उद्योगपतींची भाजपवर खैरात! चार वर्षात 705 कोटींची देणगी

0

काँग्रेसच्या पदरात 198 कोटी

नवी दिल्ली- 2012 ते 16 या चार वर्षांमध्ये भाजपला तब्बल 705 कोटी 81 लाख रुपयांच्या देणग्या ज्ञात स्रोतांकडून मिळाल्या आहेत. तुलनेने काँग्रेसला 198 कोटी 16 लाख आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 50 कोटी 73 लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहे.
असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉम्र्सफ (एडीआर) या संस्थेने गेल्या चार वर्षांमध्ये प्रमुख पाच राजकीय पक्षांना ज्ञात स्रोतांकडून म्हणजे 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मिळालेल्या देणग्यांचा अभ्यास करणारा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध केला. डॉ. मनमोहन सिंग सरकार सत्तेवर असल्यापासूनच भाजपला मिळणार्‍या देणग्यांचा ओघ वाढल्याचे त्यातून दिसून येते. प्राप्तिकर कायद्यानुसार, राजकीय पक्षांना 20 हजार रुपयांपेक्षा कमी देणग्यांची माहिती न उपलब्ध करून देण्याची मुभा आहे. त्याचा फायदा घेऊन राजकीय पक्षांकडून देणग्यांचे संपूर्ण चित्र कधीच स्पष्ट केले जात नाही. प्राप्तिकर खात्याकडे विवरणपत्र व लेखापरीक्षण झालेला ताळेबंद निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो. त्यावरून अज्ञात स्रोतांकडूनही भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांना मोठा निधी मिळाल्याचे दिसते. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने तर यंदाही, सलग अकराव्या वर्षी एकही रुपयाची देणगी मिळाली नसल्याचे प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर केले आहे.

सर्वाधिक देणग्या (260.87 कोटी) भारती उद्योगसमूहाने स्थापन केलेल्या सत्य निवडणूक संस्थेने दिल्या आहेत, तर आदित्य बिर्ला उद्योगसमूहाने स्थापन केलेल्या जनरल निवडणूक संस्थेने 124.8 कोटींच्या देणग्या दिल्या आहेत. या दोन्ही संस्थांकडून भाजपला अनुक्रमे 193.62 कोटी व 70.7 कोटी रुपये मिळाले. सत्यने राष्ट्रवादीलाही दहा कोटींची देणगी दिली. एकीकडे उद्योगसमूह भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीला भरभरून देत असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांना अनुक्रमे 1.89 कोटी आणि फक्त 18 लाखांवर समाधान मानावे लागले. याही देणग्या त्यांना कामगार संघटना व तत्सम संस्थांकडूनच मिळाल्या आहेत.

मिळालेली देणगी
भाजप : 705.81 कोटी
काँग्रेस : 198.16 कोटी
राष्ट्रवादी : 50.73 कोटी
माकप : 1.89 कोटी
भाकप: 18 लाख
देणग्या देणारे..
सत्य निवडणूक संस्था : 260.87 कोटी
जनरल निवडणूक संस्था : 124.8 कोटी
लोढा कन्स्ट्रक्शन : 21 कोटी
व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज : 5.25 कोटी

LEAVE A REPLY

*