‘एकच प्याला’ मंडळींचा भापकर गुरुजींवर हल्ला

0

दारूबंदीसाठी प्रयत्न केल्याचे कारण; तिघांवर गुन्हा 

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यात किंवा देशात दारूबंदी होईल की नाही याबाबत ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही; परंतु दारूबंदीचा पुरस्कार करीत त्या संदर्भात कार्य करणार्‍यांची बोलतीच बंद करण्याचा विडा नगर जिल्ह्यातील ‘मद्यसम्राट’ आणि ‘एकच प्याला’साठी तळमळणार्‍या ‘तळीराम’ मंडळींनी उचलला आहे की काय अशा घटना घडत आहेत.

यापूर्वी अकोले तालुक्यात दारूबंदी पुरस्कर्ते व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना ताजी असतानाच महाराष्ट्राचे ‘मांझी’ अशी ओळख असणार्‍या नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील वयोवृद्ध सामाजिक कार्यकर्ते राजाराम भापकर गुरुजींना शुक्रवारी तिघांनी जबर मारहाण केली. कारण काय तर भापकर गुरुजींनी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर करवून घेतला हे होय.
गुंडेगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम भापकर गुरुजी यांच्यावर शुक्रवारी तिघांनी केलेल्या हल्ल्यात गुरुजींचा गुडघा आणि खुब्याला गंभीर दुखापत झाली आहे. दारूबंदीच्या कारणावरून ही मारहाण झाली आहे. भापकर गुरुजींनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी नगर तालुक्यातील गुंडेगावमध्ये बहिरोबा देवाची यात्रा होती. या यात्रेत गावातील तरुणांनी दारू पिऊ नये, असे आवाहन भापकर गुरूजी यांनी केले होते. गाव दारूमुक्त व्हावे, यासाठी भापकर गुरुजींनी 1 मे रोजी झालेल्या ग्रामसभेत ठराव घेऊन तो मंजूर करण्यास भाग पाडला होता. तेव्हापासून गावातील काही ‘मदिरा’ आणि ‘मदिरालय’शी संबंधित मंडळीच्या मनात गुरुजींविषयी राग होता. त्यात यात्रेत दारू न पिण्याचे आवाहन केल्याने गावातील काही मद्यपी गुंड गुरुजींवर भडकले.
शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास गुंडेगावातील चौकात गावातील काही तरुण मद्य प्राशन करून आले होते. त्यावेळी दारू पिणे घातक असल्याचे भापकर गुरूजी त्यांना समजावून सांगत होते. याचा राग येऊन दिलीप बन्सी भापकर, मकरंद शिवाजी भापकर आणि शिवाजी हरिभाऊ भापकर यांनी वयोवृद्ध भापकर गुरुजी यांच्या हल्ला चढविला.

 

गुरुजींना खाली पाडून हे गुंड आरोपी त्यांच्या अंगावर नाचले. यामुळे गुरुजींचा गुडघा आणि खुब्याला गंभीर दुखापत झाली आहे. या विरोधात शनिवारी दुपारी भापकर गरुजी यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार पोलिसांनी दिलीप बन्सी भापकर, मकरंद शिवाजी भापकर आणि शिवाजी हरिभाऊ भापकर यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.
यापूर्वीही गुरुजींना धमकी
यापूर्वी आरोपींनी रविवार 7 मे रोजी गुंडेगावातील एका सलून दुकानासमोर भापकर गुरुजींना दारूबंदीच्या ठरावावरून शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आली होती. तसेच गुरुजींना ‘तुमचा काटा काढू’ अशी धमकी देण्यात आली होती, असे भापकर गुरुजींनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

अशी आहे गुरुजींची ओळख
राजाराम भापकर गुरुजींचे वय 85 वर्षे आहे. त्यांनी आयुष्यभराची जमापुंजी खर्च करून व स्वत: श्रमदान करून डोंगर फोडला आणि गावासाठी 40 किलोमीटरचा रस्ता बनविला. ‘एबीपी माझा’ने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा राज्य पातळीवर सन्मानही केला होता. आता गावात दारूबंदीसाठी गुरुजींनी लढा सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

*