एकलहरे प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी ‘अभिनव योजना’

0

नाशिक : महानिर्मिती कंपनी अंतर्गत एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि भुसावळ येथील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रकाकरिता जमिनी संपादीत करण्यात आल्या आहेत. अशा प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यात आले आहे. महानिर्मिती कंपनीने ‘सर्वसमावेशक प्रगत कुशल योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामाध्यमातून दरमहा विद्यावेतन प्रकल्पग्रस्तांना मिळणार आहे.

राज्याचे जलसंपदामंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाजन यांना पत्राद्वारे सदर योजनेची माहिती दिली आहे. तसेच योजनेच्या कार्यक्षम अंमलबजावणीद्वारे सदर औष्णिक प्रकल्पांतील अधिकाधीक प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याकरिता प्रकल्पग्रस्त आणि संबंधीत अधिकारी यांच्यासोबत समन्वय बैठक आयोजित करण्याविषयी कळविले आहे.

महानिर्मिती कंपनीमध्ये आयटीआय अर्हताधारक असलेल्या तथापि कंपनीच्या खुल्या भरतीत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्तेनुसार अद्यापही सामावून न घेतलेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी प्रगतकुशल योजना राबविण्यात येते. या योजनेत आय.टी.आय.शिक्षण असणार्‍या प्रगतकुशल उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून गुणवत्तेनुसार महानिर्मिती कंपनीच्या सेवेत सामावून घेईपर्यंत अथवा वयाची 45 वर्षे होईपर्यंत दरमहा 10 हजार रुपयापर्यंत विद्यावेतन दिले जाते.

वयाची 45 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 58 वर्षांपर्यंत दरमहा 10 हजार रुपये निर्वाहभत्ता किंवा कंपनीकडून व्यवसायाकरीता एकरकमी 5 लाख रुपये अनुदान दिले जाते. आय. टी.आय. शैक्षणिक पात्रता नसलेल्या पण कंपनीत नोकरी करण्याची इच्छिणार्‍या अशा प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरीता सर्व समावेशक प्रगत कुशल योजना राबविण्यात येणार आहे. योजनेत उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार निर्वाहभत्ता दिला जाणार आहे. पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण असणार्‍या अकुशल उमेदवारांना 6000 रुपये दरमहा, नववी ते बारावी च्या अर्धकुशल उमेदवारांना 6500 रु. दरमहा, वाहनचालक, नर्स, फार्मासिस्ट, पदवी, आयटीआय, पदव्युत्तर शिक्षण असणार्‍या कुशल उमेदवारांना 7500 रु. दरमहा आणि अभियांत्रिकीतील डिप्लोमा व बी.ई असणार्‍या कुशल उमेदवारांना 10 हजार रु. दरमहा निर्वाहभत्ता दिला जाईल.

प्रशिक्षणार्थींना मानधनात प्रतिवर्षी 500 रु. वाढ देण्यात येईल. ही योजना फक्त महानिर्मिती कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांकरीता लागू राहील.प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रतिवर्षी 5 प्रमाणे कमाल 25 गुण देण्यात येणार आहेत याचा लाभ महानिर्मितीद्वारे होणार्‍या खुल्या भरतीच्या वेळी वाढीव गुण म्हणून केला जाईल. योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींना रुजू झाल्याच्या दिनांकापासून ते कंपनीच्या विविध पदांवर स्पर्धा परीक्षेच्याङ्गङ्गमाध्यमातून गुणवत्तेनुसार सेवेत दाखल होईपर्यंत किंवा वयाची 58 वर्षे पुर्ण करेपर्यंत निर्वाह भत्ता दिला जाईल.

या योजनेविषयी अधिक माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी पालकमंत्री महाजन यांच्या प्रयत्नाने नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी उपलब्ध होणार आहे. दिनदयाळ ग्राम ज्योती योजनेअंतर्गत नाशिकसाठी 39.54 कोटी आणि जळगावसाठी 71.63 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. तर एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत नाशिकसाठी 96.25 कोटी आणि जळगावसाठी 100.65 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्युतीकरणाला व वीजपुरवठ्या संदर्भात पायाभूत सुविधांच्या विकासात मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

*