ऐतिहासिक ‘उड्डाण’

0
विमान उड्डाण क्षेत्रात प्रथमच जैविक इंधनाचा वापर यशस्वी करून भारताने नवा इतिहास घडवला आहे. स्पाईसजेटच्या बंबार्डियन क्यू-400 विमानाने डेहराडून ते दिल्ली असे हे उड्डाण यशस्वी करून दाखवले. यामुळे जैविक इंधनाचा वापर विमान उड्डाण क्षेत्रात यशस्वीपणे करणार्‍या निवडक देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. आतापर्यंत केवळ कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांसारख्या विकसित देशांतच हे शक्य झाले होते. ही किमया साधणारा भारत हा विकसनशील देशांतील पहिला देश ठरला आहे. यावर्षाच्या सुरुवातीलाच जगातील अशा प्रकारचे पहिले उड्डाण लॉस एंजेलिस ते मेलबर्न मार्गावर यशस्वी झाले होते.

भारतासाठी हे यश आणखी एका कारणाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. इंधन दरवाढीमुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम होणार्‍या देशांपैकी भारत एक आहे. डॉलर मजबूत असताना भारताला इंधन आयातीसाठी अधिक विदेशी चलन खर्च करावे लागते, तर दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे आयातीचे बिलही वाढते. सर्वसामान्य ग्राहकांना पेट्रोल, डिझेल दरवाढीला सामोरे जावे लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच जैविक इंधनाविषयी राष्ट्रीय धोरण जाहीर केले. इथेनॉलचे उत्पादन पुढील चार वर्षांत तिप्पट वाढवणे या धोरणानुसार अपेक्षित आहे. असे झाल्यास कच्च्या तेलाच्या आयातीचे 12 हजार कोटी रुपये वाचवणे शक्य होईल व इंधनासाठीचे परावलंबित्व कमी होणार आहे.

जैविक इंधन वापराला प्रोत्साहन देण्याचे धोरण सरकारने 2009 मध्ये सुरू केले. 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर या धोरणाला गती मिळाली. इथेनॉलचे मिश्रण इंधनात वापरल्याने गेल्यावर्षी भारताला 597 दशलक्ष डॉलर्सची बचत करता आली. भारताचे उद्दिष्ट जैविक इंधनाचा वापर करून 1.74 अब्ज डॉलर्सची तेल आयात कमी करणे व त्यासाठी 12 जैविक शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे आहे, असे मोदींनी आधीच सांगितले आहे. भारत गरजेच्या 80 टक्के कच्चे तेल आयात करतो. ती कमी करण्यासाठी भारत शुद्धीकरण प्रकल्पांच्या उभारणीत 1.5 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पांमुळे 15 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. इथेनॉलचे मिश्रण इंधनात केल्यामुळे गेल्यावर्षी 597 दशलक्ष डॉलर्सची बचत करण्यास मदत झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. एक टन भाताच्या भुशापासून 280 लिटर इथेनॉलची निर्मिती करता येते हे लक्षात घेण्याजोगे आहे. इथेनॉलचा वापर पर्यायी इंधन म्हणून तसेच अन्य इंधनात मिश्रण म्हणून करता येतो. भांग, ऊस, बटाटा, मका, गव्हाचा भुसा, भाताचा भुसा, बांबू या शेती उत्पादनांपासूनही जैव इंधन बनवता येते.

देशात सध्या इंधनाचे चढे दर असून त्यामुळे सामान्य जनतेबरोबरच सरकारही चिंतेत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. केंद्र सरकारच्या तिजोरीवरही इंधन दरवाढीचा अतिरिक्त बोजा पडला आहे. कच्च्या तेलाला पर्याय निर्माण करण्यावर पूर्वीपासूनच चर्चा सुरू आहे. आता भारताने हा पर्याय शोधून विमानात इंधन म्हणून त्याचा यशस्वी वापरही केला आहे. हे प्रयत्न असेच पुढे चालू राहायला हवेत. कच्च्या तेलाला पर्याय निर्माण केल्याने केवळ आयातीवरील खर्चच वाचेल असे नव्हे तर शुद्धीकरण प्रकल्पातून असंख्य युवकांना रोजगारही मिळेल. या दिशेने दमदार सुरुवात करण्यासाठी स्पाईसजेटच्या विमानाचे उड्डाण अतिशय महत्त्वपूर्ण ठरले आहे.

तंत्रज्ञानाबाबत भारताला आव्हान मिळाले तेव्हा तेव्हा भारतीय तंत्रज्ञांनी अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञान विकसित केले, हा इतिहास आहे. विमानाच्या इंधनाबाबतही तसेच घडले आहे. पेट्रोलियम क्षेत्रातील भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक मेहनतीतून जैविक इंधनाच्या सहाय्याने विमानाचे उड्डाण शक्य करणारा भारत हा पहिला विकसनशील देश ठरला. 75 टक्के एअर टर्बाइन फ्युएल आणि 25 टक्के बायोफ्युएल भरलेले हे 78 आसनी विमान 45 मिनिटांच्या यशस्वी उड्डाणानंतर दिल्लीच्या विमानतळावर पोहोचले तेव्हा इतिहास नोंदवला गेला. भारतीय विमान उड्डाण क्षेत्रासाठी हा गौरवाचा क्षण ठरला.

