उन्हाच्या झळांनी नागरिक बेजार ; आठवडे बाजाराला उष्णतेची झळ

0

नाशिक : उन्हाळ्याच्या पहिल्या दिवसापासूनच दुपारची तळपती उन्हे नाशिककरांना चटका देऊ लागली आहेत. उन्हाळ्याच्या प्रारंभीच असे हाल होत असतील तर प्रखर उन्हाळ्यात काय स्थिती असेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. वाढत्या उन्हांची बुधवारच्या आठवडे बाजाराला झळ बसली. दुपारी बाजारात शुकशुकाट होता. तर जे विक्रेते आणि ग्राहक बाजारात होते त्यांना उन्हाच्या तडाक्यापासून वाचण्यासाठी डोक्यावर सावली देणार्‍या वस्तूंचा आधार घ्यावा लागला.

आज सकाळी 10 वाजेपासूनच उन्हाच्या झळा बसत होत्या. दुपारी त्यात आणखी भर पडल्याने पारा 36 अंशाच्या पुढे सरकला होता. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता. महिला, युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उन्हापासून वाचण्यासाठी चेहरा, डोके आणि अंग टॉवेल, साडीचा पदर, स्कार्प आदींचा आधार घेत झाकला होता. लहान मुलांना डोक्यात टोपी तर काहींनी छत्रीच्या आधाराने उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला.

आज शहरात आठवडे बाजार भरला होता. मात्र उन्हाचा पारा वाढल्याने भाजीपाला,मासळी व तत्सम विक्रेत्यांना त्याचा अधिक फटका बसला. अन्नधान्य बाजारात विके्रत्यांना ग्राहकांची वाट पाहावी लागत होती. विक्रेत्यांनाही उन्हात बसून राहावे लागत असल्याने मिळेल ती वस्तू डोक्यावर धरून सावली करत मालाची विक्री करावी लागत होती. तुरळक प्रमाणात असलेल्या ग्राहकांनी उन्हापासून वाचण्यासाठी छत्री, रुमाल, टोप्या आणि स्कार्प बांधूनच खरेदीला पसंती दिली. त्यामुळे विक्रेत्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत होता.

LEAVE A REPLY

*