संस्था संचालकाकडून शिक्षकाला मारहाण; दहशत घेऊन शिक्षकाने गाव सोडले

पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर शिक्षक गायब ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

0

सिन्नर : शाळेत उशिरा आला म्हणून संस्थेच्या संचालकाने शिक्षकाला भर कार्यालयातच मारल्याची घटना दोन दिवसांपूर्वी शहरातील प्रतिष्ठीत शिक्षण संस्थेत घडली असून तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रातच या घटनेने खळबळ उडाली आहे.

इतर सहकार्‍यांसमोर झालेल्या अपमानास्पद मारहाणीमुळे व्यथित झालेल्या शिक्षकाने सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने संतप्त झालेल्या या संचालकाने पुन्हा रात्री शिक्षकाला घरी जाऊन बेदम मारहाण केली असून सदर शिक्षकाला मारु नये म्हणून मधे पडलेल्या शिक्षकाच्या पत्नीलाही निदर्यपणे मारहाण करण्यात आल्याचे समजते.

सदर घटनेनंतर संस्थेतील सर्वच शिक्षकांमध्ये दहशत पसरली असून सदर शिक्षक रजा टाकून आपल्या कुटुंबियांसह गावाला निघून गेला आहे.

तर तक्रारकर्ता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात येत नसल्याने पोलीस तपास थंडावला आहे तर असे काही घडलेच नाही, आम्ही आमच्या पातळीवर प्रकरण मिटवून घेऊ’ असं म्हणत काही संचालक थेट पोलीस ठाण्यात संशयित संचालकाची वकिली करीत फिरत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील महात्मा फुले विद्यालयातील एका शिक्षकाला संस्थेचे संचालक कैलास झगडे यांनी मारहाण केली असून तशी तक्रार या शिक्षकाने सिन्नर पोलीस ठाण्यात दिली आहे.

शाळेत उशिरा आलेल्या या शिक्षकाला झगडे यांनी धमकावल्यानंतर दोघांमध्ये शाब्दीक चकमक उडाली होती. त्यातून संतापलेल्या झगडे यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची चर्चा आहे.

त्यानंतर सदर शिक्षकाने नोटीसीला उत्तर दिले. या उत्तराने झगडे यांचे समाधान झाले नाही. उलट त्यांच्या संतापात भरच पडली आणि या संतापाच्या भरात काही शिक्षकांसमोरच झगडे यांनी सदर शिक्षकाला मारहाण केल्याची चर्चा शाळेच्या आवारात ऐकायला मिळत आहे.

झगडे संस्थेचे संचालक अर्थात विश्वस्त असतांना संस्थेचे मालक असल्याच्या अविर्भावातच वागतात. शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाने आपले नोकर असल्याप्रमाणे वागायला, ऐकायला पाहीजे अशी त्यांची भावना असते.

जे ऐकत नाहीत त्यांना हेतु पुरस्कर त्रास देण्याचे काम झगडे करत असतात अशी त्यांच्याबद्दल तक्रार आहे. यापूर्वीदेखील अजून दोन-चार शिक्षकांना त्यांनी त्रास दिल्याची चर्चा असून अपमानास्पद वागणूक देत मारहाण झाल्याने सदर शिक्षकाने तडक पोलीस ठाण्यात जाऊन झगडे यांनी मारहाण केल्याची तक्रार दिली.

ही माहिती कळताच झगडे अजूनच संतप्त झाले व रात्री 10 नंतर सरदवाडीरोड परिसरातील सदर शिक्षकाच्या घरी जाऊन झगडे यांनी पुन्हा त्यांना मारहाण केल्याची चर्चा आहे.

झगडे यांचा रुद्रावतार पाहून सदर शिक्षकाच्या पत्नीने आपल्या पतिला वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर झगडे यांनी त्यांनाही मारहाण केल्याची चर्चा आहे.

सदर घटनेने संबंधित शिक्षकाच्या कुटुंबियांवर झगडे यांची चांगलीच दहशत निर्माण झाली असून त्यांनी शाळेत रजेचा अर्ज पाठवून दिला आहे व ते आपल्या कुटुंबियांसह घराला कुलुप लावून बाहेरगावी निघून गेले आहेत. सदर घटनेचा संस्थेतील सर्वच शिक्षकांनी धसका घेतला असून या मालकांपासून आम्हाला वाचवा अशी मागणी शिक्षक दबक्या आवाजात करीत आहेत.

दहशतीमुले एकीकडे मार खाणारा शिक्षक गायब झाला असून त्यांचा भ्रमणध्वनीही ते उचलत नसल्याने उलट-सुलट चर्चा होत आहे. तर झगडे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन हा आमचा आपसातला मामाला असून आमच्या पातळीवर मिटून जाईल असे तपास करणार्‍या पोलिसांना सांगितल्याचे समजते.

झगडे यांच्याबरोबर संस्थेचे अन्य एक-दोन संचालकही पोलिसांकडे वकिली करण्यासाठी गेले असल्याचे समजते. सदर शिक्षकाची तक्रार दाखल होऊ नये यासाठी पोलिसांवर दडपण आणले जात असून संस्थेच्या अध्यक्षांसह अन्य पदाधिकारीही याबाबत कुठलीही भुमिका घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*