उन्हाचा कडाका वाढला! ; तापमान 36 अंशावर

0

नाशिक : रात्री थंडी असली तरी दिवसा उन्हाचा पारा चढलेला असतो. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला असून आज तापमान थेट 36 अंशावर जाऊन पोहोचले होते. त्यामुळे सकाळी 11 वाजेपासूनच उन्हाची प्रखरता जाणवत होती.

आठ दिवसांपासून उन्हाचा चढता आलेख असल्याने थंडीने कधीच काढता पाय घेतला आहे. गेल्या आठ दिवसांपासून तापमान क्रमाने 28 अंशावरून ्रआता थेट 36 अंशावर येऊन पोहोचल्याने यंदाचा उन्हाळा कडक असण्याची चिन्हे आहेत. दुपारी रस्त्यांवर उन्हाची चांगलीच झळ बसत असल्याने नागरिकांना उष्णतेचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. डॉक्टरांकडे उन्हाचा त्रास होत असलेल्या रुग्णांची गर्दी वाढत आहे. त्यात डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ आणि चक्कर येत असलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.

उन्हाची तिरीप वाढल्यापासून शहरात रसवंती, कलिंगड विके्रते, लिंबू सरबत आणि शीतपेय विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. आता उन्हाचा कडाका चांगलाच वाढल्याने त्यांच्याकडे येणार्‍या ग्राहकांची संख्याही वधारली आहे. तसेच टोपी, स्कार्प, गॉगल खरेदी करण्याकडेही नागरिकांचा अधिक कल आहे. त्यामुळे मेनरोड आणि शिवाजी रोड येथे विक्रेत्यांकडे गर्दी होत आहे.

LEAVE A REPLY

*