एटीएमची कॅश खल्लास

0

बँका अनभिज्ञ ; नागरिकांना मनस्ताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- दोन ते तीन दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एटीएममध्ये पुन्हा खडखडाट झाला आहे. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात नोकरदारांचा पगार बँकेत जमा होतो. मात्र, एटीएममध्ये पैसे नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतो आहे. आरबीआयकडून चलन उपलब्ध होत नसल्याने ही स्थिती निर्माण झाली असल्याचे समजते. लीड बँकेचे व्यवस्थापक दायमा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बुधवार सायंकाळपासून चलन तुटवड्याची माहिती घेण्यात येत असल्याचे सांगितले.
नगरमध्ये जवळपास सर्वच बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट असल्याचे चित्र गुरूवारी दिसून आले. बहुतांश एटीएमबाहेर नो कॅशचे बोर्ड झळकत आहे.

सहा महिन्यांपूर्वी नोटबंदीच्या निर्णयानंतर आजपर्यंत या ना त्या कारणाने चलन तुटवडा जाणवत आहे. अनेक वेळा एटीएममधून पैसे मिळेनासे झाले आहेत. एटीएममधून आवश्यकतेनुसार पैसे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी सुरू आहे. केवळ बँकांच्या प्रमुख शाखा अथवा क्षेत्रीय मुख्यालय असलेल्या परिसरातील एटीएम व्यवस्थित सुरू असल्याचे प्रस्तुत पाहणीत समोर आले. सरकारी बँकांसोबत खासगी बँकांचेही एटीएम कॅशलेस असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात महाराष्ट्र बँकेचे 151 एटीएम असून त्यापैकी 81 एटीएम सुरू असल्याची माहिती बँक अधिकार्‍यांनी दिली. आरबीआयकडून चलनपुरवठा होत नसल्याने हा चलन तुटवडा जाणवत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, नगरमधील एटीएममध्ये पैसे शिल्लक नसल्याबद्दल लीड बँकेचे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क केला असता, त्यांना माहिती देता आली नाही. चलन तुटवड्याची माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरमध्ये अनेक एटीएममध्ये कॅश नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. खात्यात पैसे असतानाही एटीएममधून ते मिळत नाही. नागरिकांना एटीएम शोधून पैसे काढण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सहा महिने उलटूनही ही अवस्था असेल तर ही परिस्थिती नेमकी कधी बदलणार. लग्नसराईमुळे पैशाची गरज असूनही ते मिळत नाही.- दिनेश पुसदकर, पाईपलाईन रस्ता, सावेडी.
500, 2000 नोटा दाबल्याने तुटवडा
जिल्ह्यात आरबीआयकडून कधी पैसे येतील हे सांगता येत नसल्याचे बँकेच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. वास्तवात जिल्ह्यात जवळपास 600 एटीएम मशीन आहेत. एका मशीनमध्ये 50 ते 60 लाख भरल्यानंतर अवघ्या काही तासात हे एटीएम रिकामे होत आहे. नागरिक एकादा बँकेतून अथवा एटीएममधून काढलेले पैसे पुन्हा बँकेत भरत नाही. 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटा पुन्हा नागरिकांनी स्वत: जवळ ठेवल्या आहेत. यामुळे चलन टंचाई निर्माण झाली आहे. महाराष्ट्र बँकेकडून तर मोठे खातेदार व्यापारी, एसटी महामंडळाला दररोज येणारे चलन तातडीने बँकेत भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सर्व बँकाकडून दररोज आरबीआयला चलनाबाबत अहवाल पाठवण्यात येत आहे. यामुळे दररोज प्रत्येक जिल्ह्यात किती चलनाचा पुरवठा झाला. त्यातून किती चलनाचे जनतेत वितरण झाले याची तपशील आरबीआयकडे उपलब्ध आहे. जनतेने आपल्याकडील पैसे मार्केटमध्ये खळते ठेवल्यास चलन तुटवडा होणार नाही, अशी अपेक्षा आरबीआयकडून करण्यात येत आहे.

नागरिक म्हणतात…
एटीएममधून केवळ पाचशे, दोन हजार रुपयांचा नोटा निघतात. शंभरच्या नोटांचा तुटवडा आहे. कॅश असलेल्या एटीएमसमोर पैसे काढण्यासाठी गर्दी होते. त्यामुळे कॅश काही मिनिटांतच संपते. पैसे काढण्यासाठी भल्या पहाटे किंवा मध्यरात्रीनंतर जावे लागते. इतके करूनही पैसे मिळेलच याची गॅरंटी नाही.
– संतोष ढवण, ढवणवस्ती, सावेडी

बँकांची मनमानी
बँकांमध्ये चलन कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने केवळ एकावेळी 20 हजार रुपये काढण्याचे निर्बंध बँकांनी घातले आहेत. अर्थात आरबीआयकडून तसे कोणतेही निर्देश नसताना बँकांनी स्वतःहूनच ग्राहकांना पैसे काढण्यावर निर्बंध घातल्याचे दिसून येत आहे.

 

LEAVE A REPLY

*