उष्णतेचा कहर कायम ; उकाड्याने नाशिककर हैराण ; गुरुवारही 39.9 तापमान; भाजीपाल्यावरही परिणाम

0

नाशिक : गेल्या चार दिवसांपासून नाशिकच्या कमाल तापमानाने चाळिशी ओलांडली असून गुरुवारी पारा 39.9 अंशावर होता. उष्णतेने यंदा कहर केला असून नागरिकही कमालीचे वैतागले आहेत. दहा वर्षांनंतर नाशिककर असा विचित्र उन्हाळा अनुभवत आहेत. त्यामुळे रस्त्यावरची गर्दी कमी झाल्याने दुपारच्या सुमारास रस्ते सामसूम होताना दिसत आहेत.

उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे शहरात उष्म्याने कहर केला आहे. तब्बल आठवडाभर तापमानाचा पारा 38 अंशापर्यंत होता. परंतु रविवारी पार्‍याने चाळिशी गाठल्याने तापमानाची नोंद 40.1 इतकी करण्यात आली. रविवारपासून सातत्याने तापमानाचा पारा वाढत आहे. बुधवारी 40.3 अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली.

तर गुरुवारी 39.9 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. सापेक्ष आर्द्रता 66 टक्के इतकी असल्याने घाम येण्याचे प्रमाणही वाढले आहे. वाढत्या तापमानामुळे नाशिककरांना उन्हाचा तीव्र चटका बसत असल्याने नाशिककर कमालीचे वैतागले आहेत.

भाजीपाला पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील भाजीपाल्याला उन्हाचा चांगलाच तडाखा बसला आहे. मुंबईसह अन्य उपनगरांत फळे व पालेभाज्यांचा पुरवठा करणार्‍या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणार्‍या शेतमालाची आवक उन्हामुळे घटली आहे. त्यामुळे बाजारभाव तेजीत आहेत.

उन्हामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने काही दिवसांपासून शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे 70 टक्के शेतमालाची आवक घटली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबईसह वाशी, वाशिम व अन्य उपनगरांत दैनंदिन 100 ते 125 वाहने भरून शेतमाल जातो.

बाजार समितीत वांगी, कोबी, भोपळा, ढोबळी मिरची, कारले, दोडके, टोमॅटो, फ्लॉवर, भेंडी, गिलके या फळभाज्यांची आवक होत आहे. यात वांगी, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी या शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजारभाव मध्यम आहेत. तर भेंडी, गवार, गिलके, कारले, दोडका या फळभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आहेत.

भाजीबाजारात भेंडी 50 ते 60, गवार 80 रुपये किलो, दोडके 40, गिलके 40 तर कारले 40 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत असल्याने ग्राहकांना दोनवेळचा भाजीपाला खरेदी करण्यासाठी खिशाचा विचार करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

*