उपोषण एक-फायदे अनेक!

0
बरे झाले! अण्णांचे उपोषण थांबले. अण्णांच्या उपोषणाने गांधीवादाला उजाळा मिळाला. त्यांच्या एका उपोषणाचे अनेकांना अनेक फायदे झाले. अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा उपोषणाचा सकारात्मक मार्ग गांधींनी दाखवला. अण्णा हे ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते! त्यांना गांधीवादाचे अनुसरण करण्यासाठी सरकारने पुरेसा वेळ दिला. म्हणून उपोषण सात दिवस चालले. या सात दिवसांत उपोषण आणि गांधीवादावर महाचर्चा झडल्या.

जनतेला पुन्हा एकदा महात्मा गांधी आणि त्यांच्या तत्त्वांची महती आठवली. महात्मा गांधींनी उपोषण केले की ब्रिटीश सरकार हादरायचे. अण्णांच्या उपोषणामुळे राज्य सरकारही सात दिवसांनी हवालदिल झाले. आधी मंत्र्यांनी आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी राळेगणसिद्धीकडे धाव घेतली. अण्णा आणि गांधीवादाबद्दल आस्था असल्याचे सरकारने उपोषणाची दखल घेऊन जनतेला दाखवले. वास्तविक सामाजिक सहिष्णुता धोक्यात आली आहे.

तथाकथित संस्कृतीरक्षकांचा धुमाकूळ देशभर सुरूच आहे. मात्र अहिंसेची देणगी जगाला देणार्‍या गांधींविषयी आस्था प्रकट करण्याची संधी राज्य सरकारला अण्णांच्या उपोषणाने मिळवून दिली. अण्णांनी याआधीही अनेकवेळा उपोषण केले आहे. सरकार आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर दरवेळी मोठ्या मनाने उपोषण थांबवले आहे. सरकारने अण्णांच्या मागण्या मान्य करणे आणि त्यांची पूर्तता करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत याकडे अण्णांचे व सर्वांचे प्रत्येक वेळी सोयीस्कर दुर्लक्ष होते.

तेच याही वेळी घडले. सरकारने अण्णांच्या मागण्या मान्य केल्या म्हणजे नेमके काय केले हे गुलदस्त्यातच राहिले. त्यामुळे पुन:पुन्हा उपोषण करण्याचा मार्ग अण्णांसाठी मोकळाच आहे. अण्णांच्या गांधीभक्तीला वंदन करण्याची संधीही सरकारला मिळत राहील. शिवाय एक बरे झाले. अण्णा ढेपाळले असे म्हणणारे सपशेल तोंडावर आपटले. राज्याचा प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री सतत कामात व्यग्र असतात. शासकीय, निमशासकीय, अशासकीय, पक्षीय, सर्वपक्षीय अशी तर्‍हेतर्‍हेची कामे राज्याचे प्रमुख म्हणून करावीच लागतात. रात्रीचा दिवस करावा लागतो.

अण्णांच्या उपोषणानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनाही काही तासांची विश्रांती मिळाली. वेळ अण्णांसाठी खर्च झाला खरा; पण ‘कामात बदल म्हणजे नेत्याची विश्रांती’ अशी व्याख्या इंग्लंडचे जुने लढाऊ पंतप्रधान चर्चिल यांनी केलेली आहे. त्या व्याख्येप्रमाणे मुख्यमंत्र्यांना विश्रांती मिळाली. राज्यातील एक उपेक्षित खेडे बघायला मिळाले. उपोषणांनीच प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अण्णांच्या मनधरणीची संधी मिळाली. केवळ अण्णांच्या एका उपोषणाने अनेक फायदे झाले ते असे!

LEAVE A REPLY

*