एमएचटी-सीईटी परीक्षा : ‘मार्कंडेय’तील परीक्षार्थी अंधारात

0

  336 जणांची दांडी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील 68 केंद्रावर गुरूवारी सकाळपासून एमएचटी-सीईटी परीक्षेला सुरूवात झाली. इंजिनीअरिंग व फार्मासी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही सीईटी परीक्षा अत्यंत महत्वाची आहे. या परीक्षेत पहिला पेपर गणित विषयाचा होता. या पेपरसाठी 16 हजार 448 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 336 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. शहरातील मार्कंडेय विद्यालयातील परीक्षा केंद्रावर अपूर्‍या प्रकाश व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांना अंधारात परीक्षा देण्याची वेळ आली. एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी जिल्ह्यातून 22 हजार 560 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा सुरळीत वातावरणात पारपडण्यासाठी 2 हजार 61 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्त करण्यात आली होती. सकाळी 9 वाजता पहिला गणिताचा पेपर झाला. या पेपरला 16 हजार 448 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. यातून 336 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली. त्यानंतरच्या सत्रात फिजीक्स आणि केमीस्ट्रीचा पेपर सुरू झाला. हा पेपर सर्व परीक्षार्थीना सक्तीचा असून तिसर्‍या सत्रात बायोलॉजीचा पेपर होईल. हा विषय विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान शहरातील मार्कंडेय विद्यालयातील परीक्षा केंद्रात 240 विद्यार्थ्यांची परीक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी 5 विद्यार्थी गैरहजर असल्याने या ठिकाणी 235 विद्यार्थी परीक्षेला हजर होते. या ठिकाणी असणार्‍या वर्ग खोल्यामध्ये पुरेशा प्रमाणात प्रकाश नसल्याने अंधारत पेपर लिहीण्याची वेळ आली. ही बाब या ठिकाणी परिक्षा घेणार्‍या अधिकार्‍यांनी शाळा व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर महसूल आणि परीक्षा घेणार्‍या सीईटी संस्थेने आमची शाळा निवडली आहे. यात आमचा काही दोष नसल्याचे उत्तर शाळा व्यवस्थापनाने दिले.

शहरातील 68 केंद्रावर 68 केंद्रप्रमुख आणि त्यांना 68 सहायक, 14 समन्वय अधिकारी, 42 सहाय्यक कर्मचारी224 पर्यवेक्षक, 140 सहाय्यक पर्यवेक्षक, 917 समवेक्षक, 68 लिपीक, 103 वाहनचालक, 68 शिपाई आणि 123 राखीव कर्मचारी ऐवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि कर्मचार्‍यांची यांची नियुक्त करत परीक्षा सुरळीत वातावरणात पार पडण्यासाठी तयारी करण्यात आली होती.

  मार्कंडेय शाळेच्या आजूबाजूला तिनही बाजूने उंच इमारती आहे. त्यामुळे वर्ग खोल्यामध्ये पुरेसा सुर्य प्रकाश येण्यास संधी नाही. ही बाब सीईटी परीक्षेच्या निमित्ताने उघड झाली असली तरी या ठिकाणी शाळा दैनंदिन अध्यापन कसे करत असणार असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. या ठिकाणी वर्गात केवळ वीजेचा एक दिवा असून त्या दिव्याच्या अपुर्‍या प्रकाशावर विद्यार्थी ज्ञानाचे धडे घेत असल्याचे समोर आले आहे. 

 

LEAVE A REPLY

*