एनआयसीएल कंपनीकडून जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना 35 कोटींचा चुना

0

20 हजार लोकांंचे पैसे अडकले
अहमदनगर (प्रतिनिधी)- भोपाळ (मध्यप्रदेश) येथील एनआयसीएल कंपनीने पाच वर्षात पैसे करून दामदुप्पट करून देतो असे आश्‍वासन देत नगर जिल्ह्यात 35 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या कंपनीत जिल्ह्यातील 20 हजार लोकांचे पैसे अडकले असून कंपनी आणि कंपनीच्या संचालकांच्या विरोधात नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील साकेगावचे भगिरथ भगवान कटके यांनी या फसवणुकीसंदर्भात फिर्याद दाखल केली आहे.
भोपाळ (मध्यप्रदेश) येथे मुख्य कार्यालय असणार्‍या एनआयसीएल कंपनीचे सीएमडी अभिषेक चव्हाण, हरिष शर्मा, लखन सोनी, प्रबल प्रताप सिंग, फुलसिंग चौधरी, निरंजन सक्सेना यांनी नगरमधील महात्मा फुले चौकातील राऊ हॉटलेमध्ये बैठक घेऊन एनआयसीएल कंपनीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली होती. ही बैठक 2012 मध्ये झाली. त्यावेळी कंपनीत गुंतवणुक करणार्‍यांना पाच वर्षात पैसे दुप्पट करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. कंपनीचे विविध उपक्रम, कंपनीची प्रोफाईल, कंपनीचा रिअल इस्टेट व्यवसाय व कर्जरोखे यांची माहिती देण्यात येवून कंपनीच्या सिस्टीमप्रमाणे काम केल्यास कमिशन देण्याचे आश्‍वासन देण्यात आले.
त्यावर विश्‍वास ठेऊन कटके आणि त्यांच्या सहकार्‍यांनी कंपनीचे काम सुरू केले. यामुळे कंपनीचा व्यवसाय वाढला. मात्र, ग्राहकांची गैरसोय होत असल्याने कंपनीच्या संचालक मंडळाकडे कार्यालयाची मागणी करण्यात आली. कंपनीच्या संचालक मंडळाची नगरला ओळख नसल्याने कटके यांचे अधिकारपत्र घेऊन मार्केट यार्ड येथे हमाल पंचायतीमध्ये भाडेतत्वावर कार्यालय सुरू करण्यात आले.
कंपनीत पैसे गुंतवल्यास पाचवर्षात दामदुप्पट होईल, कंपनी रिअल इस्टेट व्यवसाय, जमीनीचे प्लॉट विकणे, साबन, क्रिम, चहा, मिनरल वॉटर असे व्यवसाय असून कंपनीत गुंतवणुक केल्यास गुंतवणुकदारांची चांदी होईल, असे आश्‍वासन कंपनीकडून देण्यात आले. यामुळे कटके यांच्यासह जिल्ह्यातील 20 हजार ठेवींदारांनी कंपनीत 35 कोटी रुपये गुंतवणुक केली. या ठेवींची मुदत संपल्यानंतर 20 सप्टेंबर 2016 ला कटके यांच्यासह अन्य ठेवीदार पैसे घेण्यासाठी नगर येथील कार्यालयात गेलो असता कार्यालय बंद आढळून आले. यामुळे कटके आणि त्यांच्या सहकार्‍यांनी कंपनीच्या मुख्य कार्यालय असणार्‍या भोपाळला जावून चौकशी केली. त्यावेळी कपंनीचे तेथील मुख्य कार्यालय बंद असून संचालक मंडळ पसार असल्याची माहिती मिळाली. भोपाळमध्ये संबंधित कंपनीच्या संचालक मंडळावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे माहिती कटके आणि त्यांच्या सहकार्‍यांना मिळाली.
फसवणूक झाल्याचे लक्षात असल्यानंतर कटके यांनी शनिवार (दि. 13) रात्री उशीरा एनआयसीएल कंपनीच्या संचालक मंडळाच्या विरोधात पोलीसांमध्ये फसवणुकीची फिर्याद दिली.कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास साहय्यक पोलीस निरिक्षक राहूलकुमार पाटील करत आहेत.

दरम्यान, कटके यांच्यासह राधाकिसन भानुदास गायकवाड, गोविंद संभाजी कांबळे, मानिक शेषराव राठोड, दत्तात्रय बाप्पाजी दहिफळे, बाळासाहेब श्रीरंग बेळगे, बंडू भानुदास दहिफळे, बंडू भारत रुपवते, अण्णासाहेब नवनाथ थावरे, अब्दुल लतीफ शेख, गुलाब शेखनुर शेख, बद्रीनाथ चंद्रभान औटी या हे देखील कंपनीचे एजंट आहेत.

सहा ते आठ महिन्यांपूर्वी कंपनीचे संचालक मंडळ नगरमधील एंजट यांच्यासंपर्कात होते. कंपनीची वृदांवन मध्ये सुमारे 40 ते 45 कोटी रुपयांची मालमत्ता असून ती विकून नगरमधील ठेवींदारांचे आश्‍वासन देण्याचे आश्‍वसन संचालक मंडळाने दिले होते. मात्र, त्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळांचा संंपर्क तुटला. भोपाळमध्येही कंपनीच्या संचालक मंडळावर 25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे कटके यांनी ‘सार्वमत’शी बोलतांना सांगितले.

LEAVE A REPLY

*