उपराजधानी की गुन्हेगारीची राजधानी?

0
दहावीचा अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले आहे. नव्या अभ्यासक्रमात घोकंपट्टीऐवजी विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीवर भर दिला गेला आहे. बहुसंच प्रश्नपत्रिका न देण्याचा निर्णय अंमलात आणला गेला आहे. त्यामुळे यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत कॉपी होणार नाही, असे राज्य परीक्षा महामंडळाने परीक्षा सुरू होण्यापूर्वी म्हटले होते.

तथापि हुशार आणि कल्पक कॉपीबहाद्दर ‘उस से भी जादा’ हुशार निघाले. कॉपीबहाद्दरांनी या उपाययोजनाच ‘बनावट’ ठरवल्या आहेत. ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर कॉपीचा महापूर आला आहे. भरारी पथक आले अशी नुसती कुजबूज चालू असतानाच परीक्षा केंद्रांबाहेर कॉप्यांचा पाऊस पडत आहे. मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा! या पेपरलाही कॉपी करण्याची वेळ गणंग विद्यार्थ्यांवर आली आहे. पालक आणि मित्र कॉपी पुरवण्यात आघाडीवर होतेच; पण आता शिक्षकही त्यात सामील झाले आहेत.

परभणी जिल्ह्यातील एका केंद्रावर कॉपी पुरवणारे दहा शिक्षकच पडकले गेले. दोन दिवस हा प्रकार सुरू होता. त्याचा गवगवा झाल्याने छापा टाकण्यात आला आणि शिक्षकांना पकडण्यात आले. नागपूरमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षेत नावीन्यपूर्ण घोटाळा उघडकीला आला. एका केंद्रावर बनावट विद्यार्थी परीक्षा देत असल्याचा प्रकार पकडला गेला. पोलिसांनी चार जणांना अटक केली. त्यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनीच सांगितले. झटपट पैसा कमावण्यासाठी त्यांनी बनावट उत्तरपत्रिका तयार केल्या. प्रवेशपत्रांत फेरफार करायला सुरुवात केली. बनावट विद्यार्थी पेपरला बसवले. या प्रकाराचा पोलिसांनी भंंडाफोड केला. यात मोठी टोळी सहभागी असावी असा पोलिसांचा कयास आहे. राज्यातील तिसरे मोठे शहर असा नागपूरचा लौकिक आहे.

तथापि अलीकडच्या काही वर्षात राज्याची उपराजधानी असलेले नागपूर गुन्हेगारांची आणि गुन्ह्यांची मात्र राजधानी होऊ पाहत आहे. याची कारणे काय असावीत? निवडणुकीत बेरजेचे राजकारण जमावे व जमवावे म्हणून सर्वच पक्ष गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना पुरेपूर संधी देत आहेत. ते राजकीय अभय कदाचित नागपूरमध्ये गुन्हेगारी बळावण्याचे महत्त्वाचे कारण असण्याची शक्यता असेल का? परीक्षांमधील कॉपी हा गंभीर प्रश्न आहे.

कॉपी करणार्‍यांना आणि ती पुरवणार्‍यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे एवढ्याने कॉपीच्या सुपीक धंद्याला आळा कसा बसणार? यामागच्या ‘अन्य’ कारणांचा सखोल शोध घेऊन त्यावर उपाययोजना होण्याची कितपत शक्यता निवडणुका तोंडावर आलेल्या असताना जनतेने मानावी?

LEAVE A REPLY

*