जैविक इंधनाच्या सहाय्याने विमानाचे उड्डाण केल्यास उड्डाणाचा खर्च 20 टक्क्यांनी कमी होतो, हा आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे. केंद्र सरकार विमान उड्डाण क्षेत्राचा विस्तार देशांतर्गत विभागात करण्याची योजना तयार करीत आहे. त्यात जैविक इंधन अत्यंत हितकारक ठरणार आहे. भारताने जट्रोफा म्हणजेच रतनजोतपासून जैविक इंधन बनवले आहे. 2012 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियमने (आयआयपी) कॅनडाच्या सहकार्याने कॅनडातच जैविक इंधनाद्वारे विमानाचे उड्डाण करण्याचा प्रयोग यशस्वी केला होता. यावेळी मात्र भारताने आपल्याच भूमीत स्वतःच्या हिमतीवर हा प्रयोग यशस्वी केला आहे. पेट्रोलियम शास्त्रज्ञ अनिल सिन्हा यांनी 2012 मध्येच जट्रोफाच्या बियांपासून इंधन तयार करण्याच्या प्रक्रियेचे पेटेंट घेतले होते. जैविक इंधनाद्वारे विमान उड्डाणाचा प्रयोग करण्यासाठी सर्वप्रथम किंगफिशर कंपनीने अनुकूलता दर्शवली होती. परंतु तोट्याचे कारण सांगून या कंपनीने पाऊल मागे घेतले. त्यानंतर जेट एअरवेज, एअर इंडिया आणि इंडिगो या कंपन्या पुढे आल्या. परंतु अखेर स्पाईसजेट कंपनी या परीक्षणासाठी तयार झाली व यशस्वीही झाली.

विमान उड्डाण उद्योगापासून उत्सर्जित होणार्‍या कार्बनचे प्रमाण 2050 पर्यंत 50 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट एअरलाईन्स इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन या संघटनेने ठेवले आहे. जगाच्या एकंदर कार्बन उत्सर्जनातील 2.5 टक्के वाटा विमान उद्योगाचा आहे. हे उत्सर्जन आगामी 30 वर्षांत चारपटींनी वाढू शकते. जैविक इंधनाच्या वापरामुळे या क्षेत्रातील उत्सर्जन 80 टक्क्यांनी कमी करता येणे शक्य आहे. जट्रोफा, भाज्यांचे तेल, पुनश्चक्रित ग्रीस, जनावरांची चरबी आदी घटकांपासून जैविक इंधन तयार करता येणे शक्य आहे. भारतातील 400 प्रकारच्या बियांपासून जैविक इंधनाची निर्मिती करता येणे शक्य आहे. देशातील बहुतांश पडीक जमिनीचा वापर जट्रोफाच्या शेतीसाठी करता येणे शक्य आहे. देशातील 400 लाख हेक्टर क्षेत्र पडीक आहे. जैविक इंधनाचा अधिकाधिक वापर केल्यास शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवणे शक्य होणार आहे. तसेच आयातीवरील अवलंबित्वही आपल्याला कमी करता येईल. म्हणजे देशासाठी हा दुहेरी फायदा ठरेल. त्यामुळेच जैविक इंधनाच्या वापराला जास्तीत जास्त प्रोत्साहन दिल्यास आपली अर्थव्यवस्था अधिकाधिक सुदृढ आणि स्वावलंबी होण्याचा प्रवास सुरू होणार आहे. जैविक इंधनाचीही आयात आपल्या देशात केली जाते. देशातच जैविक इंधन अधिक प्रमाणात तयार झाल्यास आयात कमी होईल. देशात 2013 मध्ये 38 कोटी लिटर जैविक इंधन आयात करण्यात आले. 2017 मध्ये हा आकडा 141 कोटी लिटरवर पोहोचला. म्हणजेच जैविक इंधनाचे देशांतर्गत उत्पादन वाढवल्यास आणि इथेनॉलचे मिश्रण करण्यास प्रोत्साहन दिल्यास जैविक इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्वही कमी होणार आहे.

जैविक इंधन हे स्वच्छ इंधन असून त्यामुळे प्रदूषण कमीत कमी होते. त्यादृष्टीनेही जैविक इंधन फायदेशीर ठरणार आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी 2008-09 मध्ये आयआयपीने जैविक इंधन तयार करण्याच्या दिशेने काम सुरू केले होते. 2011 मध्ये संस्थेने जट्रोफाच्या बियांपासून 15 लिटर जैविक इंधन तयार करण्यात यश मिळवले. तयार झालेले जैविक इंधन चाचण्यांसाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपन्यांकडे पाठवण्यात आले. चाचण्यांचे अहवाल सकारात्मक असल्यामुळे या क्षेत्रातील संशोधन आणि विकासकार्याला गती मिळाली आणि आज आपण जैविक इंधनावर पहिले विमान उड्डाण पाहू शकलो. इंधनावरील परावलंबित्व कमी करण्यासाठी, परदेशी चलनाची बचत करण्यासाठी, शेतकर्‍यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी जैविक इंधनाचा वापर आणि उत्पादन वाढविणे गरजेचे असून, त्या दृष्टीने आगामी काळात भारताने अशीच जोमदार वाटचाल सुरू ठेवल्यास अर्थव्यवस्थेचे स्वरूपच बदललेले दिसेल.
– कॅप्टन नीलेश गायकवाड

LEAVE A REPLY

*