एकीचे बळ; पण मिळेल का फळ?

0
तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे शपथविधी सोहळे वेगळ्याच उत्साहात पार पडले. मोदीत लाटेत मरगळलेले अनेक विरोधी पक्षांचे नेते यावेळी समूहाने हजर राहिले. बहुतेकांनी एकाच बसमधून प्रवास केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाआघाडीची चर्चा त्यामुळे जोरावली आहे.

स्वबळावर सत्ताप्राप्ती हे दिवास्वप्न ठरू शकते. विरोधक एकत्र लढले तरच सत्तासोपान दृष्टिपथात येऊ शकतो. काँग्रेस हा तर अनुभवी पक्ष! त्या पक्षातील धुरिणांनासुद्धा याची जाणीव झाली असावी. म्हणूनच भाजपविरोधी महाआघाडी बनवण्यासाठी वर्षभरापासून चाचपणीही सुरू असावी.

तथापि ही एकजूट विरोधक किती दिवस टिकवतील व जरूर तर व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आणि सत्तेच्या वाट्याबद्दलच्या अपेक्षांना मुरड घालू शकतील का? या एकाच मुद्यावर महाआघाडीचे अस्तित्व अवलंबून राहील. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असायला हवेत, असे द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांनी सुचवले खरे; पण त्यासाठी त्यांनी कोणकोणाची मते आजमावली असतील? सोहळ्यानिमित्त जमलेल्यांपैकी फारशी कुणाला ती कल्पना कदाचित दिली नसावी. त्यामुळे त्या सूचनेचे फारशा उत्साहाने स्वागत झाले नसावे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधीलाही विरोधी पक्षांचे बहुतेक नेते उपस्थित होते. तेव्हाही विरोधकांच्या एकजुटीचा प्रारंभ लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनच पाहिले गेले. आताही बरेच नेते एकत्र आलेले आहेत. त्यावरूनही तो तर्क पुन्हा चर्चेत आहे. ही एकजूट तात्कालिक न ठरल्यास लोकसभा निवडणुकीत यश मिळण्याचा संभव ताज्या घटनांनी बराच वाढला आहे. तसे झाल्यास एकजूट पुढेही टिकणार का?

यशामुळे जाग्या होणार्‍या महत्त्वाकांक्षा एकजुटीला सुरूंग तर लावणार नाहीत ना? इसापनीतीतील एक गोष्ट यानिमित्त आठवते. एका जंगलात एक कोल्हा, एक लांडगा व एक रानमांजर घनिष्ट मित्र असतात. रोज नियमाने सोबत फिरायला जात. एके दिवशी वाटेवरच्या मैदानात कुणा संताचे प्रवचन चालू होते. कुतूहलाने तिघेही आडोसा पाहून ते प्रवचन तत्मयतेने ऐकू लागले. बुवांनी सांगितलेला अहिंसेचा महिमा त्यांच्या मनी ठसला.

फिरायला जाताना तिघांनी यापुढे अहिंसा पाळण्याचा निर्धार बोलून दाखवला. वाटेत लागलेल्या नाल्याच्या काठावर खेकड्यांची काही बिळे दिसली. कोल्होबा उडी मारून तिकडे धावले. लांडगा व रानमांजर कोल्ह्याच्या दांभिक अहिंसेची चर्चा करू लागले. थोड्याच वेळात कोल्हा परत सामील झाला.

चर्चा थांबली; पण रस्त्याच्या बाजूने शेळ्या-मेंढ्यांचा कळप जात होता. काही निमित्त सांगून लांडगा तिकडे पळाला. तेव्हा कोल्हा व रानमांजर लांडग्याच्या दांभिकतेवर बोलू लागले. सत्तेचे लोणी दिसू लागल्यास एकजुटीच्या निर्धाराला पोहोचलेली मंडळी एकत्र राहू शकतील का? विरोधी पक्षांच्या महाआघाडीचे अस्तित्व सत्ता लालसेने ढेपाळणार का हे काळच ठरविल.

LEAVE A REPLY

*