उपमहापौर पदासाठी संगीता गायकवाड दावेदार?

विरोधी पक्षनेत्यासाठी सत्यभामा गाडेकर यांचे नाव चर्चेत

0

नाशिकरोड | दिगंबर शहाणे- येत्या १४ मार्च रोजी होणार्‍या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असून उपमहापौर पदासाठी येथील प्रभाग २० मधून निवडून आलेल्या संगीता गायकवाड यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. तर विरोधी पक्षनेता पदावर शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे नाव चर्चेत आहे.

नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत नाशिकरोडला फक्त भाजप व शिवसेनेचेच उमेदवार विजयी झाले. यात भाजपचे १२ तर शिवसेनेचे ११ असे बलाबल आहे. नाशिकरोड विभागात भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे केवळ २ नगरसेवक होते.

परंतु यंदा तब्बल १२ नगरसेवक निवडून आल्याने येथे भाजपची ताकद वाढली आहे. नाशिकरोडमध्ये भाजपची ताकद वाढविण्यास पक्षात नव्याने दाखल झालेल्या हेमंत गायकवाड व प्रकाश घुगे यांची महत्त्वाची कामगिरी असून या दोघांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर नाशिकरोड भाजपला नवे बळ मिळाले आहे. या कामात त्यांना नाशिकरोड भाजप अध्यक्ष बाजीराव भागवत यांची साथ मिळाली. त्यामुळे येथे भाजप नव्या जोमाने काम करत आहे.

यापुर्वी भाजपची ताकद मर्यादित होती. मात्र गायकवाड-घुगे यांनी पक्षवाढीसाठी गेल्या वर्षभरापासून अहोरात्र मेहनत करून पक्षाचे तब्बल १२ नगरसेवक निवडून आणले. त्याचप्रमाणे अनेक नवोदितांना प्रवेश देऊन त्यातील अनेकांना विजयी करण्यात या दोघांचा सिंहाचा वाटा आहे. या दोघांच्या प्रवेशामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळाली असून आता भाजप नाशिकरोडला चांगलेच बाळसे धरत असल्याचे दिसून येते.

दरम्यान १४ रोजी होणार्‍या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी सलग दुसर्‍यांदा विजयी झालेल्या संगीता गायकवाड यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. तसेच विरोधी पक्षनेता पदावर प्रभाग २२ मधून विजयी झालेल्या सत्यभामा गाडेकर यांचे नाव चर्चेत असून गाडेकर ह्या तिसर्‍यांदा विजयी झाल्या आहेत.

शिवसेनेत त्या सध्या ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवक म्हणून ओळखल्या जातात. गेल्या वर्षी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याविरोधात केलेले आंदोलन चांगलेच गाजले होते. या आंदोलनामुळे गाडेकर यांना कारागृहाची हवासुद्धा खावी लागली होती. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे त्यांना विरोधी पक्षनेता पद देण्याची शक्यता आहे.

एकीकडे गायकवाड व गाडेकर यांचे नाव चर्चेत असताना स्थायी समिती सभापती पदावर आपली वर्णी लागावी म्हणून भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संभाजी मोरूस्कर प्रयत्नशील आहे. मोरूस्कर हे तिसर्‍यांदा निवडून आले असून त्यांचा दांडगा अनुभव व अभ्यासूवृत्ती, तसेच पक्षातील त्यांचे वाढते वजन लक्षात घेता त्यांना स्थायी समिती सभापती पद सहजरित्या मिळू शकते.

या पदासाठी भाजपचे प्रभाग १७ मधून निवडून आलेले दिनकर आढाव हेसुद्धा इच्छुक असून त्यांनीही जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. आढाव हे मनपात पाचव्यांदा निवडून आले आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपत प्रवेश करत उमेदवारी मिळवली.

LEAVE A REPLY

*