एटीएम फुल्ल..बँकांमध्येही मुबलक पैसे

0

नाशिक, ता.15, प्रतिनिधी – बँकांमध्ये पुरेसे पैसे आल्याने मागील महिन्यांपर्यत बँका आणि एटीएमसमोर दिसणारया रांगा आता नाहीश्या झाल्या आहेत.

मुबलक चलन उपलब्ध झाल्यामुळे पुढील काही दिवसात व्यवहाराबाबत तक्रारींचे प्रमाण कमी होणार आहे. मागील आठवडयात स्टेट बँकेकडे 204 कोटी उपलब्ध झालेले असून या आठवडयात आणखी 200 कोटीहून अधिक रूपये येणार असल्याने परिस्थिती नियंत्रणात येणार आहे.

31 डिसेंबरला केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय केल्यानंतर बँकांच्या रांगा वाढल्या होत्या. त्यानंतर जुन्या 500 व हजार रूपयांच्या नोटा बदलण्यासाठी मुदतवाढ देवूनही या रांगा कमी होत नव्हत्या. त्यानंतर जानेवारी महिन्यापर्यत दिवसाला साडेचार हजार तर आठवडयाला पंचवीस हजार रूपये काढता येत होते.

त्यानंतर दिवसाला 10 हजार तर आठवडयाला 50 हजार रूपयांपर्यंत रक्कम काढता येत होती. ज्याप्रमाणात चलनपुरवठा होत होता त्याप्रमाणात बॅकांवरचे निर्बंध शिथील केले जात होते. मागील आठवडयात हे निर्बंध पूर्णपणे उठविण्यात आल्याने आता एटीएममधून दिवसाला संबंधित बँकांच्या निर्देशाप्रमाणे 30 ते 40 हजार रूपये काढता येवू लागले आहेत.

त्यामुळे सर्वच ठिकाणी असलेल्या बँकांच्या रांगा जवळपास नाहिश्या झाल्या आहेत. मागणीच्या प्रमाणात नवीन चलन बॅकांकडे चलन उपलब्ध झाल्यामुळे गैरसोय टळली आहे. नाशिक शहराचा विचार करता स्टेट बँकेकडून दिवसाला 10 ते 15 कोटी राष्ट्रीयीक्त बँकांना दिले जात होते. परंतु प्रत्यक्षात मागणी 20 ते 25 कोटी दिवसाला होती.

दिवसभरात सुमारे 10 कोटी रूपयांची तूट आल्याने रांगांमध्ये वाढ, तर बँक कर्मचारयांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. परंतु आता नवीन चलन नियमित प्राप्त होत असल्याने बँकांनाही पुरेसे पैसे दिले जात आहेत. स्टेट बँकेकडे दोन दिवसांपूर्वी 204 कोटी प्राप्त झाले आहेत. अजून एक ते दोन दिवसात 200 कोटीहून अधिक रक्कम बँकेकडे येणार आहे. त्यामुळे सर्वच रोखीचे व अन्य व्यवहार सुरळीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नाशिक शहरातील 90 टक्के एटीएम सुरूळीत सुरू असून दररोज त्यात रोख रक्कम भरली जात आहे. त्यामुळे त्यातूनही नागरिकांना पैसे सहज उपलब्ध होवू लागले आहेत. याशिवाय पैसे काढण्याची मर्यादा हटविल्याने बाजारातही चलन येवू लागले आहे. त्यामुळे बाजारपेठेवरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे.

सर्वच व्यवहार सुरळीत होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पुढील दिवसात कोणत्याही प्रकारच्या तक्रारी राहणार नाहीत अशी माहिती बॅकेंच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान सहकारी बँकांकडेही हळू हळू पतपुरवठा होत असल्याने तेथील व्यवहारही सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. चलार्थ मुद्रणालयाकडून 2 हजार आणि 500 रूपयांच्या नोटा मोठया प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. पुढील आठवडयातही पैसे व्यवहारात येणार आहेत. त्यामुळे उर्वरीत व्यवहारही सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

चलनपुरवठा सुरळीत
स्टेट बँकेकडे नाशिक शहरासाठी मागील आठवडयात 204 कोटी रूपये प्राप्त झालेले आहेत. अजून दोन ते तीन दिवसात पुन्हा 200 कोटीहून अधिक चलन प्राप्त होणार असल्याने पुढील काही दिवसात बँकांचे व्यवहार पूर्णपणे सुरळीत होणार आहेत. राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांमध्ये सर्वच व्यवहार सुरळीत होतील.
सुनील खैरनार, सहायक महाप्रबंधक, स्टेट बँक

LEAVE A REPLY

*