उपोषणार्थीची प्रकृती खालावली, उपोषणावर मार्ग निघेना

0

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार बच्चु कडू आज भेट देणार 

कोतूळ (वार्ताहर) – मन्याळे येथे विषाची बाटली घेऊन कोरड्या विहिरीत उपोषणाला बसलेले बहिरुनाथ जाधव यांच्या उपोषणाचा काल पाचवा दिवस होता. जाधव यांची प्रकृती खालावल्याने काल रात्री वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परभणीतून आलेल्या तरुणाने ही जाधव यांच्या साोबत अन्न त्याग करून उपोषण सुरु केले आहे.
दरम्यान जाधव व दत्ता रेगे यांनी एकत्रित विहिरीत अन्न त्याग करून उपोषण सुरु केले आहे.
उपोषणार्थीना पाठींबा देण्यासाठी काल दिवसभर शेतकरी व कार्यकर्त्यांनी भेट दिली. मराठा महासंघाचे लालू दळवी, कैलास शेळके, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी देशमुख आदींनी भेट दिली.
दळवी यांनी पोलीस निरीक्षक नंदकुमार शेळके यांच्यासोबत चर्चा केली. पतसंस्थेची भूमिका ताठर असेल तर आम्ही आर्थिक मदतीसाठी खारीचा वाटा उचलू, असे सांगितले. भूमिपुत्र संघटनेचे कार्यकतेही याठिकाणी तळ ठोकून आहेत. रात्री उशिरापर्यंत तहसीलदार मनोज देशमुख, सहायक निबंधक के. डी. गायकवाड, पोलीस निरीक्षक शेळके, सभापती मारुती मेंगाळ, सतीश भांगरे ठाण मांडून होते.
दरम्यान पतसंस्थेचे पदाधिकारी काल या ठिकाणी फिरकले नाही. त्यांनी तहसीलदारांच्या कार्यालयात चर्चा केली. कर्जमाफ करण्याबाबत पतसंस्थेच्या पदाधिकार्‍यांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाल्याने यावर निर्णय होऊ शकला नाही. सतीश भांगरे, लाल दळवी यांनी सकारात्मक चर्चा केली व कर्जदारासाठी खारीचा वाटा उचलू, असे सांगितले.

शिवसेना व संभाजी बिग्रेडचा रास्तारोको;

कर्जवसुली नियमाप्रमाणे : यशोमंदिर पतसंस्थेच्या अध्यक्षांचे मत;

दानवे यांच्या वक्तव्याचाही निषेध
अकोले (प्रतिनिधी) – राज्य सरकारने वित्तीय संस्था, बँका, पतसंस्था व सावकारशाही यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे या मागणीसाठी काल आठवडे बाजारच्या दिवशीच अकोले शहरातील बसस्थानक परिसरात शिवसेना व संभाजी बिग्रेडच्यावतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले. तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या शेतकरी विरोधी विधानाचा निषेध यावेळी करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंंद्र धुमाळ यांनी केले.
शेतकरी भैरवनाथ जाधव यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी तहसीलदारांच्या उपस्थितीत चर्चा झाली.
यशोमंदिर सहकारी पतपेढीचे अध्यक्ष अशोक वाळुंज यांनी स्पष्ट केले की, संस्थेने कर्ज देऊन त्यांना आर्थिक सहाय्य दिले. संस्था नियमाप्रमाणे अनेकवेळा कर्ज वसुलीसाठी मागणी केली मात्र संबंधीत व्यक्तीने कर्ज भरण्यास नकार दिला. जाधव यांनी कर्ज न भरणे योग्य आहे का? असा सवाल पतपेढीचे चेअरमन अशोक वाळुंज यांनी केला आहे. तसेच संपूर्ण कर्जमाफी होऊ शकत नाही, कारण ते अधिकारच आमच्या हातात नाहीत. मात्र त्यांना मुद्दल व आजपर्यंतचे सरळव्याज भरावेच लागेल, ते चुकणार नाही, असे स्पष्ट केले.
संस्थेच्या सर्व संचालक मंडळासमवेत तहसीलदार मनोज देशमुख, पोलिस निरीक्षक नंदकिशोर शेळके, राष्ट्रवादीचे नेते मीनानाथ पांडे, अ‍ॅड. के. बी. हांडे, ज्ञानदेव गायकर आदींची तहसील कार्यालयात बैठक झाली.

 

LEAVE A REPLY

*