Type to search

नंदुरबार

उपसा सिंचनच्या कामांना गती द्या!

Share

नंदुरबार । तापी नदीवरील 22 उपसा सिंचन योजनेच्या कामांना गती देवून सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत.

नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील 22 उपसा सिंचन योजनेच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता म.श.आमले, तापी जलविद्युत व उपसा सिंचनचे अधिक्षक अभियंता सी.बी.गायकवाड, महावितरणचे अधिक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता डी.डी.जोशी, नितीन खडसे, धनंजय पाटील, आणि महापारेषणचे कार्यकारी अभियंता एस.ए. चित्ते उपस्थित होते.

तापी नदीवरील 22 उपसा सिंचन योजना या 25 ते 30 वर्षापूर्वी बांधण्यात येवून 4 ते 5 वर्ष कार्यान्वित होत्या. तथापि तापी खोर्‍यात प्रकल्प पूर्ण होत गेल्याने पाणी वरच्या भागात अडविले गेले. त्यामुळे या योजनांसाठी पाणी अपूरे पडू लागल्याने योजना हळू हळू बंद पडल्या. 2007-08 मध्ये तापी नदीवर प्रकाशा बॅरेज व सारंगखेडा बॅरेज येथे पाणी साठा निर्माण झाल्याने लोकप्रतिनिधी व लाभधारकांकडून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील 8 व नंदुरबार जिल्ह्यातील 14 अशा 22 उ.सि.यो. शासनाकडून दुरुस्त करून कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने सदर योजनांच्या दुरुस्ती कामास जून 2016 मध्ये रू. 41.78 कोटी या रक्कमेस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. तापी जलविद्युत विभागास या ठिकाणी नवीन रोहित्र, बे-ब्रेकर व 11 के.व्ही. उच्चदाब वाहिनी इत्यादी कामे करणे आवश्यक झाले. त्यानुसार सदर विभागामार्फत 22 उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी कराव्या लागणार्‍या अतिरिक्त कामांत रु. 15.91 कोटींची वाढ होवून अतिरिक्त कामांचे कार्यारंभ आदेश मार्च 2019 मध्ये देण्यात आले. तापी जलविद्युत विभागाच्या या अतिरिक्त कामांचाही सुधारित अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला असून त्यास सक्षम स्तरावर मान्यता घेवून पुढील काम करण्याचे नियोजन आहे.

यासंदर्भात उपसा सिंचन योजनेचे पदाधिकारी आणि तापी खोरे महामंडळाचे अधिकारी यांच्यात संयुक्त बैठक देखील घेण्यात आली. या बैठकीत योजनेशी संबंधित विविध कामांबाबत सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावित अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली असून सक्षम स्तरावर सत्वर मंजुरी घेवून उर्वरित कामे पुर्ण करण्याचे नियोजन असल्याचे अधीक्षक अभियंता श्री. आमले यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती कार्यकारी अभियंता श्री. जोशी यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!