अदृश्य बदल होऊ शकतात. हे लक्षात घेऊन प्रत्येक औषधाची निर्मिती करताना ते नेमके किती काळासाठी सुरक्षित व प्रभावी राहणार आहे याचा अभ्यास (स्टॅबिलिटी स्टडीज) करून त्याचे आयुर्मान (शेल्फ लाईफ) ठरवले जाते. या शेल्फ लाईफचा शेवट म्हणजे त्याची एक्सपायरी. लेबलवर लिहिलेल्या औषधाच्या प्रमाणातील किमान 90 टक्के औषधे तरी एक्सपायरी तारखेपर्यंत उत्तम रासायनिक स्वरुपात टिकून असते आणि ते अपेक्षित परिणाम पूर्णपणे साधू शकते. मूळ औषध तेच असले तरी त्याच्या वेगवेगळ्या डोसेज फॉर्मसाठी (टॅब्लेटस्, सिरप, मलम वगैरे) वेगवेगळी अंतिम मुदत असू शकते.

आपल्यातील साधारणत: 70 टक्क्यांहून जास्त लोक अंतिम मुदत तपासून न बघताच औषधे खरेदी करतात आणि 40 टक्के लोक एक्सपायरी न बघता घरात ठेवलेली औषधे वापरतात, असे एका पाहणीत आढळून आले. असेही रुग्ण आहेत जे एक्सपायर झालेली औषधेही वपरतात. ‘काय, औषध लगेच थोडेच खराब होते? दिसायला तर ठिकठाक आहे. मग वापरले तर काय बिघडते?’ असे काहीसे त्यांचे युक्तिवाद असतात. अंतिम तारखेपर्यंतच औषध सुरक्षित व पूर्ण प्रभावी असण्याची खात्री उत्पादकाने दिलेली असते. त्यानंतर मात्र नाही.

म्हणूनच आपले आरोग्यहित जपण्यासाठी हे बंधन बाळगणे आवश्यक ठरते. एक्सपायरी एक किंवा दोन महिन्यांवर आली की फार्मसिस्ट शेल्फवरून ती औषधे काढून स्वतंत्र ‘एक्सपायरी कक्ष/बॉक्स’मध्ये ठेवतात आणि ही औषधे परत पाठवली जातात. अशाप्रकारे फार्मसिस्ट दक्षता घेत असतातच. तरीही औषधे विकत घेताना अंतिम मुदत वाचून खात्री करणे, हे प्रत्येक जागरुक ग्राहकाचे कर्तव्य आहे. काही ग्राहक विनाकारण ‘फ्रेश मेडिसीन’चा आग्रह धरतात. जर प्रिस्क्रिप्शननुसार औषधाचा कोर्स लगेच संपणार असेल व अंतिम मुदतीला त्याहून अवकाश असेल, तर असा आग्रह संयुक्तिक ठरत नाही. उत्पादन तारीख जरी समजा दोन-तीन वर्षांपूर्वीची असली तरी तो माल ‘जुना’ होत नाही व अंतिम मुदतीपर्यंत औषध उत्तम, गुणकारी व सुरक्षित असते, हे समजून घ्यावयास हवे.

काही औषधे ही नैमित्तिक, कधीतरीच लागणारी असतात आणि ती घरात पडून असतात. बर्‍याचदा यात टॅब्लेट/कॅप्सूलच्या अर्धवट वापरलेल्या स्ट्रिप असतात. त्यांचा काही भाग वापरला गेल्याने बर्‍याचदा त्यावरील एक्सपायरी गायब झालेली असते. प्रत्येक गोळीच्या मागच्या बाजूस जर मुदत छापलेली असेल तर अशी अडचण येणार नाही; पण सद्यस्थितीत तरी स्ट्रिपवर एक-दोन ठिकाणीच एक एक्सपायरीचा स्टॅम्प मारलेला असतो. त्यासाठी खालीलप्रमाणे काही काळजी घेता येईल.

अंतिम तारीख नमूद केलेल्या भागातील गोळी सर्वात शेवटी घेणे.

मार्कर पेनने स्ट्रिपच्या दोन्ही कडांवर अंतिम मुदत लिहिणे.

स्ट्रिपमधून एकेक गोळी काढताना स्ट्रिप कमीत कमी फाटेल याची शक्यतो काळजी घेणे.सर्वात उत्तम उपाय म्हणजे घरातील औषधांची सूची बनवून त्यात नाव, उपयोग, अंतिम तारीख याची नोंद करणे व वेळोवेळी ती अपडेट करणे.

आयड्रॉप्स, ड्राय सिरप यांसारख्या काही औषध प्रकारांना दोन एक्सपायरी असतात. एक अर्थातच नेहमीची उत्पादन तारखेपासूनची अंतिम मुदत व दुसरी औषध उघडून वापरण्यास सुरुवात केल्यापासूनची. आयड्रॉप्स, डोळ्यांमध्ये घालण्याची क्रिम्स ही सहसा एक महिन्याच्या आतच वापरायची असतात. तर ड्राय सिरपमध्ये (बाटलीत येणारी कोरडी पावडर) उकळून थंड केलेले पाणी मिसळून तयार केलेले मिश्रण सात किंवा पंधरा दिवसांच्या आत वापरायचे असते.

एक्सपायरीची चर्चा करताना महत्त्वाचा मुद्दा आहे. औषधांच्या साठवणीची योग्य प्रकारे साठवण केली तरच दिलेली एक्सपायरी गृहीत धरता येईल. अन्यथा मुदतीआधीच औषध टाकाऊ होते. समजा घरात व्हिटॅमिन्स टॅब्लेटस्च्या स्ट्रिप्स ऊन येणार्‍या खिडकीत ठेवल्या वा दमट जागी ठेवल्या तर टॅब्लेटस् चिकट होतात. त्यांना पाणी सुटते. औषध त्याच्या मूळ पॅकिंगमध्येच कायम ठेवणेही आवश्यक. हे माहीत हवेच

गरज असेल तेवढीच औषधे खरेदी करावीत.
औषध विकत घेताना अंतिम मुदत तपासून बघावी.
घरात औषधांची साठवण, हाताळणी, डिस्पोजल काळजीपूर्वक करावे.
‘फ्रेश मेडिसीन’चा आग्रह फार्मसिस्टकडे विनाकारण करू नये.
आयड्रॉप्स, ड्राय सिरप यांना दोन एक्सपायरी असतात.
बाजीराव सोनवणे 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!